जिद्द, चिकाटी व सातत्य यांच्या जोरावर जीवनामध्ये कोणतीही कठीण स्पर्धा जिंकता येते – ऍड. संदीप सुरेश पाटील

34

✒️चोपडा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

चोपडा(दि.17फेब्रुवारी):-येथील शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फैजपूर येथे पार पडलेल्या ‘युवक महोत्सवात’ घवघवीत यश संपादन केले, त्याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी तसेच उपप्राचार्य एन.एस.कोल्हे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवारंग स्पर्धा संघ प्रमुख डॉ.एच.जी.चौधरी यांनी केले. याप्रसंगी इशरफ शेख, दीपेश शुक्ल व गणेश कोळी या यशस्वी स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले युवारंग स्पर्धेतील अनुभव कथन केले. याप्रसंगी समूह नृत्य, लोकसंगीत, लोकनृत्य, कोलाज, फोटोग्राफी, मिमिक्री, शास्त्रीय सुरवाद्य, समूह गीत पाश्चात्य, मातीकाम, व्यंगचित्र, पाश्चिमात्य सुगम गायन, शास्त्रीय ताल वाद्य, भारतीय समूह गायन, शास्त्रीय गायन, भारतीय समूह नृत्य इत्यादी कला प्रकारामध्ये एकूण १३ पदके प्राप्त करीत जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. यात ०५ सुवर्णपदके, ०४ रजत पदके व ०४ कांस्य पदके प्राप्त करीत घवघवीत यश प्राप्त केले. या सर्व कला प्रकारात यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी दिग्दर्शक मकरंद चौधरी, हेमंत चौधरी, किशोर खंडाळे तसेच संघप्रमुख डॉ.एच.जी.चौधरी, सौ. के. एस. क्षीरसागर यांना तसेच सहकार्य करणारे माजी विद्यार्थी व सहभागी विद्यार्थी यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी महाविद्यालयातील करिअर कट्टा केंद्राने जळगाव जिल्ह्यातर्फेघेण्यात आलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते करिअर कट्टाचे संचालक वाय. एन. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी अपयशांनी हारून न जाता नव्या उमेदीने कामाला लागले पाहिजे कारण नवी उमेद, जिद्द हेच यश प्राप्त करून द्यायला कारणीभूत ठरतात.याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे अध्यक्ष ऍड. संदीप सुरेश पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कार्यामध्ये गुंतून राहिले पाहिजे. विद्यार्थ्यांनी यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी व सातत्य जोपासले तर जीवनामध्ये कोणतीही कठीण स्पर्धा जिंकता येते. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्साह महत्वाचा असतो. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून द्यावे तरच यश मिळते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. एल. भुसारे यांनी केले तसेच पारितोषिक यादीचे वाचन सौ. के. एस. क्षीरसागर यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार युवारंग स्पर्धेचे संघप्रमुख डॉ.एच. जी.चौधरी यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी भरत भालेराव यांचे सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, स्पर्धक, पालक तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.