राजमाता माँसाहेब अहिल्यामाई होळकर जयंती विशेष

26

जन्म – ३१ मे, १७२५
मृत्यू – १३ ऑगष्ट, १७९५

आपल्या प्रजेवर नित्तांत प्रेम करणाऱ्या, प्रजावत्सल, कर्तृत्ववान, आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या, उत्तम प्रशासक, सर्वप्रथम मालवाचे हित जोपासणाऱ्या, लोकमाता माँसाहेब अहिल्याराणी होळकरांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी चोंडी या गावी झाला. चोंडी हे गाव पूर्वीच्या बीड जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यामध्ये होते. अहिल्यामातेची आई सुशिलाबाई तर वडील मराठा वतनदार पाटील माणकोजी शिंदे हे होत. अहिल्यादेवींना महादजी व शहाजी नावाचे दोन भाऊ होते. माणकोजी शिंदे पाटलांच्या त्या एकमेव कन्या. माणकोजी शिंदे पाटलांच्या घराण्यात अनेक पिढ्यांपासून पाटीलकीची वतनदारी होती.

मराठेशाहीत महाराणी ताराराणी साहेबांच्या काळात शिंदे घराण्याने आपले शौर्य दाखवलेलं होतं. निजामशाही आणि मराठेशाहीच्या सीमेवर सीना नदीकाठी असलेले चौंडी हे गाव प्रमुख सत्ताकेंद्र होते. माणकोजी शिंदे पाटील हे या सत्ता केंद्रातील लढवय्ये होते. मुत्सद्दी ‘राजकारणीही होते. त्यामुळे राजमाता माँसाहेब जिजाऊप्रमाणे लोकमाता अहिल्यादेवींना शास्त्रविद्या, शस्त्रविद्या व राजनितीचे शिक्षण घरातच मिळाले होते. अहिल्यामाता या लहानपणापासूनच अतिशय धाडसी, मुत्सद्दी व बुद्धिमान होत्या. वयाच्या आठव्या वर्षी घोड सवारी, पोहणे, भालाफेक, तलवार चालवणे, भाषा शिक्षण, मुत्सद्दी राजकारण यात अहिल्यादेवी चुणूक दाखवत होत्या.
राजे मल्हारराव होळकर हे मराठेशाहीतील अत्यंत नामांकित सरदार होते. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी तर गाव हे होळ. गावाच्या नावावरून होळकर असे आडनाव पडले. पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या काठी होळ हे गाव आहे. खंडोजी होळकर हे गावच्या पाटलाकडे काम करत असत. यातूनच खंडोजी गावचे सत्ताकारण करू लागे. अशा त्या खंडोजी होळकरांच्या घरात १६ मार्च, १६९३ ला मल्हारराव यांचा जन्म झाला. मल्हारराव यांचा विवाह मामा भोजराजजी बारगळ यांची सुकन्या गौतमाबाईंशी इ.स.१७२१ मध्ये झाला.

बारगळ यांच्याकडे पन्नास घोडेस्वार पथकाचे नायकपद होते. मल्हारराव- गौतमाबाई यांच्या विवाहाने दोन राजकीय घराणी एकत्र आली. राजकीय सल्ला- मसलत आणि तत्कालीन राजकारणाच्या निमित्ताने मल्हारराव हे चोंडीस माणकोजी शिंदे यांच्याकडे येत असत. राजे मल्हारराव व राजमाता गौतमाबाई यांना खंडेराव नावाचा इ.स.१७२३ मध्ये जन्मलेला एकमेव पुत्र होता.

एके दिवशी अशाच फिरतीवर राजे मल्हारराव चोंडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी बाल अहिल्येस पाहिले. अहिल्येचे धाडस, अहिल्येचा हजरजबाबीपणा, अहिल्याची जाण, झेप पाहून मल्हारराव खुप प्रभावित झाले. राजे मल्हाराव यांनी माणकोजी शिंदे पाटील व सुशिलाबाईंकडे अहिल्या व खंडेराव यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माणकोजी शिंदे पाटील, सुशिलाबाई व शिंदे कुटुंबाने तो प्रस्ताव आनंदाने स्वीकारला आणि २० मे १७३३ ला अहिल्या खंडेराव यांचा विवाह संपन्न झाला. अहिल्यादेवी इंदोरच्या होळकर घराण्यात सामील झाल्या. सर्वांनीच अहिल्यादेवीचं आनंदानं स्वागत केलं.

