अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व कथाकार प्रा.डॉ.सतीश तराळ यांचे अध्यक्ष भाषण

146

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जि .जळगाव व मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दि. 24 डिसेंबर 2023 ला झालेल्या तिसऱ्या अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व कथाकार प्रा.डॉ.सतीश तराळ यांचे अध्यक्ष भाषण वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत.

शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर यांच्या तिसऱ्या अ.भा. शिव मराठी सहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मला दिल्याबद्दल फाऊंडेशनचा मी आभारी आहे. हे संमेलन राष्ट्ररत्न बरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती निमित्त व सानेगुरुर्जीच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या प्रारंभाला आयोजित करण्यात येत आहे. मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती येथे स्व. दादासाहेब काळमेघ साहित्यनगरीत हे संमेलन होत आहे याचा मला आनंद वाटतो. अमरावती जिल्हा मराठी वाङमयाचे उगमस्थान आहे. मराठी साहित्याची सरिता अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूरला उगम पावली. लिळाचरित्र हा मराठीतील आद्यग्रंथ आहे. तो ज्ञानेश्वरीच्या १२ वर्षे आधी लिहिला गेला. महदंबेचे ढवळे ही मराठीतील आद्य कविता आहे. ती ही रिध्दपूरला लिहिली गेली. मराठीचे आद्य बाङमय रिध्दपूरला अमरावती जिल्ह्यात लिहिले गेले. महानुभाव वाङमय समृध्द आहे. चक्रधर ही या वाङमयाची प्रेरणा आहे.भाऊसाहेब ऐतिहासिक आणि अलौकिक व्यक्तीमत्व होते. मातीशी घट्ट नाळ असणारा हा महामानव ज्ञानप्रकाश वाटणारा जीवंत सूर्यबिंब होता.

भाऊसाहेब परिवर्तन, प्रबोधनाचे महामेरू होते. त्यांचे व्यक्तिमत्व अतिशय क्रियाशील, कृतीशील व प्रेरणादायी होते. विदर्भाचे भाग्यविधाते म्हणून त्यांचा उल्लेख केला जाते. प्रत्यक्षात ते भारताचे भाग्यविधाते होते. त्यांचे जीवनकार्य विस्मयकारक आहे. प्रचंड कार्य त्यांनी केले. त्याचे संपूर्ण जीवन स्फुर्तीदायक व प्रेरणादायी आहे. ते समाज क्रांतीचे उद्‌गाते व प्रवक्ते होते. ‘लोकमहर्षी’ म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो महर्षी म्हणजे महान असा ऋषी भाऊसाहेब ऋषीचा आधुनिक अवतार होते. ‘सुटासुटातील संत’ असाही त्यांचा उल्लेख केला जातो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लोकसंत गाडगेबाबा यांच्या ठिकाणी जो जनकळवळा होता तसाच भाऊसाहेबांच्या ठिकाणी होता. संतांची शुचिता आणि मूल्यभाव त्यांच्या ठिकाणी होता. ते स्वतः महान ज्ञानोपासक, ज्ञानयोगी होते ज्ञानप्रसाराचे त्यांचे कार्य “वैश्विक पातळीवर महत्वाचे आहे. भाऊसाहेब ही अक्षय चेतना आणि प्रेरणा होती त्यांचे व्यक्तिमत्व चैतन्यदायी होते. शेतकरी, कष्टकरी, जनसामान्य यांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी ते अहोरात्र झटले. त्यांनी राजसत्तेचा उपयोग जनसेवेसाठी केला.

संतांप्रमाणे ‘जनीजनार्दन’ अशीच त्यांची धारणा होती. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ अशीच त्यांची संतांसारखी वृत्ती होती. जनसामान्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. संतांनी आध्यात्मिक, धार्मिक जनजागरणावर लक्ष केंन्द्रीत केले. ऐहिक जीवनापेक्षा पारलौकिक जीवनावर त्यांचाभर अधिक होता तर भाऊसाहेबांनी लौकिक जीवन सुखी समाधानी करण्यासाठी शिक्षणास्त्राचा उपयोग केला. शिक्षणाचा केवळ त्यांनी प्रचार-प्रसारच केला नाही तर प्रत्यक्ष शाळा-महाविद्यालये काढून खेड्यापाड्यातही शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. विदर्भातील बहुजन समान त्यांच्यामुळे शिक्षित झाला. आधुनिक विदर्भाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. भाऊसाहेब असंख्य शाळा महाविद्यालये उघडणारे केवळ शिक्षणसम्राट नव्हते तर ते महात्मा फुले, महात्मा गांधी, रविन्द्रनाथ टागोर यांच्या सारखे शिक्षणशास्त्रज्ञ होते.भाऊसाहेब जसे शिक्षणशास्त्रज्ञ होते तसेच ते समाजशास्त्रज्ञ होते. त्यांना समाजाची एक विशिष्ट रचना हवी होती त्याबाबतीत त्यांचा दृष्टीकोण स्पष्ट होता. त्यांना सर्वांगपरिपूर्ण लोकशाही समाजरचना हवी होती. त्यांना कोणत्याच प्रकारचा भेदाभेद व उच्चनिचता मान्य नव्हती. सर्वसमाज कापडाच्या पोताप्रमाणे एकसंघ असावा अशी त्यांची विचार सरणी होती.

