राजर्षी छ.शाहू महाराज मानवतावादी राजे-प्रा.अरुण बुंदेले

43

🔸” उपेक्षित समाज महासंघाचे आयोजन “

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.27जून):-” बहुजन हिताय-बहुजन सुखाय ” ह्या तत्त्वानुसार सामाजिक समता,सामाजिक न्याय,सामाजिक परिवर्तन, सामाजिक क्रांती तसेच मानवतावादी विचारधारेला छत्रपती शाहू महाराजांनी नवीन आयाम दिले.फुले-शाहू – -आंबेडकरांचे पुरोगामी विचारच देशाला जाती धर्माच्या यादवीतून वाचवू शकतात.”असे विचार समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन चौक ) अमरावती येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झालेल्या छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड (अध्यक्ष,उपेक्षित समाज महासंघ),प्रमुख वक्ते समाजप्रबोधनकर्ते प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,प्रमुख अतिथी श्री ओमप्रकाश अंबाडकर, प्रा.एन.आर.होले,श्री वसंतराव भडके,श्री मधुकर आखरे, कामगार नेते श्रीकृष्णदास माहोरे,किसान नेते शंकरराव आचरकाटे,मरार माळी समाज नेते रामकुमार खैरे,जितेंद्र मोरे, यशवंत बादसे होते.अध्यक्ष,प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. अरुण बुंदेले (अध्यक्ष, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान ) आपल्या भाषणात म्हणाले की,” छत्रपती शाहू महाराज यांनी उपेक्षित समाज बांधवांचा उद्धार,शेती,शिक्षण,उद्योगधंदे,कला,क्रीडा,आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये महान कार्य केलेले आहे. जातीभेदाची प्रथा नष्ट करण्यासाठी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाला कायदेशीर मान्यता दिली.सर्व जाती धर्मातील मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करून प्रत्येक जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनेक वसतीगृहांची स्थापना केली म्हणून त्यांना वसतीगृह चळवळीचे जनक म्हणतात. छ.शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे कार्य करणारे मानवतावादी राजे राजर्षी छ. शाहू महाराज होत.”असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ओमप्रकाश अंबाडकर,संचालन श्री सुधीरकुमार घुमटकर तर आभार श्री गोविंदराव फसाटे यांनी मानले.कार्यक्रमाला फुले-शाहू- आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती.