बहुजन समाजातील धगधगता निखारा इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर

34

बहुजन समाजातील एक अष्टपैलू बहुआयामी व्यक्तिमत्त्व, समाज प्रबोधनकर्ते, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, बुद्ध, रविदास, फुले, शाहू, आंबेडकर, गुरु रविदास , मा. कांशीरामजी अशा बहुजन महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजसेवा व समाज प्रबोधन करणारे समाजसेवक, बहुजन समाजातील धगधगता व तेजस्वी निखारा इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब गंगाधरराव देगलूरकरयांच्या दि. १ जुलै २०२३ ला असलेल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ॥

समाज प्रबोधन कर्ते इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त तेजस्वी व धगधगत्या व्यक्तिमत्त्वाविषयी परिचय करून देण्यासाठी हा लेखप्रपंच.

इंजि. चंद्रप्रकाश गंगाधरराव देगलूरकर यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात असलेल्या मुक्रमाबाद या ग्रामात सन 1964 च्या जुलै मासातील एक तारखेला एका गरीब कुटुंबात झाला. आई प्रयागबाई व वडील गंगाधरराव यांच्या सुसंस्कारातून घडलेल्या चंद्रप्रकाश यांनी गरिबीवर मात करून अणुपरमाणू औद्योगिक अभियांत्रिकी पदविका व मास कम्युनिकेशन जर्नालिझम हा विषय घेऊन ते बी. ए. झाले. नोकरी मिळवत असताना 1983 ते 1993 या दशकात पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी फार मोठी उल्लेखनीय कामगिरी केली. दै. लोकमत, दै. लोकपत्र, दै. मराठवाडा, दै. समता दर्पण, दै. रिपब्लिकन गार्ड, साप्ता. पोलीसवाणी, दै. जनसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रात कार्यकारी संपादक, उपसंपादक, याशिवाय जिल्हा प्रतिनिधी, शहर प्रतिनिधी म्हणून निर्भिडपणे त्यांनी लेखन केले. दै. रिपब्लिकन गार्ड या वृत्तपत्रातील प्रखर लिखाणासाठी यशवंतराव चव्हाण ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला. 1992 मध्ये बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणी पोलीस संरक्षणात त्यांनी प्रखर लेखन केले.
इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे दि . 14/06 /1993 ला दुय्यम अभियंता म्हणून तत्कालिन विद्युत मंडळात कंधार येथे रुजू झाले.

महापारेषण कंपनीत जंगमवाडी, नांदे आजपर्यंत त्यांनी कधी स्वतःकडे न बघता सेवेकडे, समाजाकडे अधिक बघितले. अन्याय सहन न करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वदूर परिचित असून ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी मोर्चे काढले, धरणे आंदोलन करून न्याय मिळवून दिला. त्यांनी लिहिलेली अभ्यासपूर्ण व कायदेशीर निवेदने वाचणारे मोठे अधिकारी आश्चर्य व्यक्त करीत. आपण वकील आहात काय ? असा प्रश्न त्यांना विचारीत असत. अन्यायग्रस्तांची बाजू खंबीरपणे, निर्भीडपणे अभ्यासपूर्ण मांडून ते अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देतात. त्यांनी अभ्यासपूर्ण व खंबीरपणे अन्यायग्रस्तांची बाजू मांडल्यामुळे चुका करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निलंबित व्हावे लागले हे विशेष.

समाजप्रबोधनकर्ते इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर यांनी आजवर अनेक संघटना स्थापन केल्या आहेत. सन 1987 ला युवक पत्रकार संघ, सन 1984 ला अखिल भारतीय बहुजन समता परिषद,सन 2000 ला अखिल भारतीय बहुजन विद्यार्थी परिषद, सन 2002 ला अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद, आरोग्य कर्मचारी समता परिषद इत्यादी परिषदांची त्यांनी स्थापना करून त्याद्वारे समाज प्रबोधनाचे व समाज परिवर्तनाचे महान कार्य केले .व आजही करीत आहेत. त्यांनी सन 1996 मध्ये गुरु रविदास अभिवादन यात्रा, 1997 मध्ये गुरु रविदास संदेश यात्रा, सन 2004 मध्ये गुरु रविदास स्वाभिमान यात्रा समविचारी लोकांना घेऊन काढल्या व त्याद्वारे थोर पुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार राष्ट्रीय व राज्यस्तरावर करण्याचे कार्य केले.

