मानसिक आरोग्य हाच व्यक्तिमत्त्व विकासाचा खरा पाया आहे…!

239

10 ऑक्टोंबर 2023 जागतिक मानसिक आरोग्य दिन होता. या निमित्ताने मानसिक आरोग्य म्हणजेच इंग्रजीमध्ये “मेंटल हेल्थ” असं त्याला संबोधलं जातं, मानसिक आरोग्य विषयी भारतीय समाज आजही प्रचंड मागासलेला दिसतो, मात्र भारतीयांची मानसिक आरोग्याची हजारो वर्षाची परंपरा लुप्त होत गेल्यानेच भारतीय समाजात मानसिक आरोग्याला घेऊन खूपच मोठे गैरसमज आहेत,हे समज-गैरसमज समजून घेण्याच्या हेतूनेच मी हा लेख लिहीत आहे.

व्यक्तिमत्व विकास,अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र,भाषण कौशल्य,माईंड पावर, टीम बिल्डिंग,बालक आणि पालक यांचे नातेसंबंध अशा विविध विषयांवर मी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने प्रशिक्षण आयोजित करत असतो, या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासकीय कर्मचारी, कामगार व महिला अशा विविध क्षेत्रातील व वयोगटातील लोक जेव्हा प्रशिक्षण करतात. तेव्हा त्यातील काही लोक “सर मला पर्सनली आपल्याशी बोलायचं आहे” अशी वेगळी डिमांड करतात,तेव्हा पर्सनली बोलायला आल्यानंतर असं लक्षात येतं की, या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ बिघडलं आहे,व त्याला योग्य उपचारांची गरज आहे. त्यांचे सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मी माझ्याकडून ज्या काही उपाययोजना आहे त्या समोरच्या व्यक्तीला सांगतो परंतु काही मानसिक आजार हे वरवरच्या उपाययोजनांनी आटोक्यात येत नाहीत, तेव्हा त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची आणि उपाययोजनांची आवश्यकता असते.

अशा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आपण घ्यावा असं म्हणताच क्षणी समोरच्या व्यक्तीच्या व त्याच्या नातेवाईकांच्या मनात बरेच प्रश्न उभे राहतात.. कधी कधी ते स्पष्ट बोलतात, “अहो त्यांना हा त्रास अनेक वर्षापासून आहे,पण ते काही वेडे नाही कशाला मानसोपचारतज्ञांकडे जाण्याची गरज आहे.” आणि इथेच संवाद थांबतो…कारण आपल्याला मानसिक त्रास सुरू झाला आहे, हेच मुळात स्वीकारण्याची तयारी बहुतांश लोकांमध्ये नसते.म्हणून मानसिक आरोग्य बिघडले आहे हे प्रथमतः ओळखणे आणि स्वीकारणे अत्यंत गरजेचे असते.जर आपणास हे ओळखता आलं आणि आपण हे स्वीकारलं तरच योग्य ते उपचार आपण करावयास तयार होतो. अन्यथा मानसिक आजार हे शारीरिक आजारापेक्षा प्रचंड त्रासदायक असतात. त्या व्यक्तीला व त्या व्यक्तीच्या अवती-भवती असणाऱ्या सर्वांसाठी हे त्रासदायक ठरू शकते.म्हणून यावर वेळीच उपचार करणे आवश्यक असते.

जन्मतःच कुठल्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व परिपूर्ण नसते. तसेच जन्मताच कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव हा पूर्णतः विकसित झालेला नसतो.आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की..नाही त्याचा स्वभावच तसा आहे.परंतु हा स्वभाव जन्मताच तयार झालेला नसतो.त्या व्यक्तीच्या घरातील वातावरण,शाळेतील वातावरण,तो ज्या परिसरात राहतो तेथील वातावरण,तो ज्या समाजात जन्माला आलेला आहे,त्या समाजातील संस्कृती,चालीरीती,रुढी,परंपरा शिवाय अवतीभवती असणाऱ्यांचे व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होत असतो.याव्यतिरिक्त त्याच्या बालपणात,किशोरवयात,युवा अवस्थेमध्ये या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्याला आलेले चांगले वाईट अनुभव यातून त्या व्यक्तीचा स्वभाव आणि एकंदरीत व्यक्तिमत्व तयार होत असते.पण याचा अर्थ असा नव्हे की, भूतकाळात तयार झालेले व्यक्तिमत्व वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात बदलता येणार नाहीत.आपण बऱ्याचदा हे ऐकलं असेल की “स्वभावाला औषध नसते” मात्र हे खरे नाही बर का…! स्वभावाला अगदी सोप्प औषध आहे ‘स्वभाव’ बदला..! आणि इथेच माशी शिंकते.. ‘स्वभाव बदला…?’ म्हणजे कोणी कोणाचा स्वभाव बदलायचा..? बऱ्याचदा लोकांच्या या तक्रारी असतात की, “मी ठीक आहे..

