अवकाळी पावसाच्या सततच्या संकटाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला

33

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19मार्च):-मराठवाड्यात दोन-तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासात अनेक भागात हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीटही झाली. नैसर्गिक आपत्तीच्या या संकटाने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात अवकाळी पावसाचा प्रकोप सर्वाधिक होता. या जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात सरासरी ३८.८ मिलिमीटर पाऊस झाला. तर गारपिटीने अनेक भागात नुकसान केले.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका वगळता औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील पाटोदा व गेवराई तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक होता. जालना जिल्ह्यातील शहागड परिसरात गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटात,लख्खप्रकाश पडत पाऊस झाला.

वडीगोद्री, अंतरवाली सराटी आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वीज पुरवठा खंडित होऊन पावसाबरोबर गारा ही झाल्या. घनसावंगी परिसरात जोरदार वादळा सह पाऊस झाला. कुंभारपिंपळगावसह परिसरात गुरुवारी (ता.१६) रात्री साडेनऊ वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह विजेच्या कडकडाटासह जोरदार वारे व पाऊस मंठा तालुक्यात गुरुवारी दुपारी गारपीट झाली तर तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. कडवंची परिसरात गत दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी होत असलेल्या पावसामुळे द्राक्षाचे मनी सुकत व फाटत असून आधीच दर पडलेले असताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.

पाऊस ठरतोय सुगीच्या दिवसांत ‘काळ’

चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी कडवंची जि. जालना.दोन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस येतो आहे. रात्रीच्या वेळी येत असलेल्या पावसामुळे द्राक्ष मणी फाटत आहेत. ग्राहकांना द्राक्ष कमी दरात मिळत नसले तरी उत्पादकांच्या बाबतीत आधीच द्राक्षाचे दर पडलेले आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.