कोतवाल भरतीत झालेला घोटाळा आणि अन्याय सहन करणार नाही

191

🔹प्रशासनाने योग्य पध्दतीने चौकशी करावी.

🔹अन्यथा….सैनिक समाज पार्टी करणार आंदोलन.

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि. १७ सप्टेंबर):-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दहा गावांमध्ये कोतवाल भरती करण्यात आली. परंतु तहसीलदार प्रशांत घोरुडे यांनी अनेक बाबींवरुन प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप अन्याय ग्रस्त उमेदवारांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम , उपाध्यक्ष पुरुषोत्तम सलामे, विधानसभा प्रमुख हंसराज उराडे, महासचिव प्रकाशसिंग बंडवाल यांनी नुकतीच बैठक आयोजित करून कोतवाल भरती संदर्भातील घोटाळ्या प्रकरणी माहिती जाणून घेतली. या बैठकीत अन्यायग्रस्तानी अनेकविध त्रृट्यांचा पाढा वाचुन योग्य मार्गाने चौकशी करण्याची मागणी केली.

परीक्षेमध्ये ओ एम आर सिट वापरले नाही, निकालाची उत्तरतालीका जाहीर केली नाही , उमेदवारांना निकालात आक्षेप घेण्याची संधी दिली नाही , परिक्षा घेतांना उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका वेगळी ठेवण्यात आली नाही, उत्तर पत्रिकेवर बारकोड लावण्यात आले नव्हते , परिक्षा ही जिल्हास्तरावर न ठेवता तालुक्याच्या ठिकाणी ठेवून परीक्षेची पारदर्शकता ठेवण्यासाठी सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. दहा पैकी आठ गावच्या भरती प्रक्रियेत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे मार्क हे प्रत्येक गावात फक्त दोन मार्क जास्तीचे आहेत. निवड करण्यात आलेले उमेदवार हे अन्यायग्रस्त उमेदवाद्वारांपेक्षा कमी शिकलेले आहेत.

कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता सरसरट कोतवाल भरतीत निवड करण्यात आल्याने भरतीत घोळ झाला हे नाकारता येणार नाही. यावेळी चामोर्शी तालुक्याचे तहसीलदार प्रशांत घोरुडे यांच्याकडे निकालानंतर लगेच आक्षेप नोंदविले मात्र त्यांनी या आक्षेपात काही तथ्य नाही आणि काही फायदा होणार नाही असे स्पष्ट तहसीलदार यांनी निवेदन घेताना सांगितले. परीक्षेचे ठिकाणी ज्या उमेदवारांची सेटिंग होती त्यांना पर्यवेक्षकांनी पेपर सोडविण्यासाठी मदत केली असून त्यांचेवर व तहसीलदार यांचेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. लखमापूर बोरी येथील उमेदवारांचे कागदपत्रे जोडले नसतांना त्यांना कोतवाल परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले.

परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी प्रशासनाने फार मोठा निष्काळजीपणा केला असल्याचा आरोपही अन्यायग्रस्त उमेदवारांनी केला आहे. या भरतीत उच्च शिक्षण घेऊन तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी होऊ शकणाऱ्या उमेदवारांना डावलून नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना तातडीने रुजू करण्यात आले, यावरुन कोतवाल भरतीत घोटाळा झाल्याचे उघड… उघड दिसत आहे. बैठकीला आचल भांडेकर, अमर भसारकर, समीर दहागांवकर, अजय नेवारे , महेंद्र निकुरे, लक्ष्मीकांत पिपरे , मोहीत कुळमेथे, अभय निकुरे, अनुप भसारकर, रूपचंद बुटे , ओमनाथ कुळमेथे मुस्कान पठाण, फिजा शेख, सुलताना सय्यद, लक्ष्मण निकोडे , त्रिदेव सरवर, राखी सोनटक्के, शुभम फुलझेले, स्वप्नील फुलझेले, प्रियंका चलाख, गिता पिपरे, शुष्मा तुमळे , प्रणाली मेश्राम, शितल वैद्य, रोशनी गेडाम, प्रिती दहागांवकर, संकल्प फुलझेले आदिसहीत बरेच युवक उपस्थित होते.