सासऱ्यानेच राहत्या घरी सुनेला कुऱ्हाडीने केले ठार-मोहाडी तालुक्यातील रोहना येथील धक्कादायक घटना

97

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा (दि. 17 जून): – सासऱ्यानेच राहत्या घरी सुनेला केले ठार. सदर माहिती रोहना या गावी सासरा व सुनेतील वाद इतके विकोपाला गेले की सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या मानेवर आणि पाठीवर सपासप कुऱ्हाडीचे वार घालून तिची हत्या केल्याची घटना मोहाडी तालुक्यातील रोहना येथे 16 जून 2023 सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान घडली. बळवंत रघुजी ईश्वरकर (55) रा. रोहना असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. तर पिंकी सतीश ईश्वरकर (25) सुनेचे नाव आहे. मृतकेला अडीच वर्षाचा एक लहान मुलगा आहे.

आरोपी बळवंत ईश्वरकर हा मुलगा सतीश व सुन पिंकी ईश्वरकर (25) व अडीच वर्षांच्या नातवासोबत एकाच घरात उदरनिर्वाह करीत होते. आरोपी सासरे याच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले होते. काही दिवसांपासून सासरा व सुनेत नेहमी भांडण होत असल्याचे शेजाऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली.

सकाळी मृतक पिंकी भांडे घासत असतांना आरोपीने मागेहून येऊन पिंकीच्या मानेवर व पाठीवर कुऱ्हाडीने वार केला, तशीच ती रक्ताबंबाळ होऊन खाली पडली. यावेळी तिचा पती व मुलगा हे किराणा दुकानात गेले होते. आरोपीने हत्या करून सरळ मोहाडी पोलीस स्टेशन गाठले व गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला. पुढील तपास संबंधित पुलीस अधिकारी करीत आहेत.