इंजि. देगलूरकर यांनी अनेक तीव्र आंदोलने केली. 2004 साली नखेगाव खून प्रकरण, 2012 साली पानभोशी वृद्ध महिला खून प्रकरण, 2015 साली संतोष भालके गोणार खून प्रकरण. यासाठी त्यांनी मोर्चे काढले, रास्ता रोको, धरणे आंदोलने केली. गावोगावी सभा घेऊन प्रबोधन केले व अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून दिला.स्वतःच्या जातीसाठी लढणारे मी खूप बघितले पण स्वतःच्या जाती पलीकडे जाऊन बहुजन समाजासाठी लढणारा योद्धा म्हणून ज्यांची सर्वदूर ख्याती आहे असे इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलुरकर एकच. महाराष्ट्र शासनाच्या महापारेषण कंपनीत कार्यरत असताना नोकरीची किंवा घरादाराची तमा न बाळगता स्वतःला झोकून देऊन बहुजन समाजासाठी रस्त्यावर येणारा, प्राणपणाने लढणारा हा धगधगता निखारा. दि. 14 जून 1993 ला नोकरीस लागल्यावर दीड महिन्यातच तयारी करून लोक शाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करणारे ते महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील पहिले कर्मचारी ठरले पण हे काही लोकांना आवडले नाही. कार्यक्रमाच्यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचा गैरफायदा घेऊन सोबतच काही सहकाऱ्यांनी गावातील लोकांना हाताशी धरून कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम चालू ठेवून श्री देगलूरकर यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत केला व कार्यक्रम यशस्वी केला.

यापुढेही त्यांनी कार्यक्रम घेणे चालू ठेवले. भारतातील आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम कार्यालय परिसरात न घेता बहुजन समाजातील बुद्धीजीवी लोकांना एकत्र आणून जवळच्याच पंचायत समिती कार्यालयात भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला, त्यामुळे संपूर्ण कंधार तालुक्यात जागृती निर्माण झाली. दादासाहेबांनी पुढे असे अनेक कार्यक्रम आयोजित करून ते यशस्वी केले.
समाज प्रबोधनकर्ते इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर यांनी अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलने घेऊन थोर महापुरूषांच्या विचारांचा व तत्त्वांचा प्रचार व प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर केला व आजही करीत आहेत. आत्तापर्यंत अशी सहा संमेलने विविध ठिकाणी भरविण्यात आली. या साहित्य संमेलनाद्वारे बहुजन समाजातील अनेक नवसाहित्यिकांना घडविण्याचे कार्यही ते करीत आहेत. गुरु रविदास सामाजसेवा पुरस्कारांसह विविध पुरस्कार देऊन अनेकांना प्रोत्साहित करण्यात येते.

बहुजन समाजाला आरक्षणाच्या विषया संदर्भात एकत्र करून कंधारच्या तहसील कार्यालयासमोर एक दिवशीय भव्य धरणे आंदोलन इंजि. दादासाहेब देगलूरकर यांनी घडवून आणले पण हे त्यांचे आंदोलनाचे सामाजिक कार्य ज्यांना आवडले नाही त्यांनी मंडळातील वरिष्ठांकडे तक्रारी केल्या परंतु श्री देगलूरकर कामगार चळवळीत सक्रीय असल्यामुळे बाहेर गावी बदली न होता त्यांचा विभाग बदलून देण्यात आला. पुढे त्यांनी कोणालाही न घाबरता सामाजिक कार्य सतत सुरू ठेवले, तेव्हा त्यांना काही विघ्नसंतोषी लोकांनी खोट्या बनावटी पोलीस केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी न घाबरता पुढे आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले.

नांदेड जिल्ह्यातील कंधार जवळील शेकापूर येथे श्री संभाजी केंद्रे या प्रतिष्ठित व्यक्तिची शाळा आणि महाविद्यालय आहे. तिथे शिकत असलेल्या अनिता बसवंते या मागासवर्गीय विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आणि विषप्रयोगाने तिचा खून करण्यात आला. हे सर्वांनाच माहिती आहे. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या कार्यक्षेत्रातील ही घटना असल्यामुळे त्यांनी त्यात भाग न घेण्यासंदर्भात अनेकांनी सांगितले पण आपल्या नोकरीची पर्वा न करता त्यांनी हे प्रकरण उचलून धरले. मानवी हक्क अभियानचे तत्कालीन नेते माननीय अँड. एकनाथराव आव्हाड यांना पाचारण करून प्रकरण योग्य दिशेने नेण्याचे प्राथमिक काम श्री. दादासाहेब देगलूरकरांनी केले. या आंदोलनात त्यांच्यामुळे मातंग आणि बहुजन समाजातील अनेक संघटना व व्यक्ती रस्यावर उतरल्यामुळे हे आंदोलन व्यापक स्वरूपाचे झाले होते. ते अनेक महिने चालले व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला.

