आरोग्यम धन संपदा!

30

(विश्व योग दिवस सप्ताह विशेष)

दररोज योगा केल्याने आपल्या शरीरावर सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन इष्ट परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खुप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे आपले श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. तो सर्वांना वर्तमानात जगायला शिकवतो. योगासनांमुळे स्नायूंना बळ मिळते. नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. तणाव दूर होऊन चांगली झोप लागते; आपली पचनक्रियाही सुधारते. अलककार- श्री कृष्णकुमार निकोडे गुरूजींचा हा माहितीपूर्ण लेख…

शरीर आणि मन निरोगी ठेवणाऱ्या जागतिक योग दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. इंटरनॅशनल योगा डे- आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दि.२७ सप्टेंबर २०१४मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता; दि.११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने जाहीर केले की, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. त्यानुसार हा दिवस साजरा केला जातो. दि.२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. या दिवशी संपूर्ण जगभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताची राजधानी दिल्ली येथे राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली.

योगाचे प्रमाणित ग्रंथ जसे- शिवसंहिता व गोरक्षशतक यांमध्ये चार प्रकारचे योग सांगितले आहेत- १) मंत्रयोग: यात वाचिक, मानसिक, उपांशू व अणपा २) हटयोग ३) लययोग ४) राजयोग: यात ज्ञानयोग व कर्मयोग येतात. पतंजलीप्रमाणे योगाची आठ सूत्रे- १. यम- खरे बोलणे, अहिंसा, लोभ न करणे, विषयासक्ती न धरणे आणि स्वार्थी न होणे. २. नियम- पवित्रता, समाधानी, तपश्चर्या, अभ्यास व ईश्वर चरणी जाणे ही होत. ३. आसन- बसण्या-उठण्याच्या पद्धती. ४. प्राणायाम- श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वास रोखून धरणे महत्त्वाचे. ५. प्रत्याहार- बाह्य वस्तू, इंद्रियांपासून प्रत्याहार. ६. धारणा- एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे. ७. ध्यान- याबाबत प्रकृतीचे चिंतन करणे. ८. समाधी- ध्यान करणाराच्या वस्तूंचे चैतन्यासह विलिनीकरण करणे समाविष्ट आहे. याचे सविकल्प व अविकल्प हे दोन प्रकार आहेत. अविकल्पात जगाकडे परतण्याचा मार्ग नसल्यामुळे ही योगपद्धतीची चरमस्थिती मानतात. तर श्रीमद भगवद्गीतेतील योग तीन प्रकारचे- कर्मयोग- व्यक्ती आपल्या स्थितीच्या योग्य कर्तव्यानुसार श्रद्धेप्रमाणे कार्य करतात. भक्तियोग- यात भगवद कीर्तन मुख्य आहे. भावनात्मक व्यवहारी लोकांना हे सुचवले जाते. ज्ञानयोग- यात ज्ञानप्राप्ती करून ज्ञानी होणे अभिप्रेत आहे.

योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. योग भ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. २१ जून हा वर्षातील इतर दिवसांपेक्षा सर्वांत मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशीरा होतो. दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योगसाधना केल्या जातात. प्राचीन काळापासून आजतागायत या सर्व साधना गुरु-शिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या. परंतु तरीही लोकांच्या मनात योगाविषयी हवी तेवढी जागरूकता नव्हती. त्याचे महत्त्व काही मर्यादित लोकांनाच माहित होते व लोकांच्या मनात त्यांविषयी काही गैरसमजही होते. उदा- योग अंगीकारणे म्हणजे संसारापासून दूर जाणे किंवा योग हा फक्त हिंदूधर्माचा भाग आहे, इत्यादी. तसेच काही लोकांनी त्यातील साधनांमध्ये अन्य विचित्र गोष्टींचे मिश्रण करून त्यांचे स्वरूप विकृत करून टाकले होते; उदा.बियर योग, डॉग योग आदी. योगाच्या प्राचीन शास्त्रशुद्ध परंपरेतील साधनांविषयी लोकांच्या मनातील गैरसमज दूर करून जागरूकता उत्पन्न व्हावी आणि अधिकाधिक लोकांनी योगाभ्यास करून आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले करावे, हा जागतिक योग दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. जागतिक योग दिनामुळे समाजाच्या सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यास मदत झाली आहे.

जागतिक योग दिनानिमित्त शासकीय तसेच इतर स्तरावरूनही योगाशी संबंधित अनेक कार्यक्रमांचे मोठ्या उत्साहाने आयोजन केले जाते. त्यामध्ये योगासने, शुद्धिक्रिया, प्राणायाम अशा अनेक योगसंबंधित क्रियांचे प्रात्यक्षिक दाखवले जाते आणि योग-तत्त्वज्ञान, योगाचे प्राचीन ग्रंथ, योगातील साधना, योगचिकित्सा आदी अनेक विषयांची माहिती देणारी व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांसाठी सामूहिक स्वरूपात सूर्यनमस्कार, योगासने आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. म्हणून सद्यस्थितीत योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. सन २०२०मध्ये आलेल्या कोविड साथीमुळे शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य देखील अधिक धोक्यात आले. अशा काळात असंख्य लोक महाजाल- इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र येऊन योगसाधना करताना दिसत आहेत. सन २०२० व २०२१मध्ये ज्याठिकाणी कोविड साथीमुळे लोकांना एकत्र येऊन योगसाधना करणे शक्य नव्हते, तेथे महाजालकाच्या माध्यमातून एकत्र येऊन मोठ्या उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला होता.

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे विश्व योगा दिनाच्या समस्त मानवास संपूर्ण सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️अलककार:- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
रामनगर वॉर्ड नं. २०, गडचिरोली, फक्त व्हॉट्स ॲप.नं. ९४२३७१४८८३