स्वातंत्र्यदिन : एक ऐतिहासिक सुवर्ण पहाट

155

इंग्रजांच्या हुकूमशाही राजवटीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी बराच काळ लढा देणाऱ्या शूरवीरांच्या वीरमरणाने व धर्म, जात, लिंग, भाषा, प्रांत इत्यादी सर्व गोष्टी विसरून भारतीय जनतेने दिलेल्या अभूतपूर्व लढयामुळे आज 15 ऑगस्ट ला एक ऐतिहासिक सुवर्ण पहाट आपण पाहत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक समाज सुधारक, नेते ,सैनिक, कामगार ,शेतकरी ,कष्टकरी ,मजूर यांनी आपल्या जीवाचे रान पेटवले. स्वातंत्र्य मिळायला वेळ लागणार नव्हता, मुठभर श्रीमंत लोकांना तर स्वातंत्र्य कधीचेच मिळाले असते.पण महात्मा गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर ,पंडित जवाहरलाल नेहरू ,शहीद भगतसिंग यासारख्या अनेक समाज सुधारकांनी सामाजिक सुधारणा झाल्याशिवाय देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळणार नाही याचे महत्त्व जाणले होते. आणि म्हणून खऱ्या स्वातंत्र्यापासून एक मोठा वंचित असलेला समाज मुकणार होता.

स्वातंत्र्य मिळवून जर मुठभर लोकांचे भले होत असेल, तर त्या स्वातंत्र्याला काय अर्थ? अशी सर्वांची धारणा होती. यामध्ये गरीब व दलितांना त्यांचा लाभ मिळणार नव्हता ,त्यांना त्यांचे हक्क मिळणार नव्हते. मग जो समाज हजारो वर्ष विषमतेने पिळल्या गेलेला होता त्या समाजालाच जर विषमतेवर मात करता आली नाही तर या लवकर मिळालेल्या स्वातंत्र्याला अर्थ काय असा विचार या सर्व महापुरुषांनी केला होता. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात दलितांना शिक्षणाचे दरवाजे खुले नव्हते. त्यांना कुठल्याही नोकऱ्या करण्याचा अधिकार नव्हता. मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले ,राजश्री शाहू महाराज ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व समाजापुढे मांडले.

तेव्हा कुठे सर्व कष्टकरी जनतेला आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व कळू लागले. आणि इंग्रजी राजवट जर हाकलून लावायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून जोपर्यंत सामाजिक सुधारणा होणार नाही तोपर्यंत मिळालेल्या स्वातंत्र्याला काही अर्थ राहणार नाही अशी बीजे या महापुरुषांनी समाजामध्ये पेरून ठेवली . त्याची फलशुती म्हणून इंग्रजांनी सुद्धा काही सामाजिक सुधारणा मान्य केल्या कारण जर सामाजिक गुलामगिरीने आपले जीवन उध्वस्त होत असेल तर आपली पुढील पिढी सुद्धा उध्वस्त होईल ते सुद्धा शिक्षणापासून वंचित राहील ही गोष्ट आता लोकांना कळून चुकली होती. कारण पूर्वी माणूस म्हणून जगण्याचे हक्क काही धर्म पंडितांनी, जातीय वाद्यांनी देवा- धर्माचा आधार घेऊन हिरावून घेतले होते. त्यामुळे गुलामापेक्षाही हा सामाजिक दृष्ट्या हीन असलेला माणूस फार खचून गेलेला होता आणि म्हणून महापुरुषांनी ब्रिटिशांच्या जोखडातून देशाची मुक्तता करणे. हा एकमेव ध्यास घेऊन स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट कशी उगवेल यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व गांधीजींकडे गेले. त्यावेळी एक गट जहाल तर दुसरा मवाळ असे दोन गट होते .काहींचे म्हणणे होते की रक्तपात केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही व टिकवता येणार नाही.

या गटाचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस ,राजगुरू, भगतसिंग यांच्यासारखे अनेक नवतरुण करत होते. दुसरा गट हा महात्मा गांधीजींच्या विचारांचा होता. त्यांचे विचार मात्र मवाळ होते. अहिंसेच्या मार्गातून आपल्याला स्वतंत्र कसे मिळेल, रक्तपात कसा थांबवता येईल, यावर ते ठाम होते.स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक वृत्तपत्र जन्माला आली .कोणत्याही मार्गातून जनतेपुढे स्वातंत्र्याचे महत्त्व विशद करावे हीच भावना उफाळून येत होती. आपले विचार, चळवळ सर्व दूर पोहोचवण्यासाठी हे एक अतिशय चांगले माध्यम होते. त्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी लिखाणाला धार देऊन जनतेमध्ये जनजागृती घडून आणली. भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या खंडप्राय भारतातील प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यांनी उच-नीच हा भेदभाव काढून टाकला. भारत हे एक संघ- एक राष्ट्र बनून प्रत्येकाला भारतीय बनविले गेले. आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा भारताची एकता ,अखंडता अबाधित असून भारत सर्वात मोठी जगातील लोकशाही असलेला एक यशस्वी देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

याचे सर्व श्रेय हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. आता सर्व थरातील लोकांना कळून चुकले आहेत की संविधान हा आपला आदर्श ग्रंथ आहे. याच ग्रंथामुळे आज आपल्याला आपले अधिकार व हक्क प्राप्त झाले आहे .या देशातील प्रत्येक व्यक्ती ही या सर्वोच्च ग्रंथामुळेच अभिमानाने जगत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या आर्थिक, सामाजिक व बौद्धिक विकास करत आहे. आंबेडकरांनी स्वतंत्र भारतामध्ये संविधान ग्रंथाच्या रूपाने लोकशाहीचे रोपटे लावले आहे.लोकशाहीमुळे आज गावातील ग्रामपंचायत पासून तर देशाच्या संसदेपर्यंत नेतृत्व करण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसाला बहाल झालेला आहे. भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वतंत्र ,न्याय मागण्यासाठी दिलेले हक्क, त्यासाठी असलेले न्यायालय या सर्व गोष्टी भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली देन आहे. पण आज एकीकडे असे वाटते की आम्ही सर्व भारतीय अराजकतेच्या एका रस्त्यावर उभे आहोत. दररोज वर्तमानपत्रे उघडली की एकापाठोपाठ जातीय वादळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करताना दिसत आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचत आहे. स्वातंत्र काय असतं? स्वराज्य की सुराज्य? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहते.

देशात जर शांतता नांदवायची असेल तर देशातील संसद ,जनता आणि देशाचे संविधान या सर्वांची सुसंगत वाटचाल असणे गरजेचे आहे. आम्हाला जर आमचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी ही संविधानाप्रमाणे होणे गरजेचे आहे.मुलांना शाळेत शिक्षण देत असताना फक्त सुशिक्षित न करता त्याला सुसंस्कृत कसे करता येईल ही एक काळाची गरज बनली आहे. कारण आम्ही भारतीय आहोत भारतामध्ये जर दुसऱ्याचं घर जडत असेल तर ते विझवण्याचे काम आम्ही केलं पाहिजे .पण तसे होताना दिसत नाही मग या महापुरुषांनी दिलेल्या स्वातंत्र्याचे अस्तित्व कसे टिकणार?

म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली ही ऐतिहासिक स्वातंत्र्याची सुवर्ण पहाट कशी कायम राहील. आणि येणाऱ्या पिढीला या स्वातंत्र्याची फळे कशी आनंदाने चाखता येतील। यासाठी आपण सर्व भारतीयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आणि हीच आजच्या या दिवशी सर्वांनी प्रतिज्ञा करूया. आणि मी या देशाचा सुजाण नागरिक म्हणून माझ्या देशाचे स्वातंत्र्य कसे अबाधित राहील, यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी महापुरुषांच्या चरणी आदरांजली वाहूया

!!!!!!! सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

✒️श्री अविनाश अशोक गंजीवाले (स.शिक्षक)जि. प.प्राथमिक शाळा,करजगाव,पं स तिवसा जि अमरावती