वेळ निघून जाऊ नये म्हणून…

30

आज विनंती करतो की वाचाच..
मित्रहो, मी कधीच माझं लिखाण वाचा असा आग्रह धरत नाही, पण आज विनंती करतो की वाचाच.. होऊ शकत ह्या काही ओळी वाचल्याने तुमच्या कुण्या मित्राचा जीव वाचेल.. ही पोस्ट माझं दुःख व्यक्त करण्यासाठी किंवा उपदेश करण्यासाठी नाही तर वेळीच सावध करण्यासाठी आहे. गेल्या रविवारी माझा सर्वात जवळचा मित्र आणि माझा साळा(मेहुणा) वैभव वारला.. तो पुण्यात राहत होता. वय वर्ष फक्त 36. मागे आई-वडील, बायको आणि 2 लहान मुले. माझ्यापेक्षा3-4 वर्षाने लहान असूनही आमच्या सर्वांपेक्षा खूप जबाबदार, समजदार-संयमी होता. सख्ख्या भावांचा नसेल इतका आमचा एकमेकांमध्ये जीव गुंतलेला होता.

त्याच्या कमरेचे दोन्ही बॉल(जॉईंट) खराब झाले होते. ते जॉईंट खराब झाले कशाने? तर तो तब्बेतीने रोड होता आणि त्याला तब्बेत सुधारायची होती. थोडी बॉडी बरी दिसली पाहिजे, जरा जाड झालो पाहिजे, थोडे गाल वर आले पाहिजे म्हणून तो उपाय शोधत होता. 2016-17 साली त्याला त्याच्या कुण्या जिमवाल्या मित्राने तब्बेत सुधारण्यासाठी-भूक लागण्यासाठी काही टॅबलेट दिल्या. त्या तो रोज खायचा. त्या गोळ्यांनी त्याला खूप भूक लागायची. तब्बेत महिन्याभरात सुधारली, गाल वर दिसायला लागले. तो खुश होता. त्या गोळ्या संपल्यावर पुण्यात भेटत नसल्याने त्याने मला फोन करून अकोल्यातुन त्या गोळ्या पाठवायला सांगितल्या. मी अकोल्यातील बळवन्त मेडिकल मध्ये त्या गोळ्या मागताच ते मेडिकल वाले म्हणाले की, “ह्या गोळ्या कशाला? हे तर प्युअर स्टिरॉइड आहे. ह्याने शरीर खराब होऊन जाईल घेणाऱ्याचे, हे कुणालाच घेऊ देऊ नका.”ही गोष्ट मी त्याला सांगितली आणि त्या गोळ्या बंद करायला लावल्या. पण तोपर्यंत त्याने सलग जवळपास 7-8 महिने त्या गोळ्या घेतल्या होत्या. पुढच्या काही दिवसातच त्याच्या कमरेच्या एका बाजूच्या बॉलच दुखणं सुरू झालं. पुढे दोन वर्षात ते दुखणं इतकं वाढलं की त्याला चालणंही कठीण झालं.

त्यापुढच्या काही महिन्यात दुसऱ्या बाजूच्या जॉईंटचं सुद्धा दुखणं सुरू झालं, त्याचे पाय फोल्ड होत नव्हते. पॅन्ट घालणे, सॉक्स घालणे जमत नव्हते. आता त्याच्या हिप चे दोन्ही जॉईंट बॉल खराब झाले होते. त्याचा प्रचंड त्रास होता. त्याला मी 2 डॉक्टर्सला भेटून दिले होते त्या दोन्ही डॉक्टर्सने आणि आजपर्यंत अनेक डॉक्टरांनी त्याला सर्जरी करून घे, तू 100% चांगला होशील म्हणून सांगितले. पण त्याने ऐकले नाही. का ऐकले नाही? तर त्याला कुण्यातरी फुकट सल्ला देणाऱ्याने सांगितले होते की “आज तरी तुला चालता येतय, जर तू ऑपरेशन केले तर तू आयुष्यभर चालू शकणार नाहीस, जॉईंट रिप्लेसमेंटचे ऑपरेशन केले तर लगेच वर्षभरात पुन्हा त्रास सुरू होतो.” हे ऐकून ऑपरेशनच्या धाकाने तो गेल्या 2 वर्षांपासून सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा न चुकता रोज दोन पेनकिलर खात होता. त्यामुळे त्याच्या लिव्हर आणि किडणीवर खूप वाईट परिणाम झाला. तो गेली अनेक वर्षे हे दुखणे अंगावर काढत होता, सहन करत होता, पेनकिलर खातच होता.

