आंबेडकरवादी साहित्य हेच आमुलाग्र परिवर्तनाचे साहित्य

139

१४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस म्हणजे आमच्या उन्नतीचा नवायान होता . धवलमय धरतीवरील धम्मघोष निनादत होता आणि अंधरूढीची सारी साखळदंड गळून पडले होते. मनूव्यवस्थेच्या पायावर उभ्या अशा हिंदू धर्मातला सोडून नव्या मनुष्यत्वाचा नवाबुद्ध माणूस तयार झाला होता. परिवर्तनाची सारी प्रभा आकाशावर कोरली गेली .कपोलकल्पित , ईश्वराधिष्ठ, अवैज्ञानिक विचारांना मूठमाती देऊन समतेचा धम्मसूर्य नव्याने तेजाळत होता. नागपूरच्या धम्मदीक्षेचा मंगलमय क्षण जगताच्या आकाशावर कोरला होता .

तथागत गौतम बुद्ध यांचा बुद्ध धम्म हा मानवाची पुनर्रचना करणारा मानवतावादी धम्म आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, प्रज्ञा शील, करुणा यांची महाऊर्जा देणारा, स्वयं दीप व्हा..! असा संदेश देणार आहे. बौद्ध धम्म हा ब्राह्मणीकरण्याच्या प्रक्रियेने लयास गेला होता. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी धम्मदीक्षेने पुन्हा वैभव शिखरावर पोहोचला आहे. धम्माचे तत्त्वज्ञान विज्ञानाच्या पायावर उभे आहे. रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली धम्मक्रांती जगाला मानवतेच्या सृनात्वाची प्रेरणा वाटते .

भारतीय संविधानाचा मुलगाभा हा धम्म आहे. देशातील सर्व लोकांना नव्या उत्कर्षाला चालना देणारा, दिशादर्शक प्रकाशस्तोत्र आहे. म्हणून आपण देशात बंधुभावाने रहात आलो आहोत.१९५६ च्या धम्मक्रांतीने महाराष्ट्राला तसेच जगाला नवे साहित्य दिले आहे. वेदना, विद्रोह, नकार यांची प्रचिती दिली आहे. मुक्या माणसात बोलण्याचे आत्मभान जागृत केले. हे आत्मभान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीतत्त्वातून प्रज्वलित झाले आहे. तसेच बुद्धाच्या विचारातून प्रेरित झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र दलित साहित्याला नवी संकल्पना मिळावी म्हणून ११ मार्च १९६१ ला पुणे या ठिकाणी दलित साहित्य संघाचे विसर्जन करून, महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद असे नामकरण करण्यात आले होते.

१९५६ च्या धम्मदीक्षेचा प्रभाव तत्कालीन साहित्यिकांवर जबरदस्त पडला होता .त्यामुळेच १९६२ते १९७६ च्या दरम्यान महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषदेचे एकूण ११ संमेलने पार पडले होते. बौद्ध साहित्य हे मानवी जीवनाला नवे उन्नयन देणारी क्रांतीज्वाला आहे. बुद्ध धम्माच्या तत्त्वावर आधारित असलेले अधिष्ठान व विज्ञानाच्या कसोटीवर उतरणारे साहित्य हेच खरे बौद्ध साहित्य आहे. बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर अनेक गावात बौद्ध बांधवांवर अन्याय अत्याचार केले गेले. स्त्रीला अन्याय सहन करावा लागला. शिक्षण संस्थांमध्ये अनेक भेदाभेदांने विद्यार्थ्यांना समोर जावे लागले. जातीची उतरंड हिंदू धर्म उद्ध्वस्त करू शकला नाही .त्यामुळे त्यांनी गावातील बौद्धांना रोजगार दिला नाही. रिडर्ल्स प्रश्न ,आरक्षण प्रश्न, मराठवाडा विद्यापीठ नामांतरण प्रश्न, भूमीहीन आंदोलन ,नोकऱ्याचे आंदोलन अशा विविध प्रश्नांनी समाजाला अंर्तमुख केले. हा अन्याय फक्त बौद्धावरच का होतो. कारण त्यांनी हिंदू धर्म सोडला म्हणून अशा घटनांनी बौद्ध तरुण घायाळ होत होता.

