नव्या युगाची वटपौर्णिमा

  73

  हातात स्मार्ट मोबाईल असणाऱ्या महिलांना जाहीर आव्हान

  वडाला फेऱ्या मारण्यास सांगणाऱ्या सावित्रीची जन्म, शिक्षण, आई वडील, नवरा त्यांचे गांव, तालुका, जिल्हा राज्य गुगल वर सर्च करा. आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची माहिती गुगल वर सर्च करा.१९ व्या शतकात महात्मा फुले व सावित्रीमाई यांनी आपले हक्काचे घर सोडले, अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, समाजाची दुषने झेलली. ते फक्त मुलींना शिकता यावे म्हणून. त्यांना वाटायचं मुली शिकल्या म्हणजे मानसिक गुलामी तुटेल.त्या स्वतंत्रपणे विचार करु शकतील. पण आज २१ व्या शतकात आम्ही शिक्षणाने वरकरणी बदल स्वीकारले. पण सावित्रीमाईंच्या शिक्षणाचा अर्थ खूप व्यापक होता. आपण जे जे करतो त्याची चिकित्सा करता यावी हे शिक्षणाने साध्य व्हाव असं सावित्रीमाईंना वाटायंच. लहानपणापासून आपली आजी, आई काय करते त्या साच्यात तिचे मडके घडत असते. पूर्वीच्या काळाचा जर विचार केला तर त्यांना शिक्षणापासून जाणिवपूर्वक दूर ठेवले होते त्या व्यवस्थेने जे जे सांगितले ते सर्व त्यांनी निमूटपणे केले. पण आज स्री कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. तिने सर्व क्षेत्रांत उत्तुंग भरारी मारलीय. त्यामूळे जसे आले तसे स्वीकारण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणे गरजेचे आहे. वटपौर्णिमा हे प्रत्येक हिंदू स्री ने सात जन्म हाच पती मिळावा म्हणून करायचे व्रत आहे. बरं सहज प्रश्न पडतो प्रत्येक हिंदू स्री हे व्रत दरवर्षी करते तर एकही “विधवा” स्री दिसलीच नसती!.

  बरं असा एखादा उपवास आहे का की नवरा हीच बायको सात जन्म मिळावी म्हणून करतो. या व्रताबाबत विशेष म्हणजे दारु पिवून गटारात लोळून येणाऱ्या व बायकोला बेदम मारणाऱ्या नवऱ्यासाठी ही हे व्रत बायका करतांना दिसतात.याला काय म्हणायंच???.
  वटपौर्णिमे बाबत एक मार्मिक किस्सा डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी सांगितला होता की एका गावात काही बायका मनोभावे हे वडाला प्रदक्षिणा घालीत व्रत करत आसतात. तेवढ्यात एक बाहेर गावचा तरुण येतो व एका स्री ला ओढत घेऊन जातो,वेढे मारायला विरोध करतो. जेव्हा त्याला गावकरी याबाबत विचारतात तर असे कळते की ती त्याची बायको आहे व गेल्या दोन वर्षापासून ती सासरी नांदत नसून माहेरातच रहात आहे.नवऱ्याच म्हणणे अगदी योग्य की याच जन्मात आमचे पटत नाही तर पुढच्या सात जन्मी मी तसाच राहू काय?.कशाला हे व्रत करते? या व्रताची आख्यायिका हे सांगते की अश्वपती नावाचा एक राजा असतो. त्याला अपत्य नसते.देवीच्या पूजेनंतर १८ वर्षांनी त्याला मुलगी होते.