9 फेब्रुवारी 2023 ला रात्रभर तो त्रासाने तडफडत होता.घरचे सर्व त्याच्या सेवेत रात्रभर जागी होते. त्याला कळ फेरनेसुद्धा शक्य होत नव्हते. दुखणे असह्य झाल्याने दुसऱ्या दिवशी 10 फेब्रुवारी ला त्याला डॉक्टर कडे नेले, MRI काढला त्या रिपोर्ट नुसार त्याचे दोन्ही बॉल पूर्णपणे निकामी झाले होते आणि त्याच्या इन्फेक्शन मुळे पाठीचे काही मणकेसुद्धा बाधित झाले होते. डॉक्टरने काही औषधे देऊन ऑपरेशनचाच सल्ला दिला. ही गोष्ट शनिवारची, घरच्यांनी व मित्रांनी सोमवारी ऑपरेशन करूनच टाकू असे ठरवले. परंतु एक दिवस आधी म्हणजे रविवारी पुन्हा त्रास वाढल्याने सकाळीच डॉक्टरने सलाईन सोबत काही इंजेक्शन दिले आणि त्याला हॉस्पिटलमध्येच आराम करायला सांगितलं. त्याला लगेच आराम वाटत असल्याने त्याने घरी आराम करतो असा आग्रह करत मित्रांना घरी सोडून मागितलं. घरी आल्यानंतर दोन तासाने त्याची जीभ जड झाली, गुंगी यायला लागली, अंग थोडं थंड पडायला लागलं म्हणून एक मित्र ऑटोरिक्षा घेऊन आला. तर “मला सध्या कुठेच जायचं नाही, म्हणत त्याने दारात आलेला ऑटो परत पाठवला. ऑटो परत गेल्यानंतर लगेच 15 मिनिटात त्याचं पूर्ण अंग थंड पडलं, शरीराने हालचाल बंद केली, फक्त डोळे हलत होते. मित्रांनी आणि बायकोने लगेच ऍम्ब्युलन्स बोलावून त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले, पण तिथे पोचण्याआधीच त्याने बायकोच्या मांडीवर जीव सोडला.

(त्या ऑटोत बसून गेला असता तर कदाचित वाचवता येणे शक्य होते. पण ह्या सर्व जर तर च्या गोष्टी)
यात 4-5 दिवसांपासून त्याला सुरू असलेला त्रास, हॉस्पिटलमध्ये भरती होणे यातलं काहीच त्याने मला सांगितलं नाही, आणि कुण्या मित्रालासुद्धा सांगू दिले नाही. घरच्यांनी म्हंटल की चंदूभाऊंना फोन लावतो तर म्हणे त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, तुम्हाला माझी शपथ आहे. मी चांगला झालो की बोलेल त्यांच्याशी. त्यानंतर मला सरळ तो गेल्याचा फोन आला. हादरून गेलो मी. तसाच बायको-मुलांना घेऊन पुण्याला आलो.

त्याच्या बॉडी चे पोस्ट मार्टम झाल्यानंतर संध्याकाळी 7 पासून दुसऱ्या दिवशी पर्यंत त्याचे मित्र पोस्ट मार्टम रुमसमोर रात्रभर रडत बसले होते. पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरने मित्राला बोलावून सर्वात आधी विचारले की, “हा स्टिरॉइड घेत होता का? त्याची किडनी आणि लिव्हर खराब झालेत, तुम्ही साले हो इतकी परिस्थिती खराब होईपर्यंत झक मारत होते का?” त्याचं चिडणं स्वाभाविक होतं, 36 वर्षाच्या उमदा तरुणाचं पोस्टमार्टम करण्याची वेळ त्याच्यावर अली होती. सततच्या पेनकिलर घेण्याने त्याचे लिव्हर डॅमेज झाले होते. त्याच्या ओरडण्यावर कुणीच काही बोलू शकले नाही. त्याच्या मित्रांनी शेवटचे 4-5 दिवस खूप धावपळ केली पण काहीच फायदा झाला नाही.

इतकं डिटेल सांगण्याचं कारण म्हणजे तो गेल्यानंतर आता खूप दुःख होतय, प्रचंड अस्वस्थ झालोय, आयुष्यातल्या सर्वात जवळच्या मित्राच्या जाण्याने माझ्याही मनावर प्रचंड आघात झालाय. आम्ही सोबत आखलेल्या भविष्याच्या सर्व योजना मातीत गेल्यात.पण आज स्वतःचं हे सर्व दुःख, पश्चात्ताप स्वतः लाच नाटकीय वाटत आहेत. त्याला होणारा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय. त्याला जबरदस्ती डॉक्टर कडे नेऊन त्याच ऑपरेशन करून घेणं हे आमचं कर्तव्य होतं. त्याने जरी सांगितलं नाही की रोज पेनकिलर घेतो तरी त्याचा त्रास आम्ही बघत होतो. डोक्यात होतं की त्याच ऑपरेशन झालं पाहिजे पण त्यादृष्टीने आम्ही प्रत्यक्ष काहीच केलं नाही. त्यामुळे त्या डोक्यात असण्याला काहीच अर्थ नाही. त्याने कायमच प्रत्येकाला मदत केली. त्याच्या मयतीवर नातेवाईक कमी मित्रच जास्त होते.

