धाडसी निर्णय घेणाऱ्या बेडर पंतप्रधान-इंदिरा गांधी

62

आपल्या पित्याकडुन मोठया हिमतीने,आत्मविश्वासाने व युगधारणेने इतिहासाचा वारसा प्रियदर्शनीने निर्भयपणे स्विकारला आहे. काळाने मोठया कौशल्याने तिला आमच्या देशाच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र ठरविले आहे. जे कधीही पडद्या आड होऊच शकत नाही. कारण आपली भुमिका इतिहासाच्या रंगभुमीवर यथायोग्यपणे पार पाडीत असतांना अमिट असा ठसा उमटविणे ही गोष्ट सुध्दा साधी असुच शकत नाही.

19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथील ‘आनंदभवन’ या वास्तूत त्यांचा जन्म झाला. आजोबा मोतीलालजी ‘इंदिरा’ या लाडीक नांवाने पुकारायचे, तर वडील नेहरुजी त्यांना ‘प्रियदर्शनी’ म्हणून संबोधायचे. लहानपणापासूच स्वदेशी आणि स्वदेश यांचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण झाले होते. विदेशी खेळणी, कपडे यांचा त्यांना तिटकारा होता. एकदा तर त्यांनी विदेशी कपडे होळीत टाकुन दिले. वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे 1930 साली त्यांनी आपल्या सवगडयांची वानर सेना स्थापन करुन नेत्यांचे संदेश पोहचवण्याचे काम केले. ब्रिटीशांच्या विरोधात मिरवणूका काढल्या, घोषणा दिल्या या सर्वांच्या बरोबरीने शिक्षणही चालूच ठेवले. प्रारंभी अलाहाबाद मग पुणे आणि नंतर रविद्रनाथांच्या शांतीनिकेतन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी फिरोज गांधी परिचित असलेल्या हुशार आणि अन् उमद्या तरुणाच्या सांगण्यावरुन इंदिराजींना ऑक्सफोर्ड विद्यापीठात दाखल करण्यात आले.

त्यात त्यांनी राज्यशास्त्र, इतिहास व अर्थशास्त्र या विषयांत प्राविण्य मिळविले. विद्यापीठाने त्यांना मानद पदवी दिली. 2010 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातील 10 नामांकित आशियाई पदवीधरांपैकी ऑक्साशियन म्हणुन त्यांची निवड केली.

याकाळात पंडितजींनी इंदिराजींना जी पत्र पाठवली त्याद्वारे त्यांना संबंध भारताच्या इतिहासाची पुरेपूर जाणीव झाली. याच काळात हिटलने इंग्लंडवर हल्ले चढवायला प्रारंभ केला. वातावरण चिघळत चाललेले असल्यामुळे विमानाने एकटया इंदिराजी भारतात परत आल्या. त्यांच्या साहसाचे साऱ्यांनी कौतुक केले. मागोमाग फिरोज गांधीही भारतात आले. ब्रिटेन मधील वास्तव्यात दोघांच्या भेटी नेहमी होत असंत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये दोघेही सदस्य होऊन राजकारणात सक्रिय झाले. वडील जवाहरलाल नेहरु, विजयालक्ष्मी आणि कृष्ण या आत्यांचा विरोध असतांनाही इंदिराजींचा 26 फेब्रुवारी 1942 रोजी फिरोज गांधी यांच्याशी आंतरजातीय पध्दतीने विवाहबध्द झाल्या. या जोडप्याला राजीव आणि संजीव या दोन देखण्या मुलांना वाढवत त्यांनी एकीकडे नेटका संसारही केला, सोबत राजकारण होतेच.

इंदिरा एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. 1947 ते 1964 या काळात नेहरुंच्या पंतप्रधानपदाच्या काळात इंदिरा गांधींना प्रमुख सहाय्यक मानले जात होते आणि त्यांच्या अनेक परदेश दौऱ्यांवर त्या नेहरुंसोबत असायच्या. 1959 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. 1964 मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर गांधींची  राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळाच्या त्या सदस्या बनल्या. 1966 च्या सुरुवातीला (शास्त्री यांच्या निधनानंतर) झालेल्या काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतृत्वाच्या इंदिरा गांधी नेत्या बनल्या आणि शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांची जागा घेतली. 1966 ते 1977 पर्यंत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणुन मोठी भुमिका बजावली. 1969 ला त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. त्यांनी गरीबी हटविण्यासाठी प्रथम 10 कलमी कार्यक्रम राबविला.

जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यनंतरर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. शासकीय अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. 1965 चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगरच्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या. पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले.

1966 च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयूबखान आणि लालबहादुर शास्त्री यात शांति समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधींना पाठिंबा दिला.

