शहरी भागातील दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदानावर ई रिक्षा योजना मंजूर करावी- संजय गजपुरे

129

🔹निधी तरतुदीसाठी चंद्रपुरचे पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे केली मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.22सप्टेंबर):-जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी ५% निधीतून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ई रिक्षाची योजना कार्यान्वित आहे. सोबतच जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या २० % सेस फंड मधून अनुसूचित जाती / जमाती मधील लाभार्थ्यांसाठी ई रिक्षाची योजना सुरु आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी तत्कालिन जि.प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांनी पुढाकार घेत समाजकल्याण विभागाकडुन मंजुरी व मान्यता घेतली होती. मागील वर्षी या दोन्ही योजनेतून १६८ लाभार्थ्याना चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेमुळे ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्याना स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध झालेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात महानगर पालिका, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रातील दिव्यांग लाभार्थ्याना मात्र जिल्हा परिषदेच्या या योजनेचा लाभ मिळत नाही. ग्रामीण भागातील लाभार्थ्यानी या ई रिक्षा योजनेच्या च्या माध्यमातुन दैनिक अर्थार्जन सुरु केले असुन स्वत:च्या कुटुंबाला हातभार लावत आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे . शहरी भागातील अनेक गरजु दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेबाबत आता विचारणा सुरु केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्य परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या शहरी भागातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी DPDC अथवा खनिज निधीच्या माध्यमातून ई रिक्षा योजनेसाठी निधीची तरतूद केल्यास लाभ मिळू शकतो.

यासाठी चंद्रपुर जि. प. चे माजी सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी पालकमंत्री नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन दिले असुन योजनेची व्याप्ती वाढवीत दिव्यांग लाभार्थ्यांसाठी DPDC अथवा खनिज निधीच्या माध्यमातून शहरी भागासाठी किमान १०० ई रिक्षासाठी आवश्यक निधीची तरतूद करून त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती चंद्रपुरचे जिल्हाधिकारी , जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व समाजकल्याण अधिकारी यांनाही दिले असुन याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.