अशा अनेक आंदोलनाचे साक्षीदार इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर आहेत. हदगाव तालुक्यातील तामसा येथे एका महाविद्यालयीन बौद्ध समाजाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला. इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आणि श्री लक्ष्मण इंगळे यांनी हे प्रकरण उचलून धरले आणि त्यासाठी आंदोलनही केले. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील दिग्रस वंजारी या गावात संभाजी वाघमारे या परीट जातीच्या व्यक्तीचा उसाच्या फडात रात्री खून झाला. पोलीस स्टेशनमध्ये कोणीही फिर्याद दिली नाही. इजि. चंंद्रप्रकाश देगलूरकर यांना ही वार्ता कळल्यावर ते आपल्या सहकार्‍यांसह दिग्रस वंजारी गावात पोहोचले. तेथील मयताच्या मुलाला विश्वासात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये जाताना येणाऱ्या अडथळ्यांना न जुमानता चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी अक्राळ – विक्राळ रूप धारण करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. तिथे सर्व जाती धर्माचे शेकडो कार्यकर्ते त्यांनी जमा केले. पोलीसही मोठ्या प्रमाणात आले. गावाला आलेले हे छावणीचे स्वरुप बघितल्यावर प्रस्थापितांचे धाबे दणाणले, त्यामुळे गावातील लोकांमध्ये आत्मस्वाभिमान व जागृती निर्माण झाली. लढण्याची हिम्मत निर्माण झाली. हे प्रकरण अँड. एकनाथराव आव्हाड यांना सांगितल्यानंतर त्यांनी या गावाला भेट दिली तेव्हा भव्य अन्याय -अत्याचार विरोधी परिषदेची तयारी इंजि. दादासाहेब देगलूरकर यांनी केली होती. परिषदेच्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. हजारो कार्यकर्ते गगनभेदी घोषणा देत गावात दाखल झाले होते. त्यानुसार जिल्ह्यातून मोठा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यावेळी अँड. एकनाथराव आव्हाड आणि इंजि. देगलूरकर यांची अन्यायाच्या विरोधात अत्यंत आक्रमक आणि प्रक्षोभक भाषणे झाली. इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर यांना बहुजन समाजाबद्दल असलेली तळमळ त्यावेळी सर्वांना दिसली.

टेंभुर्णी येथील चंदर कांबळे खून प्रकरण, शिळवणी येथील कोतवाल खून प्रकारण इंजि. देगलूरकर यांनी पत्रकार म्हणून उघडकीस आणले होते. या माध्यमातून निद्रिस्त यंत्रणेला जागे करण्याचे काम त्यांनी केले. बहुजन समाजावर झालेल्या प्रत्येक अन्यायाच्या विरोधात प्रखर व धारदार लेखणीच्या माध्यमातून आणि सामाजिक आंदोलन व मोर्च्यांच्या माध्यमातून बुलंद आवाज उठवून हजारो अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला.

अशा प्रकारचे धडाडीने समाजकार्य करीत असताना त्यांची लेखणी सुद्धा धारदार झाली, विद्रोही झाली. त्यातूनच त्यांच्या पहिल्या विद्रोही कवितासंग्रहाने 1989 रोजी जन्म घेतला, त्याचे नाव होते
“कातोडं” या विद्रोही कविता संग्रहाने त्यांनी समाज परिवर्तनाचे व समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे. या पुस्तकाला 1990 साली
राज्यस्तरीय अंकूर वाङमय पुरस्कार प्राप्त झाला. आजपर्यंत त्यांनी 28 पुस्तकांचे लेखन करून समाज परिवर्तनासाठी प्रकाशित केलेली आहेत. त्यांचे थोर सत्यशोधक गुरु रविदास, समतावादी विचारवंत गुरु रविदास, परिवर्तनवादी विचारवंत आण्णाभाऊ साठे, विद्येची दाता सावित्रीआई फुले, नखेगाव खून प्रकरण : माहूर परिसरातील नराधम, जात विरुद्ध जात, गुरु रविदास भ्रम आणि वास्तव, महान क्रांतिकारक बिरसा मुंडा, म. बसवन्ना, संत हरळय्या , वीर कक्कया यांची सामाजिक क्रांती, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, गुरु रविदास प्रश्नावली (हिंदी), समतावादी विचारवंत गुरू रविदास (पॉकेट बुक ), रविदास वाणी (हिंदी), बहुजन प्रश्नावली, शिवरायांचा वारसा : राजर्षी शाहू महाराज, धर्मचिंतन (हिंदी), बामणी कावा अशी अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत व त्यातून समाजप्रबोधन व समाजपरिवर्तन केलेले आहे. या पुस्तकांना आणि विविध विषयावर अनेक ठिकाणी दिलेल्या शेकडो प्रबोधनपर व्याख्यानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नांदेड तर्फे कामगार भूषण पुरस्कार 2004, अंकुर साहित्य संमेलनात सत्यशोधकीय पुरस्कार 2012, दर्पण सांस्कृतिक मंच कणकवली येथे दर्पण सन्मान पुरस्कार 2014, महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्याचा साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल नांदेड रत्न पुरस्कार 2014, गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच मालेगाव तर्फे (नाशिक) गुरु रविदास समता मूलक पुरस्कार 2022 अशा अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
समाज प्रबोधनकर्ते इंजि. चंद्रप्रकाश उपाख्य दादासाहेब देगलूरकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि पुढील समाज कार्यासाठी व समाज प्रबोधनपर साहित्य निर्मितीसाठी मनस्वी सदिच्छा !

✒️कवी – लेखक – वक्ता,प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणीनगर, अमरावती .भ्रमणध्वनी :- ८०८७७४८६०९