जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्राला भूमी अभिलेख कार्यालयाने दाखवली केराची टोपली

36

🔹गेवराईच्या भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.11जून):-येथील भूमी अभिलेख कार्यालयात मौजे पांढरी येथील शेतकरी किसन तिवारी व गणेश कोल्हे यांनी दि.७.१०.२०२२ रोजी नक्कलेसाठी मागणीचा अर्ज केला होता. परंतू भूमी अभिलेख कार्यालयात चक्करा मारुन मारुन वैतागून सात महिने उलटूनही नक्कल न मिळाल्याने संबधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय बीड,अभिलेख शाखा यांनी भूमी अभिलेख कार्यालय, गेवराई यांना दि.१५ मे २०२३ रोजी संबंधित शेतकऱ्यांना सदरील मागणी केलेली नक्कल देण्यात यावी असे लेखी पत्र पाठविले. परंतू सदरील पत्र मिळून एक महिना होत आहे तरी संबधित शेतकऱ्यांना नक्कल मिळाली नाही. तर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पत्राला सुध्दा न जुमानता भूमी अभिलेख कार्यालयातील संबधित कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे संबधित शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तक्रारी अर्जात म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की मौजे पांढरी येथील किसन गणेश तिवारी, गणेश बाबुआप्पा कोल्हे या शेतकऱ्यांनी पैठण उजवा कालवा वितरीका क्रं.३८ वरील मौजे पांढरी व भोगलगाव ता.गेवराई जि.बीड फाईल क्रं.६२/८८ च्या नक्कल मिळणे बाबत दि.७.१०.२०२२ रोजी नक्कलेसाठी अर्ज केला होता. परंतू तब्बल ८ महिने झाले तरी अद्याप नक्कला मिळाल्या नाहीत. प्रत्येक हफ्त्यातून दोन वेळेस चकरा मारल्या परंतू सदरील कर्मचारी भेटत नाहीत. तरी अर्जाची दखल घ्यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, बीड या ठिकाणी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून अर्ज केला असता त्यांनी गेवराईच्या भूमी अभिलेख कार्यालयाला लेखी पत्र दिले परंतू त्या पत्राला भूमी अभिलेख कार्यालयातील संबधित कर्मचाऱ्याने केराची टोपली दाखविल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे. परत संबधित शेतकऱ्यांनी शुक्रवार दि.९ जुन रोजी भूमी अभिलेख कार्यालयाकडे तक्रार अर्ज करुन त्यामध्ये भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडुन नक्कल न मिळाल्यामुळे आमचे कोर्टाचे प्रकरण स्थगित असल्याचे म्हटले आहे.

@ *चौकट-*
आम्ही गेल्या आठ महिन्यांपूर्वी नक्कलेसाठी अर्ज केला आहे. आम्ही कामधंदे सोडून भूमी अभिलेख कार्यालयात चक्करा मारत आहोत. परंतू आल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयात संबधित अधिकारी व कर्मचारी यांची भेट होत नाही भेट झाली तर नंतर या बघू अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आम्ही चक्करा मारुन मारुन परेशान झालो आहोत याचा विचार करावा भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडुन नक्कल न मिळाल्यामुळे आमचे कोर्टाचे प्रकरण स्थगित आहे असे किसन गणेश तिवारी, गणेश बाबुआप्पा कोल्हे यांनी म्हटले आहे.