सतत भारतावर आक्रमण करणाऱ्या भारताने 1971 डिसेंबर ला युध्दाची घोषणा केली. पाकिस्तानच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करुन त्यांनी भारत दृष्टया पाकिस्तानचे बांग्लादेश व पाकिस्तान असे दोन तुकडे केले, बांग्लादेशची निर्मीती. तसेच या विजयामुळे दक्षिण आशियामध्ये भारताचा प्रभाव वाढला. त्यानंतर लगेल बांग्लादेशचे वंगबंधु शेख मुजबीर रेहमान म्हणुन पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले. त्यांची सामान्य कामगिरी लक्षात घेवून राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी 1971 मध्ये ‘भारतरत्न’ किताबाने सन्मानित केले. बांग्लादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता. त्याचप्रमाणे भारतीय वैज्ञानिकांकडुन अवकाशात उपग्रह सोडुन भारताचा जगात दबदबा निर्माण केला. 1999 मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणामध्ये इंदिरा गांधींना “वुमन ऑफ द मिलेनियम” असा किताब देण्यात आला. 2020 मध्ये गेल्या शतकाची व्याख्या करणाऱ्या जगातील 100 शक्तिशाली महिलांमध्ये टाइम मासिकाने इंदिरा गांधींचा समावेश केला.

अलिप्ततावादी प्रवृत्तींचा हवाला देत आणि क्रांतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इंदिरा गांधींनी  1975 ते 1977 पर्यंत आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीच्या काळात मूलभूत नागरी हक्क निलंबित केले गेले आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध लावले गेले. या काळात मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले गेले.  1980 मध्ये मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांनंतर इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या. 2011 मध्ये इंदिरा गांधींना  बांग्लादेशच्या मुक्तिसंग्रामातील त्यांच्या ‘उत्कृष्ट योगदानासाठी’ बांग्लादेश स्वाधीनता सन्मान हा बांगलादेशचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मरणोत्तर बहाल करण्यात आला.

अमेरिकन दबाव असताना देखील पाकिस्तानला पराभूत करून पूर्व पाकिस्तानचे स्वतंत्र बांगलादेशात रूपांतर करणे हा इंदिरा गांधींचा मुख्य वारसा खंबीरपणे उभा आहे.  इंदिरा गांधी यांच्यामुळेच भारत हा अण्वस्त्रधारी देशांच्या गटात सामील होऊ शकला.  भारत हा अधिकृतपणे अलिप्ततावादी चळवळीचा भाग असूनही, त्यांनी भारतीय परराष्ट्र धोरणाला सोव्हिएत गटाकडे झुकवले.  1999 मध्ये बीबीसीने आयोजित केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात “वुमन ऑफ द मिलेनियम” असा इंदिरा गांधींचा गौरव केला गेला. 

2012 मध्ये आउटलुक इंडियाच्या महान भारतीयांच्या सर्वेक्षणात त्या सातव्या क्रमांकावर होत्या. 
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस पक्ष ही ‘ब्रॉड चर्च’ मानली जात होती; तथापि, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींच्या कुटुंबाने नियंत्रित केलेल्या कौटुंबिक फर्ममध्ये काँग्रेसचे रूपांतर होऊ लागले. ही कुटुंबाप्रती निष्ठा नंतर गांधी कुटुंबातील सदस्यांच्या वंशपरंपरागत सत्तेत बदलत गेली. त्या हतबल झाल्या नाहीत. उलट त्या टिकेला सामोरे गेल्या. धाडसी व्यक्तिचं असंच असतं, ते कशाचीही तमा करीत नाही. इंदिरा गांधी यांच्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे कार्यकारिणीपासून न्यायव्यवस्थेपर्यंत भारताच्या सरकारच्या सर्व भागांमध्ये पद्धतशीर भ्रष्टाचार हा देखील त्यांचा वारसा असल्याचे काही लोक टीका करतात. आणीबाणीच्या काळात स्वीकारण्यात आलेली  भारतीय राज्यघटनेची 42 वी घटना दुरुस्ती देखील इंदिरा गांधी यांच्या वारशाचा भाग मानली जाऊ शकते. न्यायालयीन आव्हाने आणि बिगर काँग्रेस सरकारने या दुरुस्तीवर पाणी टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी ही दुरुस्ती अजूनही कायम आहे.  मारुती उद्योग कंपनीची स्थापना इंदिरा यांचे पुत्र संजय गांधी यांनी प्रथम केली असली, तरी इंदिरांच्या काळात ही राष्ट्रीयीकृत कंपनी प्रसिद्ध झाली. आजही ती नांवरुपास आलेली आहे.

भारता सारख्या खंडप्राय देशाच्या दिर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या त्या एकमेव नेता होत्या. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी आणि देश स्वतंत्र झाल्यावर त्यांच्या विकासासाठी अविरत झटणारी त्यांच्या सारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळायची नाही. 30 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांनी केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या “माझ्या देशाची सेवा करतांना मला मृत्यु आला तर मला त्याचा अभिमानच वाटेल, माझ्या रक्ताचा थेंब अन्थेंब मी या देशाच्या वैभवासाठी आणि विकासासाठी खर्च करीन आणि हा देश बलवान आणि चैतन्यदायी बनवेन” 31 ऑक्टोंबर 1984 रोजी सकाळी काळाने त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर भ्याड गोळयांचा वर्षाव करुन त्यांची हत्या केली व एकथोर साहसी स्त्री अखेर हुतात्मा झाली. एक तेजपुंज व्यक्तिमत्व लोप पावले, सारा भारत सुन्न झाला. जग या घटनेने अचंबित झाले. त्या गेल्या पण त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व आजही भारतीयांच्या मनावर कोरले गेले आहे. त्यांच्या 39 व्या स्मृतिदिना निमित्त शतश: प्रणाम !

✒️प्रविण बागडे(नागपूर)मो:-9923620919