शिक्षक हा समाज व राष्ट्राचा आधारस्तंभ!!

87

( ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्य विशेष लेख)

गुरू हा हाडामासाचा मनुष्यदेह नसून तो म्हणजे शुद्ध ज्ञानतत्त्व आहे. समाजात अनेक घटक आहेत,परंतू त्यातही गुरूचे स्थान सर्वोच्च आहे. समाजाचा दिशादर्शक, आधारस्तंभ व राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणजे गुरू!

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरू, संकटाचेवेळी मार्गदर्शन करणारा गुरू, मनुष्याचा तारणहार म्हणजे गुरू, ज्ञानाचा सागर म्हणजे गुरू, मायेचा पाझर म्हणजे गुरू, सुखाची घागर म्हणजे गुरू! किती उपमा द्याव्या!!

गुरूच्या महतीचे वर्णन सर्व संतांनी व ग्रंथानी केलेले आहे. देवदेवता,थोर महापुरूष, महामानव गुरूलाच नतमस्तक झालेले आहे, शरण गेलेले आहेत. प्रत्येक धर्म, संप्रदाय, पंथात, देश-विदेशात देखील गुरूला महत्त्वाचे स्थान आहे.

मनुष्य आस्तिक असो वा नास्तिक तरी त्याला मार्गदर्शन देणारा किंवा कोणाच्यातरी प्रेरणेने तो पुढे जाणारा, जगणारा असेल त्याला गुरूची गरज असतेच.गुरू म्हणजे ज्ञान! मनामनात ज्ञानाची जो ज्योत पेटवितो व आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी अर्पण करतो व दुसर्याच्या हृदयात लख्ख प्रकाश पाडण्याचे जो काम करतो, तो गुरूच आहे. ज्ञानाने माणसात कार्याची ज्योत पेटते. असंख्य ज्योती एका ज्योतीपासून तयार होतात, जेव्हा या अनेक ज्योतींचे रूपांतर ज्वालेत होते, आणि माणसाच्या ह्दयात सदसदविवेकबुद्धी जागृत होवून समाजाचे, राष्ट्राच्या हिताचे, विकासाचे, सुखाचे, समृद्धीचे, लोकसेवेचे सुधारणेचे, क्रांतीचे कार्य घडते. यासर्व गोष्टींची प्रेरणा देणारा गुरू आहे. गुरूला विसरून माणसाचा उद्धार होवू शकणार नाही.

आज गुरूचा, गुरूजी, शिक्षक, मास्तर, सर अशा उपाधींनी पुढे गेला. परंतू समाजाला ज्ञानदान देण्याचे पविञ कार्य करणारा व प्रत्येकाचे जीवन उज्ज्वल करणारा गुरूच आहे. मनुष्य देहाने पविञ असला तरी तो पविञ होत नाही. परंतू ज्ञानाने तो आपल्या अंतरंगातून पविञ होतो. मिळणारे ज्ञान जेव्हा ह्दयात पाझरते तेव्हा त्याचा महामानव होवू शकतो. कर्तव्याची स्फूर्ती व खरी प्रेरणा त्याला गुरूपासून मिळते. तो संस्कारक्षम, कलोचित बनतो. आधी वंदावे

गुरूजनासी!! गुरू हा समाजाचा, राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. शिक्षकदिनाच्या निमित्ताने संपूर्ण गुरूजनांना मानाचा मुजरा,वंदन!!

✒️राजेंद्र मोहितकर(प्रसिद्धी प्रमुख,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण)मो:-9422909525