अमरावती मोर्शी वरूड महामार्गावरील शेकडो वाळलेली झाडे ठरताहेत धोकादायक !

30

🔹जीर्ण वाळलेली झाडे तोडणार कधी ; राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष !

🔸अमरावती मोर्शी वरूड महामार्गावरील सुकलेली जीर्ण झाडे अपघाताला निमंत्रण !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.18जुन):- जिल्ह्यातील महत्वाच्या अमरावती मोर्शी वरूड पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाळलेली झाडे सद्यस्थितीत पावसाळ्यात मृत्यूचा सापळा बनून उभी आहेत. ही झाडे तोडून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.

राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या कडेला उभी असलेली भली मोठी झाडे जीर्ण झालेली आहेत. काही वाळलेल्या झाडांच्या फांद्या मोडून पडतील, अशा स्थितीत आहेत. ज्या रस्त्यावरुन वाहनांची वर्दळ जास्त असते, अशा ठिकाणी हमखास अशी झाडे मृत्यूचा सापळा बनून उभी आहेत. उन्हाळ्यात जरी या झाडापासून सावली मिळत असली तरी पावसाळ्यात अशा झाडांची भीती कायम मनात घर करुन राहते. चालत्या वाहनावर झाड पडून जीवितहानी झाल्याचे अनेक घटना जिल्ह्यात घडत असतांना निदान पावसाळ्यात तरी राष्ट्रिय बांधकाम विभागाने या झाडाबाबत विचार करणे गरजेचे आहे.

अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर सद्यस्थितीत काही झाडे ही वाळलेली असून ती मोडून पडण्याची शक्यता आहे तर बरीच झाडे जीर्ण असल्याने ती वादळी पावसात मोडण्याची भीती आहे. ही झाडे पूर्णतः रस्त्याच्या बाजूस वाकली असून ती तोडून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करणे गरजेचे आहे. अमरावती मोर्शी वरूड मार्गावर मोठ्या प्रमाणात धोकादायक स्थितीत वाळलेली झाडे उभी आहेत. पावसाळ्यात अशी झाडे मोडून कधीही खाली पडू शकतात. त्यापासून वाहन चालकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होत असून राष्ट्रीय बांधकाम विभागाने महामार्गावरील अपघाताला आमंत्रण देणारी वाळलेली झाडे तात्काळ तोडावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग किती अपघात होण्याची वाट पाहणार ?

अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असतांना वाहनधारक तसेच नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्ग रस्त्यावर मोठी धोकादायक वाळलेली झाडे उभी आहेत. ही झाडे वादळी वाऱ्याने पडली जाण्याची दाट शक्यता आहे. या कसरतीत अनेकवेळा अपघात ही घडले आहेत तर काही जणांना जीवाला मुकावे लागले आहे. असे असतानाही या गंभीर विषयाकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे या गंभीर विषयाची दखल राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने तत्काळ दखल घ्यावी — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.