देशाचे भविष्य बळकट करणाऱ्या अंगणवाड्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी !

30

🔹अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या समस्या निकाली काढा — सौ वृषालीताई विघे

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.राज्यातील गर्भवती महिला, महिलेच्या गर्भातील बाळ, नवजात बाळ, स्तनदा माता, आणि बाळाची वयाच्या 6 वर्षांपर्यंत काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलण्याचे काम अंगणावाडी सेविका आणि मदतनीस करत असतात. मात्र, सध्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.

अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्या अजूनही प्रलंबित असून अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करण्यात यावी. मिनी अंगणवाडी सेविकांना मोठ्या अंगणवाडी सेविकेइतकेच मानधन देऊन त्यांची मानधनातली तफावत दूर करण्यात यावी, २०१८ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवा समाप्ती लाभाची थकीत रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे यांनी शासनाकडे केली आहे.

अंगणवाडी सेविकाचे काम सुलभ आणि जलद व्हावे यासाठी शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून अंगणवाडी सेविकांना 2019 साली पॅनसोनिक कंपनीचे मोबाईल दिले होते. यासोबत सिमकार्डसोबत मोबाईल रिचार्ज खर्चही शासनामार्फत दिला जात होता. अंगणवाडी सेविकांना मोबाईलमध्ये पोषण ट्रेकर ऍप देण्यात आले होते. या ऍपमध्ये मराठीत पोषण आहार, मुलांची, स्तनदा माता, लसीकरण, सर्व्हे याची माहिती भरली जात होती. त्यामुळे काम सोपे झाले होते. मात्र काही दिवसांनी मोबाईलला तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने ते बंद पडू लागले. अनेक अंगणवाडी सेविकानी स्वतः 2 ते 3 हजार रुपये खर्च करून रिपेअर करून घेतले. मात्र तुटपुंज्या मानधनामुळे हा खर्च सेविकांना परवडणारा नाही.
पोषण ट्रेकर ऍप मध्ये बदल करण्यात आला असून हे ऍप आता इंग्रजी मध्ये केले आहे. इंग्रजी मध्ये आता संपूर्ण माहिती भरावी लागत आहे.

अनेक अंगणवाडी सेविकांना इंग्रजीत माहिती भरणे कठीण जात आहे. अंगणवाडी सेविका काम करतांना महत्वाचे म्हणजे त्यांना गावाचा सर्व्हे करून माहिती घ्यावी लागते आणि ती माहिती ऍप मध्ये भरावी लागते. मात्र नवीन ऍप मध्ये सर्व्हे ऑप्शन दिला नसल्याने माहिती अपूर्ण राहत आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना अडचणी निर्माण होत असल्यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याची मागणी माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे यांनी शासनाकडे केली आहे .

राष्ट्र निर्मितीच्या कामात महत्वाचा वाटा असणाऱ्या अंगणवाडी सेविका तटपुंज्या मानधनावर परिस्थितीशी संघर्ष काम करत असल्याचे चित्र अंगणवाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अंगणवाडी मधील सोयींमध्ये सुधारणा करून शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या रास्त मागण्यांची दखल घेऊन राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिलासा द्यावा — सौ वृषाली प्रकाश विघे माजी महिला बाल कल्याण सभापती जी. प. अमरावती.