मोर्शी वरूड तालुक्यातील अटल भूजल योजना फक्त कागदावरच ?

36

🔸मुख्यमंत्री साहेब अटल भूजल योजनेच्या संपूर्ण कामांची चौकशी करा !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.8जुलै):-भुजल पुनर्भरणाच्या उपाययोजनांद्वारे तसेच जल संधारण व कृषी विभागाकडील सूक्ष्म सिंचनाच्या उपाययोजनांद्वारे भुजल पातळीमध्ये सुधारणा करणे हा अटल भूजल योजनेचा मुख्य हेतू आहे. पाण्याच्या अनियमित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे अटल भूजल योजना पांढरा हत्ती ठरत असल्याचे चित्र ड्राय झोन असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुरबाजार तालुक्यात दिसत आहे.

गेल्या दोन वर्षापासून मोर्शी,वरूड, चांदुरबाजार तालुक्यात अटल भूजल योजना फक्त गावाच्या वेशीवरील बोर्डावरतीच दिसून येत आहे. खरेतर या योजनेंतर्गत गाळ काढणे, रिचार्ज शाप्ट तसेच बंधाऱ्याची देखभाल दुरुस्ती करणे, पर्जन्यमापक यंत्र बसविणे, पाण्याची पातळी मोजण्यासाठी पिजोमिटर बसविणे, आदी प्रकारची कामे केली जातात, अशी अनेक कामे ड्राय झोन असलेल्या वरूड,मोर्शी, चांदुरबाजार तालुक्यात करणे गरजेचे आहे. मात्र याकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून जी कामे केली जात आहेत ते निकृष्ट दर्जाची असल्याने या योजनेच्या तीन तेरा वाजल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी करीत सदर ची योजना फक्त कागदावरच राहणार आहे का ? असा सवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.

तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोर्शी,वरूड, चांदुरबाजार तालुका हा कायम दुष्काळीच ठेवायचा आहे काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी उपस्थित केला आहे.दुष्काळ म्हणून उल्लेख असलेल्या मोर्शी, वरूड, चांदुर बाजार तालुक्यात या योजनेचा बट्याबोळ होत असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत आहे. अटल भूजल योजने सहभागी असलेल्या ग्रामपंचायतीला पिझोमीटर बसविण्यासाठी साधारण दोन कोटी रुपयांची कामे करण्यात आली परंतु ती कामे एमबी प्रमाणे नाहीत अशी तक्रार सरपंच करीत आहेत. त्यामुळे या कामात काळा बाजार झाला असल्याची शंका येत आहे. सरपंच व ग्रामपंचायतिने सूचाविलेली कामे अद्याप कुठेही होतांना दिसत नाही. भुजल सर्वेक्षण विभागा कडून फक्त आश्वासणे मिळत असून गावात असंतोष निर्माण होत आहे.

ग्रामपंचायत स्तरावर IEC (जनजागृती) करिता लाखो रुपये येते आहेत. परंतु गावा पर्यंत ते पोहचतांना दिसून येते नाही. पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजने मधील शेतकरी मागील ६ महिन्या पासून ठिंबक स्प्रिंकलरच्या प्रतीक्षेत आहे. वरुड मोर्शी तालुक्यातून ४ हजारच्या वर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले पण लॉटरी चा पत्ता नाही. अटल भुजल योजनेतून २५ % सबसिडी देण्याचे ठरले होते. परंतु त्यातही शेतकऱ्यांना गाजर दाखविण्यात आले आहे. अटल भुजल स्पर्धा ही नाम मात्र असून यात लहान व राजकीय वरदहस्त असणाऱ्या गावांना लाभ मिळनार असून त्यांनाच बक्षिसे मिळतील अशी सोय या स्पर्धेत केलेली असल्याचे दिसून येते. कृषी सिंचन योजना पाणलोट क्षेत्र विकास घटक मधून माती नालाबांध दुरुस्ती व गाळ काढणे सिमेंट नालाबांध दुरुस्ती व गाळ काढणे लघु पाटबंधारे विभागा मार्फत साठवण तलाव बंधारा दुरुस्ती करणे तसेच कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे दुरुस्त करणे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्यामार्फत रिचार्ज शाफ्ट करण्याची जबाबदारी असतांना शेतकरी हिताची योजना फक्त कागदावरच राहत असून जी कामे केली जातात ती निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येते या सर्व कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्यामार्फत नियुक्त केलेली एनजीओ फक्त सर्वेक्षण ठराव व फोटोसेशनचे काम करत असल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षापासून मोर्शी वरूड तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात कामे या विभागामार्फत पूर्णत्वास गेलेले नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटून तसेच संबंधित कार्यालयस भेट देऊन देखील निधी नाही आमचे कर्मचारी पाहणी करून काम करतील, अशी उत्तरे आम्हाला देण्यात येत आहेत. मोर्शी वरूड तालुका अतीशोशित भाग ड्राय झोन मध्ये असून सुध्दा शेतकरी हिताची अटल भूजल योजना राबविण्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरत असून अटल भूजल योजनेचे तीन तेरा वाजवणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाचे कार्यवाही करून संबंधित विभागाच्या संपूर्ण कामांची चौकशी करावी — रूपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मोर्शी तालुका.