योगदिनाचे महत्त्व

32

” आंतरराष्ट्रीय योग दिन ” हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो . संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिलेली आहे .माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता.संयुक्त राष्ट्राच्या 193 देशापैकी 175 देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता.त्यानुसार 21 जून हा ” आंतरराष्ट्रीय योग दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो.पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन राजपथ,नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
योगाचा अभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहिती व्हावी याशिवाय संपूर्ण जगामध्ये योगाचा प्रसार व्हावा यासाठी योगदिनाचा ओनामा करण्यात आला.

निरोगी शरीर व स्वास्थ्यासाठी योग अतिशय मोलाचा आहे.
नियमित योग केल्यास शरीराला उर्जा व मनाला शांतता लाभते.
भारतीय संस्कृतीमध्ये योगाला महत्त्वपूर्ण स्थान आहे.प्राचीन काळी आपल्या देशात योगविद्येचा स्वीकार व प्रसार केला होता.संपूर्ण जगात योगाचा प्रचार व प्रसार पूर्णपणे झाला तर संपूर्ण जग निरोगी होऊन शांततापूर्ण जीवन जगणार हे निश्चित.

योगामुळे शरीर व मनाला विविध प्रकारचा फायदा होतो. योग हा ध्यान आणि व्यायामाचे रूप आहे.योगामुळे मानवी जीवन निरोगी झाल्यामुळे आनंदित होते. म्हणूनच जूनच्या एकवीस तारखेला ” जागातिक योग दिन ” हा भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात उत्साहाने साजरा करण्यात येतो.

योगामध्ये असलेल्या विविध आसनांचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम योगगुरू पासून या सर्व आसनांचे प्रशिक्षण घेऊन योगगुरुंनी सांगितल्यानुसार सर्व असनांचा सराव करणे आवश्यक आहे.
रोज सकाळी उठून योग केल्यास शरीरातील विविध रोग नष्ट होण्यास मदत होते म्हणूनच म्हणतात ” करो योग रहो निरोग “
मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता आहे .
एकवीस जून या योग दिनी संपूर्ण जगात योगपूर्ण जीवन पद्धती आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात येत येते. जीवन सुखी,समृद्ध व मोदमय होण्यासाठी मन आणि शरीर योगयुक्त बनवून जीवनाची शांततापूर्ण मार्गाने वाटचाल केली जाते.योगासने,प्राणायाम,ध्यान याचे महत्त्वच समजावून सांगितले जात नाही तर योगगुरूकडून त्याचे प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून शिकविले जाऊन एकाच दिवशी शेकडो योगगुरू कडून लाखो लोकांना एकाच वेळी सराव करून घेण्यात येतो
योगदिनी योगाचे मह्त्व जनसामांन्यांना माहिती झाल्यामुळे 22 जूनपासून योगशाळेत किंवा स्वगृही योगाला प्रारंभ होऊन जनसामान्यांचे जीवन शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुखी व समृद्ध होते. प्रसारमाध्यम,सोशल मिडिया व इंटरनेटद्वारे योग
दिनाचे महत्त्व व संदेश सर्वत्र पोहोचविले जातात.चौका-चौका मध्ये लावलेल्या मोठमोठ्या फलकांवरील ( होर्डींग ) योग दिनाच्या शुभेच्छा,योग दिनाचे मोल सांगणाऱ्या घोषणा आणि काव्यपंक्ती जनतेचे लक्ष वेधून घेत असतात. उदा .

मानवतेसाठी । योग अनमोल । जाणावे हे मोल । सर्वांनीच ॥

ताण नि तणाव । योगामुळे जाई ।
पळूनच जाई । पूर्ण व्याधी ॥

वाढविते योग । फुफ्फुस क्षमता ।
रक्ताची शुद्धता । वृद्धिंगत ॥

जागतिक योग । दिनाच्या शुभेच्छा ।
मनस्वी सदिच्छा । सर्वांनीच ॥

प्राणायाम,सूर्यनमस्कार, योगासने,योगचिकित्सा या व इतर योग संबंधी सर्वच गोष्टींची माहिती संपूर्ण जनसामांन्यांना होण्यासाठी शासकीय व खाजगी शाळा,महाविद्यालय आणि कार्यालय या ठिकाणी योग प्रात्यक्षिक व योगाचे महत्त्व योग गुरु आणि योग व्याख्याते यांच्याकडून प्रत्यक्षपणे योगदिनी सांगितले जाते.प्रात्यक्षिक करून दाखविले जाते व सर्वांकडून तसा योग सराव करून घेतला जातो.जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे आयोजन करून त्यामागील उद्देश जाणून घेतला जातो व तो वर्षभर आचरणात आणण्याचे प्रयत्न केले जातात. उदा.आरोग्यासाठी योगा,हृदयासाठी योगा, शांततेसाठी योगा,कौटुंबिक योगा, शांततेसाठी योगा,कल्याणकारी योग,मानवतेसाठी योगा इ .

आज दि.२१ जून २०२३ ला असलेल्या जागतिक योगदिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा॥ आणि योगदिनी केलेला योगा वर्षभर करण्यासाठी व निरामय आरोग्यासाठी मनस्वी सदिच्छा ॥

राज्यस्तरीय शिक्षण भूषण
पुरस्कार प्राप्त
साहित्यिक

✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,रुक्मिणी नगर,अमरावती,भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९