मिलिंद महाविद्यालयातील साहित्यिक मंडळी आणि महाराष्ट्रातील लेखक मंडळी यांनी या घटकांचे मोठ्या ताकतीने प्रतिबिंब आपल्या कलाकृतीत मांडलेले आहे. कथा, कविता, आत्मचरित्र ,नाटक, जलसा, पथनाट्य, भारुड ,नाटक, कादंबरी अशा विविध माध्यमातून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले. १९५६ च्या पूर्वीचा लेखकानी दलित साहित्यातून आपले क्रांतिकारी विचार समाजाला दिले. अण्णाभाऊ साठे, प्रल्हाद शिदे, विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक, शंकरराव खरात त्याचप्रमाणे १९५६ नंतरच्या पहिल्या पिढीने जुने विचार धुडकावून लावून नव्या प्रतिभा व प्रतिकांचा वापर करून मराठी साहित्याला मोठे हादरे दिले. नामदेव ढसाळ ,बाबुराव बागुल, यशवंत मनोहर, दया पवार ,केशव मेश्राम, वामन निंबाळकर ,ज. वी. पवार ,प्रल्हाद चेंदवनकर ,भाऊ लोखंडे, योगेंद्र मेश्राम ,राजा ढाले, अर्जुन डांगळे ,दत्ता भगत ,त्र्यंबक सपकाळे, गंगाधर पानतावणे, उत्तम कांबळे, रावसाहेब कसबे, भीमसेन देठे, ज्योती लांजेवार, प्रज्ञा पवार, हिरा बनसोड, बेबी कांबळे ,अशा अनेक लेखक कवी यांनी बौद्ध धम्माच्या विचारावर आपली लेखणी पाजवली .समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध शब्दाची अग्नी फुले प्रसवले. शब्दाची दाहकता किती उलथापालक करू शकते हे वास्तव बौद्ध साहित्याने करून दिले.

कवी यशवंत मनोहर यांचा १९७७ ला उत्थानगुंफा काव्यसंग्रह मराठी साहित्याला नवे आव्हान देणारा ठरला. ते या कविता संग्रहात म्हणतात की,

“होऊन विद्रोह जळता मारितो तुम्हास हाका
खड्कावरी तुमच्या करातील लिहीन क्रांतीच्या कविता
तुफान झालो आज मी जरा साथ द्या हात करतो मी पुढे तुम्ही हात द्या सूर्य झालो दोस्त हो तुम्ही कंठ द्या,ज्वालामुखीला ओटी तुमच्या घाट द्या.”

अशी विद्रोहाची अग्नीवर्षा त्यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीपथाने बौद्ध तरुणात नवे आत्मभान जागृत झाले. जाणीव नेणीवेतून सुरुंग तो पेरू लागला. अन्याचा प्रतिकार करू लागला. शब्दाचे वनवे पेटवू लागला. कपोलकल्पित ब्राह्मणी ग्रंथांना तो नाकारू लागला . तथागत गौतम बुद्ध, म. जोतीराव फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या कार्यकर्तृत्वाने तो डोळस बनला. नवे क्रांतिविधान लिहू लागला. आंबेडकरी क्रांतीच्या ज्वालाने मराठी साहित्याची कुसच बदलून टाकली .