त्याच्या ऑपरेशनचा खर्च होता 3 लाख रुपये. तितके पैसे त्याच्याकडे सहज उपलब्ध होते. तो ज्या कंपनीत काम करत होता ते लोकसुद्धा कंपनी कडून खर्च करायला तयार होते. पण ह्याची ऑपरेशन बद्दल मनात असलेली भीती नडली. मित्रांकडे मनमोकळा बोलला नाही. आम्ही मित्रांनी त्याला जबरदस्ती केली नाही. विशेष म्हणजे मी आग्रह केला असता तर तो टाळू शकला नसता. तो वाचला असता. पण मी सहज घेत राहिलो की करू कधीतरी. प्रत्येकाच्या मागे काही न काही कामं असतातच, त्यातून वेळ काढणे जरुरी असते जे मी करू शकलो नाही.

हे लिहिण्यामागच कारण की, तुमचे कुणी मित्र असतील जे बॉडी बनविण्यासाठी, तब्बेत सुधारण्यासाठी स्टिरॉइड्स घेतात, तत्सम गोळ्या-पावडर घेतात, वारंवार पेनकिलर घेतात त्यांना वेळीच थांबवा. तब्बेत सुधारण्याच्या नादात जीव गमावू देऊ नका.कोणतीही बिमारी अंगावर काढू नका आणि कुणाला काढू देऊ नका. काही मित्रांच्या चुकीच्या सल्ल्याने वैभवचं आयुष्य संपवलं. आपले जे कुणी मित्र आहेत त्यांच्यासोबत मन मोकळं करत चला. जो मित्र स्वतः चा त्रास सांगत असेल त्याचं म्हणणं ऐकत चला. कुण्या मित्राने आपल्या एखाद्या बिमारीबद्दल सांगितलं, काही त्रास सांगितला तर त्याकडे दुर्लक्ष न करता ते गंभीरतेने घ्या. तो त्रास दूर करण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष प्रयत्न करा. त्या क्षेत्रातील एक्सपर्ट व्यक्तींचा सल्ला घेऊन देण्यात मदत करा. कुणीतरी दुसरा त्याच्यासाठी काही करेल ही वाट बघत बसू नका. स्वतःहून पुढाकार घ्या. माणूस गेल्यानंतर आयुष्यभर पश्चात्ताप करणे, रडणे, दुःखी राहणे ह्याला कवडी अर्थ नाही. तो जिवंत असतांना त्याच्यासाठी तुम्ही काही करू शकलात त्याला अर्थ आहे. संसाराच्या व्यापातून वेळ निघत नसतो तर आपल्या लोकांसाठी वेळ काढावा लागत असतो. मैत्री म्हणचे फक्त सोबत खाणे-पिणे, गप्पा मारणे आणि एकमेकांच्या घरघुती कार्यक्रमात सहभागी होणेच नसते. त्याला होणारा शारीरिक-मानसिक त्रास आपण ओळखू शकत नसू, त्याच्यासाठी काही करू शकत नसू तर त्याला अर्थ नाही. हा वैभव नावाचा 36 वर्षांचा जीव सहज वाचू शकत होता. पण आम्ही त्याचे इतके जिवलग मित्र असूनसुद्धा त्याच्यासाठी काहीच केलं नाही आणि त्याला वाचवू शकलो नाही. त्यामुळे आमच्या आताच्या रडण्याला एका पैशाचे महत्व नाही.

त्याचं शरीर या हाताने उचलून चितेवर ठेवतांना त्याच प्रेत आमच्यावर ओरडत होतं की, “साले हो, तुम्ही स्वतः ला दोस्त म्हणवता? तुम्ही थोडंसं टेन्शन घेतलं असतं, जबरदस्ती मला घेऊन गेले असते तर आज मी तुमच्यात असतो, माझ्या परिवाराचा आधार गेला नसता, फक्त बोलण्यापूरते दोस्त तुम्ही, आताचं तुमचं रडणं म्हणजे नाटक आहे, ही नौटंकी बंद करा.” स्वतः चीच लाज वाटत होती तेव्हा. अजूनही वाटतेय. यापुढची जबाबदारी भले आम्ही पार पाडू, पण जशी आमच्या हातून वेळ निघून गेलीय तशी तुमच्या हातून वेळ निघून जाऊ नये म्हणून… ही पोस्ट..

आता या माफी मागण्यालासुद्धा कवडी अर्थ नाही याची पूर्ण जाणीव आहे तरी माफ कर यार वैभव दा….. माफ कर..🙏 

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666