  तिचे नाव “सावित्री “. ती खूप सुंदर, रुपवान असते. ती उपवर झाल्यावर अमात्यांना सोबत घेऊन वराच्या शोधात निघते. एका जंगलात तिला सत्यवान भेटतो. त्याचे राज्य जावून तो परागंदा झालेला असतो. तसेच सत्यवानाचे वडील हे अंध असतात. तरीही अश्वपती या लग्नाला तयार होतात. जंगलात मोठ्या थाटामाटात हा विवाह संपन्न होतो. लग्न झाल्यावर बरोबर १ वर्षाने सत्यवान- मरतो. यम त्याचे प्राण घेऊन निघतो.त्यावेळी सावित्री त्याचा पाठलाग करते. यम तिला समजावतो पण ती परत जात नाही. ती पतीच्या प्राणासाठी खूप हट्ट धरते.त्यावेळी यम तिला वरदान देतो. ती तीन वर मागते ते असे की (१) माझ्या सासऱ्याला त्यांचे राज्य व ते बघण्याची दृष्टी, (२) निसंतान पित्याला १०० पुत्र होवू दे व (३.) माझा संसार सुखी व दीर्घायु होवू दे. व त्यानंतर वडाच्या झाडाखाली सत्यवान जिवंत होतो. अशी ही कथा आपल्याला आदर्श घालून देते की स्वतःसाठी काहीच मागायचं नाही. ही कथा आणि अशा अनेक व्रतांच्या कथा पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणीच घालतात. बाईचं समाजातील स्थान हे धर्मग्रंथांनी नेमून दिलेलं आहे.ते ती कशाप्रकारे पार पाडते यावरुन तिची समाजातील किंमत ठरते. या प्रथा परंपरांची बाई उत्तम वाहक असते. ज्याप्रकारे पुरुषाच्या कर्तृत्वाचं मुल्यमापन होतं, तसं बाईच्या कर्तृत्वाचं मुल्यमापन होत नाही. त्यामुळे बाया परंपरा सोडायला तयारच होत नाहीत. कारण त्यांना त्यातूनच मान मिळतो. बाई त्यात स्वतःला सुरक्षित समजत असते. वटसावित्रीसारखी व्रते काही बायका केवळ हे पटत नसतांनाही समाज काय म्हणेल या धाकापोटी करतात.केवळ दबावापोटी करतांना दिसतात. समजा एखाद्या स्रीने लग्नाच्या दोन-तीन वर्ष हे व्रत केले व पुढे त्यांचे बिनसले व घटस्फोट घेण्याची वेळ आली तर हाच नवरा तिला सात जन्म मिळाला तर चालेल काय?.

  भारतीय संस्कृतीत व्रतवैकल्यांची योजना एकप्रकारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होती. खरं तर काळ बदलला आपण आपल्या कृतीने आधीच निसर्गाची अपरीमित हानी केलीय. शहरीकरणाने, रस्तारुंदीकरणाने मोठमोठाल्या वडांच्या झाडांच्या कत्तली झाल्यात व त्यात भर म्हणजे वटपौर्णिमेच्या निमित्ताने बायका सर्रास या दिवशी महानगरांमधे वडाच्या झाडांच्या फांद्या विकत घेवून पूजतात. कहर म्हणजे एक वनस्पती शास्राची डॉक्टरेट प्राध्यापिकाही असेच वागते, तेव्हा तिच्या शिक्षणाचा उपयोगच काय? ही एक प्रकारे निसर्गाप्रती कृतघ्नताच नाही का? व्रतांच्या निमित्ताने उपवास आलाच,आधीच आम्हा बायकांच हिमोग्लोबीन लेवल कमी, त्याची किंमत ढासळत जाणाऱ्या आरोग्याने मोजावी लागते. भारतीय संस्कृतीतील सर्व व्रते सवाष्ण बायकांनी करावयाची आहेत.म्हणजे जिचा पती जिवंत आहे तिलाच सगळीकडे मान. यानिमित्ताने आपण विधवा, परीत्यक्ता स्रियांच माणूस असणं तर नाकारत नाही ना? यासाठी आता कालसुसंगत विचार होणे गरजेचे आहे. आनंदाच्या नव्याने व्याख्या कराव्या लागतील.वडाला फेरे घालत स्वतःच्या वेळ अन् श्रमाचा अपव्यय करण्यापेक्षा पतीला व कुटूंबाला आयुष्यभर पुरेल एवढे “ऑक्सिजन देणारे एक वडाचे झाड लावले तर ही तुमच्या पतीप्रती असलेल्या प्रेमाची सच्ची पावती ठरेल”. पूरोगामी विचाराच्या पतीने बऱ्याचदा सांगितले पण फारस मनावर न घेता सगळ्याजणी करतात म्हणून करत आले. लॉकडाऊनच्या निमित्ताने अनेक वैचारिक पुस्तके वाचण्याचा योग आला व एक नवी दृष्टी लाभली.

  यंदाची वटपौर्णिमा ३ जून ला आहे निश्चितच माझ्यासाठी खास…मस्तपैकी कुंडीत वडाची फांदी लावायची.त्याच बाळसेदार रोपटं झालं की मुले फिरण्यासाठी जातात त्या जवळच्या टेकडीवर रोपण करायचं. असे मी ठरवले. आपण महिला सुशिक्षित असाल तर असे रोप लावा जे येणाऱ्या सात पिढीला सावली आणि ऑक्सिजन देणारे असेल.ते तुमचे नांव कायम ठेवील.रीतीरिवाज परंपरा सांगणारी गुलामी सोडा.निसर्ग नियमांचे आणि विज्ञानाने दिलेल्या वरदानाचे पालन करा सदा सुखी राहाल!

  ✒️सौ.ज्योती थोटे-गुळवणे(मो:-९८५०२११९४३ अंबड,जालना)