बौद्ध धम्माच्या नीती तत्त्वाने त्यांनी इतर समाजाला आपल्या धर्माकडे आकर्षित केले. अनेक भटके ,विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्यांक बुद्ध धम्माच्या मार्गावर आले आहेत. पुन्हा येण्याची प्रक्रिया सुरूच आहे. संविधाननिष्ठ जाणीव बौद्ध धम्माचा पाया आहे. हाच बौद्ध लेखनाच्या चिंतनाचा विचार आहे. तो डळमळीत नाही. त्याला त्यांचे ध्येय माहित आहे. बौद्ध साहित्य, दलित साहित्य, आंबेडकरवादी साहित्य या संकल्पनांच्या काळाच्या ओघात स्वीकारणे अपरिहार्य आहे .काही लोक यामध्ये बदल करायला तयार नाहीत. प्रत्येक दलित साहित्यिक हा आंबेडकरवादी असतोच असे नाही. तो बौद्ध साहित्यिक असतोच असे नाही. पण दलित साहित्य, बौद्ध साहित्य याचबरोबर नवी संकल्पना उदयास आली आहे ती म्हणजे आंबेडकरवादी संकल्पना होय. या संकल्पनेला विरोध करणारे अनेक विचारवंत आहेत. पण नव्या संकल्पनाची निर्मिती आपण केली पाहिजे .दलित साहित्य हे जसे क्रांतिची निर्मिती करणारे होते .तसेच बौद्ध साहित्य नवा माणूस घडवणारे साहित्य होते. त्याचप्रमाणे आंबेडकरवादी साहित्य हे आमुलाग्र परिवर्तन स्वीकारणारे साहित्य आहे. संविधान, इहवाद, माणूसपण, प्रेम, बंधुभाव यावर आधारित आहे. आंबेडकरवादी साहित्य हेच बौद्ध साहित्य आहे. कारण बुद्ध धम्माच्या पायावर त्याचे अधिष्ठान आहे. काही दलित लेखकांची भूमिका कधी कधी डळमळीत अशीच दिसून येते आपल्या साहित्यातून नवा जीवनवाद देताना कलावादाला काही मंडळी चालना देत आहेत. जगाच्या माणसासोबत आपली स्पर्धा आहे. जगातील वंचिताचे प्रश्न आपले आहेत. जागतिकीकरणाने आपले साहित्य मागे पडू नये.

यासाठी आंबेडकरी साहित्यिकांनी नव्या चिंतनाची गरज आहे. धर्म ,जात, भाषा, देश या सगळ्या गोष्टी गौण ठरतात. पण आज या प्रक्रियेला मोठी चालना मिळत आहे. बुद्धाच्या पहिल्या पिढीने जो भेदभाव झेलला तो आत्ताच्या पिढीने झेलला नाही .पण आज नव्या स्वरूपाचा मनुकपटाची राज्यव्यवस्था निर्माण झाली आहे . बौद्ध समाजावर होणाऱ्या अन्यायावर आता वाचा फोडली जात नाही. वर्तमान सरकारने बौद्ध बांधावर अन्यायाचा परवाना दिला आहे. यामुळे आंबेडकरी भवन पाडल्या जाते .आंबेडकरी कमान पाडली जाते .आपण संघर्ष करण्यापेक्षा राजकारणात व धर्माकारणात मशगुल आहोत. जयंतीला आपलाच पैसा बरबाद करून आपण आपली राजकीय अस्मिता व आंबेडकरी विचारांना विचारांशी प्रतारणा करत आहोत.

आज अनेक राजकीय लोकांनी आंबेडकरवादी लेखकाला आपल्या कळपात घेतले आहे. त्यांची तळपती तलवार लेखणी आता बंद पडली आहे का हा प्रश्न मला पडलेला आहे.

विद्रोहाचे पाणी पेटू लागणारी आग आता कमी झाली का ..? असा प्रश्न मला पडलेला आहे. काही बौद्ध लेखक राजकारणाची सोबत आहेत. त्यांना पुरस्कार मिळाला तर जमलं अशी भावना काही बौद्ध लेखकाची आहे.

साठोत्तरी साहित्यातील पहिल्या पिढीच्या वेदना ,आक्रोश व नकार प्रतिध्वनीत झाला होता. दुसऱ्या पिढीतील लेखकांनी आपल्या लेखणीला विस्तारले आहे.त्यात लोकनाथ यशवंत, केतन पिंपळापूरे, भाऊ पंचभाई, युवराज सोनटक्के, प्रेमानंद गज्वी, प्रमोद वाळके,राहूल वानखेडे, इत्यादी. धम्मविचार आंबेडकरविचार घेऊन त्यांनी जगाला नवे शब्द दिले आहेत. पण १९९१ च्या जागतिकीकरणाने बौद्ध बांधवासमोर मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. तो म्हणजे जीवनमरणाचा. संविधानाने दिले अधिकार काढले जात आहेत. नोकऱ्याचे आरक्षण कमी झाले आहे. सरकारने भरतीवर बंदी आणली आहे. उद्योजकांना भांडवल मिळत नाही. आपला संघर्ष न थांबता पुन्हा त्याच परिघावर आपण आलेला आहोत. आर्थिक प्रगती करता बौद्ध बांधव धडपडत आहेत .काही बौद्ध लेखक त्यांनी आर्थिक क्रांतीची नवी पेरणी केली आहे. पण त्याला पाहिजे तेवढे यश आले नाही .

