सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करा – सिध्दार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना)

187

✒️उमरखेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

उमरखेड(दि. 15 डिसेंबर):-येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद दुधे, कनिष्ठ अभियंता वसंत खसावत आणि सहाय्यक अभियंता ढोले यांनी विभागातील कामांमध्ये भ्रष्टाचार करून दि. 11 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळीच्या नावावर हजारो रुपयाचे पॉकेट पत्रकारांना का वाटले याची विचारणा करून या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे तक्रार निवेदनात नमूद केले आहे.

सविस्तर वृत्त असे की उमरखेड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यकारी अभियंता प्रमोद दुधे, कनिष्ठ अभियंता वसंत खसावत, सहाय्यक अभियंता ढोले यांनी कार्यकारी अभियंता दुधे यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांना बोलावून आपल्या उपविभागातील विविध कामाचा भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून दिवाळीच्या नावाखाली दहा हजार,पाच हजार, तीन हजार, दोन हजार रुपयांचे पॉकेट तयार करून हजारो रुपये पत्रकारांना वाटप केले आहेत.

सदर घटनेचा व्हिडिओ फुटेज आणि यावेळी साक्षीदार म्हणून उपस्थित असणारे व्यक्ती अर्जदार यांच्या सोबत आहेत.यावरून असे लक्षात येते की,या उपविभागात मोठ्या प्रमाणावर सावळा कारभार करून भ्रष्टाचार होताना दिसत आहे.

आणि अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून मागील महिन्यात प्रसिद्ध झालेले आहेत.पण यावर संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.

अभियंता दुधे, कनिष्ठ अभियंता खसावत आणि सहाय्यक अभियंता ढोले यांची खातेनिहाय चौकशी करून यांची मालमत्ता तपासणी करावी तसेच दोषी आढळल्यास यांच्यावर कडक कारवाई करावी. अशी तक्रार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांना ईमेल द्वारे केली आहे.

यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल. यात जीवितहानी झाल्यास संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग जबाबदार राहील.असे तक्रारकर्ते सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भीम टायगर सेना, उमरखेड) यांनी तक्रारी निवेदनात म्हटले आहे.