गंगाबाई तलमले महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” साजरा

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 27 फेब्रुवारी):-27 फेब्रुवारी म्हणजेच महाराष्ट्राचे महानकवी कुसुमाग्रजांची जयंती. त्यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. त्याच औचीत्याने स्थानिक गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे महानकवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. श्रीकांत कळसकर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रासेयो विभाग प्रमुख प्रा. संतोष पिलारे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान शाखा प्रमुख प्रा. सुप्रिया तलमले, प्रा. जयगोपाल चोले, प्रा. अंकुश ठाकरे, प्रा. पुरुषोत्तम भरे, प्रा. माधव चूटे, सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. डिंपल तलमले, प्रा. तृप्ती नागदेवते, प्रा. चैताली राऊत, प्रा. विद्याश्री बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्रा. संतोष पिलारे म्हणाले की, अफाट साहित्यविश्वाची सफर म्हणजे कुसुमाग्रज आहेत. कुसुमाग्रज म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली महान देणगी होय. काव्य, नाट्य, कथा असा कोणताही साहित्यप्रांत नाही, ज्यात कुसुमाग्रजांनी मुशाफिरी केली नाही. स्फूर्ती, प्रेरणा देणाऱ्या त्यांच्या कवितांनी तरुण पिढीला चेतविले आहे. आजही त्यांची नाटके काळ बदलला तरी मनाचा ठाव घेतात, मनावर अधिराज्य करतात. या प्रसंगी प्रा. संतोष पिलारे यांनी कुसुमाग्रज यांची “कणा” कविता सादर केली. प्रा. सुप्रिया तलमले यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की, क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे, या तत्त्वाने कुसुमाग्रजांनी लेखन केले.

त्यामुळे त्यांच्या कवितांमध्ये क्रांतिची बिजे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या चरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपले जीवन उज्वल भविष्याकडे वाटचाल सुरु ठेवली पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. तर आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी विभागप्रमुख प्रा. श्रीकांत कळसकर यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साहित्याचा परिचय करून देत असतांनाच कुसुमाग्रजांच्या अफाट साहित्यविश्वाची सफर घडवून आणली आणि “मराठी भाषा गौरव दिन” का साजरा केला जातो याची माहिती उपस्थितांना दिली. प्रसंगी प्रा. जयगोपाल चोले, प्रा. अंकुश ठाकरे, प्रा. पुरुषोत्तम भरे, प्रा. माधव चूटे, सांस्कृतीक विभाग प्रमुख प्रा. डिंपल तलमले, प्रा. तृप्ती नागदेवते, प्रा. चैताली राऊत, प्रा. विद्याश्री बनकर, सेजल भागडकर, करिश्मा कावळे, रितू मांढरे यांनी आपल्या मनोगतात कुसुमाग्रज यांच्या कविता, नाटके मधील काही संवाद सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्मिता पिलारे यांनी केले तर आभार महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल कांबळी हिने मानले. या कार्यक्रमात नैना मांढरे या विद्यार्थिनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.