दापोरी येथे शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी अन्नत्याग आंदोलन संपन्न !

33

🔸अन्नत्याग आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.19मार्च);-शेतकऱ्यांंविषयी सहवेदना व्यक्त करण्यासोबत त्यांच्या विषयीची बांधिलकी बळकट करण्यासाठी, तसेच ज्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या धोरणांचा निषेध करण्यासासाठी दापोरी येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दर वर्षी १९ मार्च रोजी संवेदनशील नागरिक एक दिवस अन्नत्याग करतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या वर्षी नागरिकांनी अन्नत्याग करून आपल्या भावना व्यक्त करून सातबारा कोरा करा शेतकऱ्यास कर्जमुक्त करा, परिशिष्ट नऊ मधून शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, सर्व शेतमाल नियंत्रण मुक्त करा, आवश्यक वस्तू कायदा रद्द करा, शेतीला दिवसा बारा तास वीज उपलब्ध करून द्या, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारा, अवकाळी पावसाने आणि वर्षभर सुरु असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीची एनडीआरएफमधून तात्काळ भरपाई द्या. पीक विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडा. यासह विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले असल्याचे ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी सांगितले.

देशात खुल्या अर्थव्यवस्थेनंतर कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), जीवनावश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण आदी कायद्यांच्या जोखडात शेतकरी अडकून पडला. पहिल्या घटना दुरुस्तीने या शेतकरी विरोधी कायद्यांना जन्म दिला. या दुरुस्तीच्यावेळी परिशिष्ट नऊ जोडून त्यात २०० च्या वर शेतकरी विरोधी कायद्यांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून शेतकऱ्यांची कृषी, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक पातळीवर सातत्याने कोंडी सुरू आहे. मेक इन महाराष्ट्र, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन अशा राजकीय घोषणा रोज कानावर पडत असतांना महाराष्ट्रात सरासरी दहा शेतकरी दररोज आत्महत्या करता आहे या गंभीर विषयावर शासन कोणत्याच प्रकारच्या उपाय योजना करून शेतकऱ्यांना दिलासा देत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या न बदललेल्या विदारकतेकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश विघे, माजी पंचायत समिती सभापती दीपक पांडव, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, संजय नगले, राजकुमार कोंडे, कांचन कुकडे, भूषण उमाळे, राजू पाटील, वासुदेव तायवाडे, राजेश तळकीत, शंकर ढोमने, गोविंद वानखडे, शिवरामजी दंडाळे, भूषण उमाळे, यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.