मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यास कुणबी महासंघाचा विरोध-डी. के. आरीकर

253

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11सप्टेंबर):- मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नये. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास आमचा विरोध नाही. अन्यथा कुणबी ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असे निवेदन भारताचे प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, व ना. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. असे कुणबी महासंघाचे महासचिव दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी सांगितले.

1990 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारने ओबीसीना केंद्रात 27 टक्के तर महाराष्ट्रात 19 टक्के आरक्षण दिले परंतु त्याचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही, त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ओबीसी समाज आरक्षणापासून वंचितच राहिला. अशातच मराठ्यांचे पुढारी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्या मुळे कुणबी व ओबीसी समाजात कमालीचा असंतोष उफाळून आला.

या देशाच्या विकासात कुणबी व ओबीसी समाजाचा फार मोठा वाटा आहे परंतु सरकार कुणबी ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावून आपली पोळी भाजण्याचा कट रचत आहे. याला ओबीसी समाजाने बळी पडू नये असे आवाहनही डी. के. आरीकर यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे केंद्र सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून SC, ST प्रमाणे 52 टक्के ओबीसी ला 52 टक्के आरक्षण देण्याची मागणी यावेळी सरकारला करण्यात आली. “जिसकी जितनी संख्या भारी! उतनी उनकी भागीदारी ” या नुसार सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिल्यास कोणाचेही आक्षेप राहणार नाही आणि सर्वाना न्याय मिळेल.या देशामध्ये प्राण्यांची जनगणना केल्या जाते दरवर्षी वाघाची जनगणना करण्यात येते परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा ओबीसीची जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही. ती ताबडतोब करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात कुणबी महासंघाचे महासचिव दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर, सल्लागार ऍड. हिराचंद बोरकुटे, ओबीसी जनगणना समितीचे बळीराज धोटे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष जगदीश जुनघरी, डॉ. देव कन्नाके, दिनेश एकवणकर, कुणबी महासंघाचे नवनाथ डेरकर, महेंद्र शेरकी, सुधीर कोरडे, चंदू लडके, भाऊराव झाडे, सुनील काळे, ल. वि. घागी, संभाजी खेवले, दिलीप होरे, सुरेश रामटेके, हेमलता होरे, दिलीप मोरे, स्वाती दुर्गमवार, भास्कर सपाट, अक्षय येरगुडे, विठ्ठल भगत, अरुण धानोरकर, अशोक जाधव आणि योगेश आपटे व प्रकाश देवगडे यांची उपस्थिती होती.