शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

35

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.21फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ या संघटनेशी निगडित येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी अखेर 20 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर गेले आहेत.

यापूर्वी कर्मचाऱ्यांनी महासंघाच्या निर्देशानुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांना दि. 01 फेब्रुवारी रोजी दि. 2 फेब्रुवारी पासून टप्प्याटप्प्याने करणार असलेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती देणारे निवेदन दिले होते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत.

या प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने यापूर्वीही अनेकदा संप व आंदोलन करण्यात आले.
परंतु आजपर्यंत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन उदासीन असल्याचे दिसते.

त्यामुळे शासनाला जाग यावी म्हणून पुन्हा एकदा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी अखेर नाइलाजाने बेमुदत संपाचे हत्यार उचलले आहे.

या आंदोलनाच्या संदर्भात गावंडे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज महाविद्यालयाच्या बाहेर तंबू ठोकून संपाला सुरुवात केली आहे.

दिनांक 2 फेब्रुवारी पासून टप्प्याटप्प्याने सुरू असलेले हे आंदोलन बेमुदत संपाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे.

विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणे, अवकाश काळात निदर्शने करणे, काळ्या फिती लावून कार्यालयीन कामे करणे.

एक दिवसाचा लाक्षणिक संप करणे एवढी आंदोलने करूनही शासनाचे डोळे उघडत नसल्यामुळे शेवटी नाईलाजाने 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचे हत्यार उचलल्याची भावना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.

यावेळी महाविद्यालयाचे संपकरी कर्मचारी उपस्थित होते.