मोर्शी तालुक्यातील पशु विभागाची लसीकरण मोहीम तात्काळ सुरू करा !

27

🔸रुपेश वाळके यांचा पशुधन आयुक्तांना आंदोलनाचा इशारा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.27जून):-पावसाळ्यात जनावरांना विविध साथीचे आजार उद्भवू शकतात, याकरिता जनावरांची काळजी घेण्यासाठी लसीकरण मोहीम तत्काळ सुरू केल्यास भविष्यात साथीचे आजार उद्भवणार नाहीत याकरीता मान्सूनपूर्व साथीच्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे मान्सूनपूर्व जनावरांना लसीकरण मोहीम तत्काळ सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी पशू संवर्धन विभागाकडे केली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या पशू विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे मोर्शी तालुक्यातील लसीकरण मोहीम बंद पडली असून याचा फटका मोर्शी तालुक्यातील लाखो मुक्या जनावरांना बसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जनावरांना तोंडखुरी व पायखुरी (लाळ्या खुरकूत) हा संसर्गजन्य रोग मोठ्याप्रमाणात वाढन्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात गाय, बैल, म्हैस यासारख्या पाळीव जनावरांना घटसर्प, फऱ्या तसेच शेळ्या-मेंढ्यांना आंत्र विषासारखे जिवघेणे गंभीर आजार होतात. या रोगामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांना मे महिन्यात लसीकरण करणे गरजेचे असते. परंतु जूनमध्ये या लशी उपलब्ध झाल्या नाही. सध्या जून महिना सुद्धा संपत आला असून अद्यापही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली नसल्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र दिसत आहे. पशुसंवर्धन विभागामुळेच लसीकरण रखडले असल्यामुळे त्याचा घातक परिणाम मोर्शी तालुक्यातील लाखो पशुधनाच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पशुपालक हताश झाला आहे. या रोगामुळे अनेक जनावरे आजारी पडत असून हा रोग संसर्गजन्य असल्याने अनेक जनावरांना होऊ शकतो.

बैल, गाय, म्हैस, यासारख्या पशूंवर शेती व शेतीला जोडधंदा करत शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो. सध्या नैसर्गिक संकट, दुबार पेरणी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अश्या परिस्थितीत जर एखादे पशु पाळीव प्राणी घाटसर्प व फऱ्या या आजाराने दगावले तर शेतकऱ्यावर आभाळ कोसळलेल्या सारखे संकट उभे होईल. आणि आता या पावसाच्या वातावरणात या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट श्यक्यता असते. म्हणून घटसर्प व फऱ्या या दोन्ही आजारांची एकत्रित रोगप्रतिबंधक लस देण्याची मोहीम वैद्यकीय विभागामार्फत आठ दिवसात लसीकरण मोहिमेला सुरुवात न झाल्यास हजारो पशुपालक यांना सोबत घेऊन पशुधन आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा आक्रमक ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी पशुधन आयुक्तांना दिला आले.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पशुधनाचे विविध रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम हाती घेऊन घटसर्प, एकटांग्या, लाळ्या खुरकूत, फऱ्या, तोंडखुरी, पायखुरी, पीपीआर आदी संसर्गजन्य आजारांसाठी लसीकरण मोहीम प्राधान्याने राबऊन लहान व मोठ्या जनावरांना विविध रोगांपासून संरक्षणासाठी रोग प्रतिबंधक लस उपलब्ध करून पशू पालकांना दिलासा द्यावा — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.