काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाचे तैलचित्र लावावे – डॉ. राजन माकणीकर

30

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.20मे):- काळाराम मंदिर सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ मार्च इ.स. १९३० रोजी महाराष्ट्राच्या नाशिक शहरातील अस्पृश्यांचा काळा राम मंदिरामध्ये प्रवेशासाठीचा सत्याग्रह होता. याची माहिती व तैलचित्र या मंदिर परिसरात उभारावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथरावं शिंदे यांना पॅन्थर डॉ. राजन माकणीकर केलेल्या मागणी पत्रात असे म्हटले आहे की,
काळाराम मंदिर सत्याग्रहामधील बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड व इतर सत्याग्रही, १९३० आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचे महत्त्वाचे स्थान आहे. फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळच्या दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा २ मार्च १९३०ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्षे चालला होता.

मात्र; या इतिहासिक घटनेचा मंदिर परिसरात उल्लेख केला नसल्याचे दिसून येत आहे. काळाराम मंदिर एक इतिहासिक घटनेचे साक्षीदार असून सदर मंदिर परिसरात या इतिहासिक घटनेचे विवरण माहिती व तैलचित्र उभारावे अशी मागणी आर पी आय संविधान पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.