एमपीडीएचा आरोपी, तडीपार अवैध दारू तस्कर विरोधीपक्षनेत्यासोबत ?

29

🔺अवैध दारू विक्रीचे कित्येक गुन्हे दाखल असलेला आरोपी धर्मा रॉय हा शिवसेनेचा माजी उपजिल्हाप्रमुख सोमवारी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांचे सोबत गडचिरोली येथील विविध कार्यक्रमांत दिसून आल्याने सर्वत्र संशयाचे धुके

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.१३ फेब्रुवारी):-महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व शिवसेना नेते अंबादास दानवे हे आज सोमवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांचे सोबत शिवसेनेच्या अनेक स्थानिक नेत्यांसह जिल्ह्यातील चामोर्शी येथील कुख्यात अवैध दारू तस्कर, २०१३ ते २०१६ या काळात एमपीडीएचा आरोपी आणि कित्येक महिने तडीपार असलेला शिवसेनेचा माजी उपजिल्हाप्रमुख धर्मराज उर्फ धर्मा रॉय हा सर्व कार्यक्रमात शिवसेनेचे गडचिरोली जिल्हा प्रमुख वासुदेव शेडमाके यांचे बाजूला अंबादास दानवे यांच्या खांद्याला खांदा लावून वावरताना दिसून आल्याने राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. 

गुन्हेगारीचे राजकीयकरण हा सर्वत्र चर्चिला जाणारा विषय असून राजकिय नेते गुन्हेगारिला, ते कुठेही स्थान देत नसल्याचे सातत्याने स्पष्ट करीत असतात. गडचिरोली जिल्हा शिवसेनेत असा आरोपी उपजिल्हाप्रमुख म्हणून गेली काही वर्षं कार्यरत होता.आणि सोमवारच्या विरोधी पक्ष नेत्याच्या दौऱ्यात सुटबुट लावून महत्वपूर्ण भूमिकेत वावरत होता. विशेष असे की अनेक महत्त्वपूर्ण राजकिय नेत्यांचे फोटो  गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांसोबत व्हायरल झाल्यामुळे त्यांचेवर पद सोडण्याची पाळी आली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री स्व. आर आर पाटील यांना सुद्धा अशाच एका प्रकरणात मंत्रीपद गमवावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर दानवेंसोबत एमपीडीएचा आरोपी उघडपणे वावरताना दिसुन आल्याने सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना दानवेंना घेरण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

आढावा घेतल्यानंतर संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दानवेंनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध वाळू, खनिज आणि दारु तस्करी संदर्भात चिंता व्यक्त केली. यावेळी, आपण दारु तस्करी रोखण्यासाठी कारवाईच्या सुचना देत असतांनाच, आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून दारु तस्कर सर्व कार्यक्रमांत सोबत सहभागी दिसून आला. अशा परिस्थितीत आपण व्यक्त केलेली चिंता दूर कशी होणार असा प्रश्न प्रस्तुत पत्रकाराने विचारला. या प्रश्नाला ऊत्तर देताना दानवेंनी आपण सदर व्यक्तीला ओळखत नसुन त्यांचा माझेशी काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट केले. दारु आणि धर्मा रॉय यांचे नाव निघताच धर्मा पत्रकार परिषदेच्या दालनातून पळून गेला.