अभंग-जागतिक योग दिन

34

जागतिक योग । एकवीस जून ॥
आरोग्याचा दिन । जगात या ॥ १ ॥

योग नि योगाने । प्रतिमा जगात ॥
होई वृद्धिंगत । भारताची ॥ २ ॥

योगाने होणारं । आरोग्य निरोगी ॥
जगात या रोगी । नसणार ॥ ३ ॥

मानवतेसाठी । योग अनमोल ॥
जाणावे हे मोल । सर्वांनीच ॥ ४ ॥

योगाचा अभ्यास । कुठे सामूहिक ॥
कुठे वैयक्तिक । दिसतसे ॥ ५ ॥

करू नये योग । एकाच दिवशी ॥
व्हावी रोजनिशी । माणसांची ॥ ६ ॥

तन मन बुद्धी । जोडणारे शास्त्र ॥
योग हेच शास्त्र । जीवनात ॥ ७ ॥

धावणे -पोहणे । वेगाने चालणे ॥
योगा हा करणे । नियमित ॥ ८ ॥

आहार-विहार । विश्रांती नि योग ॥
दूर होई रोग । जीवनात ॥ ९ ॥

ताण नि तणाव । योगामुळे जाई ॥
पळूनच जाई । पूर्ण व्याधी ॥ १० ॥

प्राणायाम करा । सूर्यनमस्कार ॥
रक्ताचा संचार । शरीरात ॥ ११ ॥

वाढविते योग । फुफ्फुस क्षमता ॥
रक्‍ताची शुद्धता । वृद्धिंगत ॥ १२ ॥

असू द्यावे शुद्ध ।आचार -विचार ॥
राहूनिया दूर । व्यसनाच्या ॥ १३ ॥

मनुष्य संस्कृती । जपणारे शास्त्र ॥
योग एक शास्त्र । भारतात ॥ १४ ॥

जीवनात करू । नियमित योग ॥
दूर होई रोग । तयांचेच ॥ १५ ॥

जागतिक योग। दिनाच्या शुभेच्छा ॥
मनस्वी सदिच्छा । सर्वांनाच ॥ १६ ॥
अभंगकार

✒️प्रा . अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती 
भ्रमणध्वनी : -८०८७७४८६०९