मल्हारराव होळकर हे उत्तर भारतात मराठेशाहीचे नाक होते. इ.स. १७३० मध्ये झालेल्या मराठे व मोगल, मराठे व महंमद बांगश या युद्धांच्या वेळी मल्हारराव होळकर हे मराठ्यांचे सेनापती होते. २० जानेवारी १७३४ ला छत्रपतींनी मल्हारराव होळकरांना माकवा प्रांताची वतने, परगणे, इनामे वंशपरंपरेने चालतील, अशा सनदा दिल्या. मल्हाररावांना खास सुभेदारी वस्त्रे दिली. यातूनच खऱ्या अर्थाने ‘ होळकर राज्य, इंदौर ‘ स्थापन झाले. दहा वर्षांच्या आपल्या सुनेच्या सर्व शिक्षणाची सोय मल्हारराव आणि गौतमाबाई यांनी केली होती. खंडेराव आणि अहिल्या यांचा सुखात संसार सुरू होता. या सुखी संपन्न जोडप्यास अहिल्यादेवींच्या पोटी १७४५ मध्ये मालेराव नावाचा मुलगा झाला. इ.स. १७४८ मध्ये मुक्ता नावाची सुकन्या जन्माला आली. मालेराव आणि मुक्ताबाई यांचे बालसंगोपन होळकर घराण्याला साजेशे असे झाले. मालेरावाचे दोन विवाह झाले होते. मुक्ता हिच्या विवाहासाठी अहिल्यामातेने स्वयंवर जाहीर केले होते. संस्थानात दरोडे, चोरी, लुटारू यांचे प्रमाण वाढलेले होते. जो तरूण पराक्रमाने या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करेल त्या युवकासोबत मुक्ताचा विवाह करण्यात येईल आणि होळकर कुटुंबाकडून अशा तरूणास सर्वच प्रकारचे सहकार्य केले जाईल असे अहिल्यामाईंनी जाहीर केले.

यशवंत फणसे नावाच्या युवकाने ही जबाबदारी स्वीकारून यशस्वी केली. अहिल्यामातेने या युवकासोबत म्हणजे यशवंत सोबत मुक्ताचा विवाह लावून दिला. खासगीतून त्यास स्वतंत्र वतनदारीही दिली. यशवंत फणसे अतिशय धाडसी व प्रामाणिक युवक होता.
राजे मल्हारराव होळकर यांच्या मार्गदर्शनाने खंडेराव होळकर व अहिल्याराणी होळकर यांनी अनेक मोहिमा जिंकून मालवा हे राज्य सुरक्षित व मोठे केले होते. सदैव प्रजेच हीच जोपासणारे हे दाम्पत्य होते. सर्व व्यवस्थित चालले असताना अहिल्यामातेवर दुःखाचा डोंगर कोसळला. पती खंडेराव होळकर यांचा १७ मार्च,१७५४ ला कुंभेरी किल्ल्याच्या लढाईत त्यांना वीरमरण आले. अहिल्यादेवी वगळता खंडेराव यांच्या इतर दोन बायका पार्वतीबाई व कुंवरबाई या सती गेल्या. सासरे मल्हारराव यांनी आपल्या पुत्राच्या चितेस अग्नी दिला. अशा रितीने अहिल्यामातेचा सुखी संसार वयाच्या एकविसाव्या वर्षी अग्नीच्या साक्षीने संपला. मालवाचे हित पाहून राजे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. मल्हारराव यांनी राज्याची सर्व सूत्रे अहिल्यामातेकडे दिली.

