1942 : चिमुरचा क्रांती लढा

494

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक क्रांतीकारी शहर म्हणून ओळखले जाते. 1942 च्या भारत छोडो आंदोलनाची सर्वात पहिली दखल चिमूर मध्ये घेण्यात आली. ब्रिटीश सरकारच्या जुलमी धोरणामुळे भारतीय जनता त्रस्त होती. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झालेल्या भव्य सभेत इंग्रजांना ‘चले जाव’ चा नारा देऊन क्रांतीची मशाल पेटविली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर सारख्या लहान गावातही स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत झालेली होती.

9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीच्या अटकेची दखल भारतात सर्वात प्रथम चिमूरने घेतली. अनेक लोक स्वातंत्र संग्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. रविवार दि.16 ऑगस्ट 1942 नागपंचमीचा दिवस होता. येथील अभ्यंकर चौकात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीतील उद्धवराव खेमसकर, गौरसिंग, केशवराव कठाणे, रामचंद्र कामडी, जगन्नाथ डाहुले, बोकारे गुरुजी यांना ब्रिटीश पोलिसांनी पकडले. मिरवणूक समोर वाटचाल करीत होती. लोक नारे लावत होते. ‘भारत माता की जय’ गर्जना करीत होते.

विदर्भात त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने अतिशय लोकप्रिय होती. हजारो लोक त्यासाठी जमत व खंजेरी आणि भजनाने मंत्रमुग्ध होत. राष्ट्रसंतांना महात्मा गांधीच्या अटकेची माहिती होताच त्यांनी ब्रिटीश सरकारच्या निषेधार्थ तरुणांमध्ये स्फुर्ती निर्माण करणारी जोशपूर्ण भजने, खंजेरी निनादात गाऊन जनतेला जागे केले. ‘झाड झडुले शस्त्र बनेगें, भक्त बनेगी सेना’ आणि ‘आते है नाथ हमारे’ या सारख्या भजनाने लोक प्रभावित होऊन देशकार्यासाठी बलिदान देण्यास सज्ज झाले.

चिमूर मधील मिरवणूक नागोबा देवस्थानसमोर येताच निशस्त्र जनतेवर सर्कल इंस्पेक्टरने फायरिंगचा हुकुम सोडला. मिरवणुकीत सर्वात समोर चिमूरचा बालाजी रायपूरकर हा फक्त 16 वर्षाचा मुलगा ‘भारत माता की जय’ असा नारा लावत असतानाच त्याला बंदुकीची गोळी लागली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. लोक बालाजी रायपूरकर यांच्या मृत्यूमुळे अतिशय चिडले. दि. 16 ऑगस्ट 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामातील बालाजी राघोबा रायपूरकर हा पहिला शहीद होता. मिरवणूक चिमूरच्या डाक बंगल्याकडे गेली. लोक हातात सापडेल ते लाठया, काठया, दगड यांचा उपयोग करीत होते. या लढयात पुरुषांबरोबर स्त्रियांचाही सहभाग होता. चिमूर क्रांतीची ज्वाला संपूर्ण देशात पेटली.

चिमूर क्रांतीची माहिती चंद्रपूर व नागपूरच्या ब्रिटीश अधिका-यांना मिळाली. 19 ऑगस्ट 1942 ला ब्रिटीशांनी मोठी लष्करी फौज चिमूरला पाठवली. त्यांनी संपूर्ण चिमूरला घेराव केला. त्वरीत धरपकडीचे सत्र सुरू केले. घराघरातुन लोकांना फरफटत आणून बेदम मारहाण सुरू केली. सैनिकांनी घरातल्या वस्तू लुटल्या. देवघरात संपती दडविली म्हणून देवघरही फोडण्यात आले. पुण्यात जसे प्लेगच्या नावाखाली रँडने अत्याचार केले तसेच चिमूरच्या जनतेवरील अत्याचार होते. चिमूरला काय सुरू आहे हे बाहेरच्या जगाला कळू नये, म्हणून वृत्तपत्रावर बंदी घालण्यात आली. चिमूरच्या 300 ते 400 लोकांना पकडून चंद्रपूरच्या तथा वेगवेगळ्या तुरुगांत ठेवण्यात आले. त्यात 21 क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा झाली. 35 लोकांना पाच वर्ष आणि 138 लोकांना पाच वर्षापेक्षा कमी शिक्षा सुनावली होती.

चिमूर जनतेच्या मदतीसाठी लोकमान्य टिळकांचे अनुयायी चंद्रपूरचे बळवंतराव देशमुख यांनी क्रांतिकारकांचे वकीलपत्र घेतले. चिमूरचा क्रांती लढा 16 ते 19 ऑगस्ट 1942 पर्यंत सुरू होता. या क्रांतीची माहिती नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मिळाली. त्यावेळी ते जर्मनीची राजधानी बर्लिनला होते. त्यांनी बर्लिन रेडिओ स्टेशनवरून घोषणा केली. 1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात चिमूर हे भारतात सर्वात प्रथम स्वतंत्र होणारे गाव होय, असे त्यांनी म्हटले. चिमुरच्या या क्रांती लढ्यात तुकडोजी महाराजांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. म्हणून त्यांना 29 ऑगस्ट 1942 ते 2 डिसेंबर 1942 पर्यंत नागपूरच्या सेंट्रल तुरुंगात ठेवण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृती कायम राहाव्यात, म्हणून चिमूर क्रांतिकारी पुण्यभूमीत पाच फण्याच्या नागाचे स्मारक उभारले आहे. दरवर्षी 16 ऑगस्टला शहीद बालाजी राघोबा रायपूरकर यांच्यासह अनेक क्रांतिकारकांना येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

✒️राजेश येसनकर(जिल्हा माहिती अधिकारी,चंद्रपूर)