राज्यस्तरिय प्राध्यापक – विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी अमळनेर येथील प्रा.डॉ.भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांची स्तुत्य निवड

35

✒️धुळे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

धुळे(दि.25फेब्रुवारी):-महाराष्ट्र राज्यात व्यवसायिक समाजकार्याचे शिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थां महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाशी संलग्नित कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत समाज कल्याण व सामाजिक विकासाची उपक्रम राबवणारे प्रशिक्षित समाज कार्यकर्ते तयार केले जातात. हे महाविद्यालये संख्येने कमी असली तरी त्यांचे उपक्रम भरीव व समाज उपयोगी असतात.

अशाच समाजकार्याचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या महाराष्ट्रभरातील संस्थांमधील लोकांसाठी काम करणारी मास्वे ही अग्रगण्य राज्यस्तरीय संघटना आहे. समाजकार्याचे शिक्षण अधिक रोजगारक्षम, समाज उपयोगी व राष्ट्रनिर्माण मध्ये उपयोगी होईल यासाठी ही संस्था काम करते. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अंबादास मोहिते तथा मास्वे कार्यकारी समितीने अमळनेर समाजकार्य महाविद्यालयातील दोन प्राध्यापक डॉ. भरत खंडागळे व प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे नुकतीच राज्यस्तरिय प्राध्यापक – विद्यार्थी विनिमय कार्यक्रम व शैक्षणीक संसाधन निर्माण समिती समन्वयकपदी निवड केली आहे.

या समितीमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील ज्येष्ठ व प्रयोगशील प्राध्यापकांची निवड केली असून समित्यांमार्फत राज्यभरातील समाजकार्य शिक्षण देणाऱ्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणे, त्यांची गुणवत्ता, रोजगार क्षमता व कौशल्य वाढवणे यासाठी कार्य करणार आहे.

तसेच जागतिक स्तरावरील व्यावसायिक समाजकार्यातील संदर्भ साहित्याचे आकलन करून त्याचे रूपांतर मराठी व स्थानिक भाषांमध्ये करण्यासाठी ही समिती कार्य करेल.मास्वे मार्फत या अगोदरही विविध सामाजिक व विद्यार्थी केंद्रित प्रश्न लोकशाही व सनदशीर मार्गाने सोडविण्यासाठी भरीव काम केले आहे. यापुढेही या उपक्रमाची व्यापकता वाढविण्यासाठी मासवेच्या कार्यकारी समितीने विवीध विषयावर काम करणाऱ्या समित्यांचे गठन करून विद्यार्थी, प्राध्यापक व समाज उपयोगी उपक्रम अधिक नियोजन व गुणवत्तापूर्ण राबवणीसाठी पुढाकार घेतला आहे.मासवेच्या विविध समित्यांवर नियुक्ती झालेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे प्राध्यापक, विद्यार्थी व समाजकार्य महाविद्यालयाकडून अभिनंदन व स्वागत करण्यात आले आहे.