पण माझ्या कुटुंबातील लोक,माझ्या ऑफिस मधले लोक,माझ्या शेजारचे लोक,माझ्या समाजातील लोक, माझ्या देशातील लोक.. ठीक नाही.. ते ठीक नाहीत म्हणून मी पण ठीक नाही..!” अशी धारणा मानून बऱ्याचदा लोक आपला मूळ स्वभाव बदलायला तयार नसतात.त्यामुळे आपल्याला इतरांबरोबर मिळते-जुळते घ्यायला अडचणी निर्माण होतात. आणि यातूनच परस्पर नातेसंबंधांवर परिणाम होतो. हा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो आणि एकदा का मानसिक आरोग्य बिघडले की,या मानसिक आरोग्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो व याचे रूपांतर विविध आजारांच्या माध्यमातून निर्माण होत असतात,हे शास्त्रीय कारण आपण या निमित्ताने समजून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.हे जर आपण समजून घेतले तर अनेक मोठे आजार आपण सहज टाळू शकतो व एक आनंददायी जीवन स्वतःसाठी व इतरांसाठी जगू शकतो.याकरिता काही ठोस उपाय योजना कशा करता येतील यावर विचार करूया…!!!

मानसिक आरोग्य चांगले असण्याची काही लक्षणे.
१) त्या माणसाचे मन अतिशय शांत असते. इतरांबरोबर जुळवून घेता येते.२) कोणी नावे ठेवली किंवा कोणी बदनामी केली तरीही ते दुखावले जात नाही, आपल्या प्रश्नांना,समस्यांना आपणच जबाबदार असून त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ते करतात.३) आपल्या आयुष्यात नेमके काय करायचे आहे..? हे ते ठरवतात त्यांचा मनावर ताबा असतो.४) जीवनातले ताण तणाव विविध समस्या संकटे यांच्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात असते.५) इतरांकडून सतत अपेक्षा ते ठेवत नसतात किंवा आपल्या आयुष्यात पूर्ण न झालेल्या अपेक्षांचे खापर ते इतरांवर फोडत नाहीत.६) दुसऱ्यांबरोबर असलेली तुलना ते कधीही करत नाही दुसऱ्यांचे यश बघून ते दुःखी होत नाहीत.७) इतरांकडे असलेली भौतिक सुख किंवा त्यांना मिळालेल्या नैसर्गिक गोष्टी याची तुलना न करता ते स्वतःचा आदर करून इतरांचाही आदर करतात.८) मी तुझ्यासाठी एवढे केले तू माझ्यासाठी काय केले?. असा व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता.मी जे तुझ्यासाठी केले ते माझी इच्छा म्हणून केले.इथेच फुल स्टॉप देऊन ते समाधानी असतात.९) ते स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात.. याकरिता शारीरिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे, मानसिक आरोग्यासाठी ध्यान साधना करणे, सकारात्मक पुस्तक वाचणे,सकारात्मक विचार करणे,सकारात्मक लोकांच्या सोबत राहणे अशा प्रकारच्या उपाययोजना करतात भूतकाळात त्यांच्यासोबत काय चांगले आणि वाईट झाले हे सतत उगाळत न बसता वर्तमान चांगला करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांचे भविष्यही उज्वल होते.१०) इतरांनी त्यांना महत्त्व द्यावे, त्यांच्या समस्या सतत सोडवाव्यात,त्यांचा सतत आदर करावा,त्यांची विचारपूस करावी,त्यांची काळजी घ्यावी…अशी कोणतीही भावना ते मनात ठेवत नाहीत…ते नेहमीच स्वतःहून पुढाकार घेतात व आपल्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची वृत्ती मानसिक आजारांना निमंत्रण देत असते व नंतर याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर देखील होत असतो.