अहिल्यादेवींना २९ सप्टेंबर, १७६१ ला दुसऱ्या एका दुःखाला सामोरे जावे लागले. ते म्हणजे त्यांचा फार मोठा आधार असलेल्या त्यांच्या सासूबाई ( आई ) गौतमाबाई यांचे आजारात अचानक झालेले निधन. मुलगा खंडेरावाच्या मृत्यूनंतर गौतमाबाईंना डोंगराएवढे हे दु:ख गिळून अहिल्यामातेला सावरले होते. सती जाण्यापासून रोखले होते. लग्न झाल्यापासून सासरी आल्यानंतर याच गौतमाबाईचा मोठा आधार अहिल्यामातेला होता. तोच आधार आता गळून पडला होता. अहिल्यामातेला आलेले लागोपाठचे दुःख म्हणजे २० मे, १७६६ रोजी सासरे राजे मल्हारराव होळकर यांचा वृद्धापकाळाने झालेला मृत्यू आणि दुसरे म्हणजे २३ ऑगष्ट,१७६६ ला अहिल्यामातेचा मुलगा मालेराव यांनी सनद मिळवून राज्यकारभार सुरू केला होता. परंतु काळाने त्यांच्यावरही झडप घातली आणि आजारी असताना २७ मार्च, १७६७ ला मालेरावांचाही मृत्यू झाला.

अहिल्यामातेच्या जीवनात जणू दुःखाची मालिकाच सुरू झालेली होती. पुढील काळात जावई यशवंत व मुलगी मुक्ता यांचा एकूलता एक मुलगा ज्याचं नाव नाथोबा हा नोव्हेंबर १७९० मध्ये आजारात मृत्यूमुखी पडला. तर पुत्र वियोगाने खचलेले जावई यशवंतराव यांचा ३ नोव्हेंबर १७९१ साली मृत्यू झाला. मुक्ताबाई सती गेल्या. वृद्धापकाळात जवळचा रक्ताच्या माणसांची सोबत पाहिजे असते पण अहिल्यामाता पूर्णपणे एकट्याच राहिल्या होत्या. लोकमाता अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक, प्रजाहित दक्ष लोकमाता होत्या. त्या स्वतः शूरसेनानी, लढवय्या होत्या. सैन्य उभं करणं, नवीन शस्त्र तयार करणं, खरेदी करणं, तोफा तयार करणं, शस्त्रांचे भांडार तयार करणे, युद्धशाळा, राजशाळा, अश्वशाळा चालविणे ही सर्व कामे त्या स्वतः करत असत. स्वतः च्या सर्वच दुःखावर पांघरून घालून देशभरात शेकडो सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे अहिल्यादेवींनी सुशोभिकरण केले. ज्यातून भारताच्या सौंदर्यात आणि निधर्मीपणात भर पडली. परंतु धार्मिक अवडंबर कधीच केला नाही.

शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांना विशेष अर्थसहाय्य, शेतीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठा उपलब्ध करणं, कलाकार, शिल्पकार, कलावंत यांना आश्रय देणं, आदिवसींचं पुनर्वसन, अस्पृश्यता निर्मुलन, खासगी उत्पन्नातून प्रार्थनास्थळांचे बांधकाम, समाज मंदिरे, धर्मशाळा, नद्यावर घाट बांधणे, बारा ज्योर्तिलिंग जिर्णोद्धार, गावोगावी पाणवठे बांधकाम, हुंडाबंदी, विधवा विवाह, सतीबंदी, अस्पृश्यता निवारण इत्यादी कामे त्यांनी केली.

अहिल्यादेवींचं जीवन हे समाजाला जेवढे आनंददायी, सुखद, प्रजावत्सल म्हणून माहित आहे. तेवढेच ते प्रचंड दुःखानी भरलेलं आहे. दु:खामुळे त्या आतून पूर्णपणे पोखरल्या होत्या. त्यांचं हे दुःख हलके करण्यासाठी राज्यातील प्रजेने त्यांना ‘लोकमाता’ मानले आणि पाहता – पाहता अहिल्यादेवी प्रत्यक्षात लोकमाताच झाल्या. अशा लोकमाता अहिल्यामाता होळकर यांचा मृत्यू १३ ऑगष्ट, १७९५ रोजी झाला. या महामातेच्या कार्याला विनम्र अभिवादन व कोटी – कोटी वंदन !…..

✒️मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल,धरणगांव)