आजचे बौद्ध साहित्य कसदार नाही असा आरोप केला जातो .पण आजचे आंबेडकरवादी साहित्य अत्यंत कसदार आहे .नव्या विचारांची नवी पेरणी तरुण मंडळी करत आहेत. आज आंबेडकरवादी तिसरी पिढी नव्या परिवर्तनासाठी लढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी मोठी क्रांति केलेली आहे .जीवन मरणाच्या प्रश्नासोबत देशांतर्गत प्रश्न, स्त्री प्रश्न, ओबीसी प्रश्न, कामगार, शेतकरी, विद्यार्थी ,आरक्षण बेरोजगार असे अनेक समस्येवर त्यांनी लेखन केले आहे. दीपककुमार खोब्रागडे, सुनील रामटेके, भीमराव गायकवाड, दीपक रंगारी, संदीप गायकवाड, मनोहर नाईक ,संजय गोडघाटे, नागेश वाहुरवाघ, खेमराज भोयर, रजनी संबोधी, विलास गजभिये, पूर्णिमा मेश्राम,प्रसेनजीत गायकवाड, महेंद्र गायकवाड ,सुरेश वर्धे,मनोहर नाईक अशा विविध तरुण लेखकांनी आपल्या लेखनाचे विषय विस्तारलेले आहेत. संदीप गायकवाड यांनी क्रांतीगर्भ ह्या लघु चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी समाजाचे दुःख चित्र रेखाटलेले आहे. नागेश वाहुरवाघ यांनी देहदान या चित्रपटातून नव्या विचारांची ओळख समाजाला करून दिलेली आहे. पण ही संख्या फार कमी आहे. बौद्ध लेखकांनी आपली लेखणी खेड्यापाड्यातील लोकांच्या प्रश्नावर वाढवावी. खेडे आजही जातीचे आगर आहेत. आजही बौद्ध बांधावावर अन्याय अत्याचार होत आहेत. राजकीय शक्ती क्षीण झाल्याने मुजोराची खोगीरभरर्ती अन्याय करत आहे. देशातील राजकीय शक्ती हुकूमशाही वृत्तीने वागत आहे. अशा वातावरणात नव्या बौद्ध लेखकांना मोठ्या शितापतीने लेखन करावे लागते. आज आपण काय लिहितो यावर सरकारची नजर आहे. पण आपल्याला ते मांडावेच लागेल .आपण बौद्ध लेखक, आंबेडकरवादी लेखक नव्या क्रांतीचे पाईक आहोत.

प्रस्थापित व्यवस्था आपल्या शब्दक्रांतीला जाणून आहे. म्हणून आपण आपली शक्ती संघटनेच्या स्वरूपात ठेवून. आपली नवी कलाकृती मनुष्यत्वाला नवा आयाम देणारी तयार करावी. १९५६ नंतरचा बौद्ध लेखकांनी नवी ऊर्जा आपल्याला दिली. आपण दुसऱ्याच्या ओजळीने पाणी पिण्यापेक्षा संविधानात्मक विचार करणाऱ्या समविचारी पक्षासोबत बरोबरी करून आपली राजकीय व सामाजिक क्रांती करावी . आपल्यातील हेवेदावे सोडावे.समरसता मंचावर जाऊन ज्ञान पाजळण्यापेक्षा आपल्या संघटनेला भक्कम करावे.आपल्या लेखकाची कलाकृती स्वतःच्या पैशाने घेऊन वाटावी तेव्हाच आपले साहित्य समाजापुढे जाईल.याशिवाय बौद्ध लेखकांना अर्थ उरणार नाही .

समतेच्या मुळांना आग लावणाऱ्या हिंस्त्र पशूना ओळखा रे ||
देश बर्बाद करणाऱ्या विषारी
सापांना ठेचा रे ||
संविधान नष्ट करून पाहणाऱ्यांना जागा दाखवा रे ||
बौद्ध विचारांची धगधगीत मशाल पुन्हा पेटवा रे.||

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००