११) ते कधीही इतरांच्या दोषांवर टीकाटिपणी करण्याऐवजी स्वतः काय करू शकतात..? यावर आपली शारीरिक व बौद्धिक ताकद खर्च करत असतात एखाद्या व्यक्तीकडून चूक झाल्यास त्याला क्षमा करतात व नीट समजून सांगतात.१२) इतरांनी माझ्या संपर्कात राहावे,अशी मानसिकता न ठेवता मी इतरांच्या संपर्कात कसा राहीन..? याचा ते विचार करतात.१३) मानसिक स्वास्थ चांगले असणाऱ्या व्यक्ती या नेहमीच नवीन नवीन लोकांबरोबर मैत्री करतात व आपल्या आयुष्यामध्ये सतत नवनवीन प्रयोगही करत असतात.याउलट मानसिक स्वास्थ बिघडलेल्या व्यक्ती या संकुचित असतात. आपल्या- आपल्या ओळखीच्याच लोकांसोबत कम्फर्टेबल असतात.. नवीन आलेल्या व्यक्तींबरोबर जुळवून घ्यायला स्वतःहून वेळ देत नाही किंवा त्या व्यक्तीला समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाही.काही पूर्व अनुभवानुसार त्या व्यक्तीचे विश्लेषण करून त्यांच्यापासून दूरच राहतात व पूर्वग्रहदूषित असल्यामुळे त्यांच्याबरोबर चांगले नाते तयार होत नाहीत. मात्र मानसिक स्वास्थ चांगल्या असणाऱ्या व्यक्ती या नवीन लोकांबरोबर मैत्री करण्यासाठी थोडा अधिक वेळ देतात त्यांचा आयुष्य समजून घेतात व हळूहळू प्रयत्न करून चांगली मैत्री तयार करतात.१४) मानसिक स्वास्थ चांगल्या असणाऱ्या व्यक्ती एखाद्या चांगल्यातही चांगले आणि वाईटातही चांगले शोधायचा प्रयत्न करतात.१५) एखाद्या व्यक्तीकडून झालेल्या चुकांचा किंवा गुन्ह्याचा दोष ते एखाद्या समूहाला,धर्माला किंवा देशातील लोकांना देत नाहीत..उदा.नथुराम गोडसेने गांधी हत्या केली म्हणून तो ज्या समाजात जन्माला आला ते सर्व वाईटच असतात…असा ग्रह निर्माण करणे किंवा मुस्लिम हे अतिरेकी असतात.. असे पूर्वग्रहदूषित असणं म्हणजे त्या व्यक्तीचे मानसिक स्वास्थ ठिक नाही, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.१६) मानसिक स्वास्थ चांगले असणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रेम,मैत्री, करूणा,शिल व सदाचाराने ओतप्रोत भरलेले असतात,दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती नसते.
याऊलट मानसिक स्वास्थ ठिक नसलेल्या व्यक्ती प्रचंड अहंकारी,सतत इतरांचा व्देष,सतत हेवा,सतत तक्रारी,सतत नाराजी,सतत चेहऱ्यावर नैराश्य…सतत दुसऱ्यावर दोषारोपण करत असल्याने अशा व्यक्तींच्या सान्निध्यात इतर लोक राहत नाही.हा लेख जर आपण मनापासून वाचला असेल,तर आपणास निश्चितच खूप काही शिकावयास मिळू शकते,मात्र ‘दुनिया गेली उडत मला काही फरक पडत नाही’ असा जर दृष्टिकोन आपला असेल,तर मात्र सुंदर अशा मनुष्यमात्रामध्ये आपला झालेला जन्म हा निरर्थक ठरतो हे मात्र निश्चित…!!!
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाला मनापासून हार्दिक शुभेच्छा.. हा लेख तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया निश्चितच कळवा…!!!

✒️लेखन:;किरण मोहिते(मोटिव्हेशनल ट्रेनर,नाशिक)मो:-9561883549