श्रमनिष्ठा त्यांना महत्वाची वाटत होती व श्रमातूनच माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त व्हावे असा त्यांचा विचार होता. कृतीशिलता हा त्यांचा स्थायीभाव होता व बहुजनसमाज कृतीशिल व्हावा या साठी त्यांचे प्रयत्न होते. भाऊसाहेब ज्ञानोपासक होते तसे ते बलोपासकही होते.संयुक्त महाराष्ट्रात विदर्भ (अकोला, नागपूर करार करून) सहभागी झाला तो भाऊसाहेबांमुळे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत भाऊसहेबांचे योगदान फार मोठे आहे. पंडित नेहरू त्यांच्या वकृत्वाचे व विद्वतेचे चाहते होते. जागतिक कीर्तीचे तत्वज्ञ व भारताचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनीही भाऊसाहेबांच्या कार्याचा, वकृत्वाचा, कर्तुत्वाचा, विद्वतेचा गौरव केला आहे. भाऊसाहेब कर्ते सुधारक आणि शक्तीशाली लोकनेते होते. हे तर सर्व श्रृतच आहे परंतु त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. ज्ञान, कर्म, आणि भक्ती यांचा उत्कृष्ट संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. ज्ञानमहर्षी, शिक्षणमहर्षी, सहकारमहर्षी, कृषीमहर्षी अशी विशेषणे त्यांच्यासाठी वापरली जात असली तरी त्यांचे व्यक्तिमत्व व कार्य त्या पलिकडचे होते. गाडगेबाबा प्रमाणेच त्यांना लोकोत्तर, अलौकिक हीच विशेषणे योग वाटतात.

भाऊसाहेब लोकनेते होते. एकूण तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. भाऊसाहेब हाच लोकांचा पक्ष होता. भाऊसाहेब ज्या पक्षाने उभे राहतील त्याला लोक मते देत. भाऊसाहेब दहा वर्षे या देशाचे कृषिमंत्री होते. भारतीय कृषि क्षेत्रातच नाहीतर वैश्विक कृषिक्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे मानले जाते. जपानी भातशेतीचा प्रयोग, जागतिक कृषि प्रदर्शन, कर्जलवाद बील अशी अनेक महत्वाची चीरस्मरणीय कार्य त्यांनी केली आहेत.भारतीय संसदेतील डॉ पंजाबरावांचे कामगीरी हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. त्यांनी लोकसभेत मांडलेले विचार, विचारलेले प्रश्न व केलेली चर्चा अत्यंत महत्त्वाची व त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी आहे. भारतीय राज्य घटना निर्मितीतील त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या कार्याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरु, राजेन्द्रप्रसाद यांनी प्रशंसा केली आहे. ५०० सुचना त्यांनी घटनानिर्मिती दरम्यान केल्या घटनेत अनेक चांगल्या बाबी त्यांच्यामुळे समाविष्ट केल्या गेल्या डॉ. आंबेडकरांना भाऊसाहेबांची खूप मदत झाली. हे बाबासाहेबांनी स्वतः सांगितले आहे. घटनेतील उणीवाही भाऊसाहेबांनी स्पष्ट केल्या होत्या .शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक सुधारणा, घटनानिर्मिती आदि क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांनी बहुविध क्रांती कार्य केले.

विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तन व सामाजिक समतेचा धीरोदात्त नायक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो तो योग्य आहे. त्यांचे व्यक्तिमत्व, समृद्ध, कर्तृत्व अफाट आणि नेतृत्व विशाल होते. विदर्भाचे हृदय सम्राट, विदर्भाचे पंचप्राण असा त्यांचा केला जाणारा उल्लेख रास्त आहे. त्यांनी विवेकवादाचा पुरस्कार केला. अभिजनवाद, भांडवलशाही याला त्यांनी विरोध केला. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याची दुरावस्था स्पष्ट केली. पंजाबरावांनी ती अवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कृषक चळवळीचे महात्मा फुल्यांनंतरचे ते समर्थ सेनापती होते. त्यांनी राष्ट्रीयत्वाच्या पुढे जावून आंतरराष्ट्रीय मानवतावादाचा, विश्वबंधत्वाचा, विश्वशांतीचा विचार मांडला.

त्यांना गरीबी आणि विषमता विरहित समाज हवा होता. जातीभेद, पंथभेद, त्यांना मान्य नव्हता. आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जातीयता नष्ट करावी असे त्यांचे मत होते. त्यांना परिपूर्ण लोकशाही व्यवस्था हवी होती. शेतीनिष्ठा, सहकारनिष्ठा ही त्यांच्या व्यक्तीमत्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांचे राजकारण बहुजनांच्या सेवेसाठी होते. त्यांनी शेतीच्या आधुनिकीकरणावर व यांत्रिकीकरणावर भर दिला. भारत कृषक समाज ही त्यांची भारतीय पातळीवरील शेतकरी संघटना होती. शेतकऱ्यांची समृद्धी त्यांची सर्वांगीण प्रगती हेच त्यांचे ध्येय होते. त्यांनी शेतकरी व ग्रामीण लोकांना शिक्षण, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला. वंचितांसाठी उन्नतीच्या वाटा खुल्या केल्या.मध्यप्रांत वाऱ्यात मंत्री असतांना शिक्षणकरात वाढ करून त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी केल्या. १९३२ साली देवस्थान संपत्ती बील पास करून देवस्थानच्या पंडित जमीनी वाहातीखाली आणल्या. १९३३ साली कर्ज लवाद बील पास करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. इंग्रजांच्या काळात त्यांनी हे सर्व केले. ही बाब महत्वाची आहे. पडीत जमीनी लागवडीखाली आणाव्या यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ह्या जमीनी गरीब शेतकऱ्यांना दयाव्या असा त्यांचा आग्रह होता.

आजही हजारो एकर जमीन पडीत आहे. हिन्दुदेवस्थान बीला बाबत त्यांचे विचार असे होते की देवस्थानची व्यवस्था सरकारने योग्य पद्धतीने पहावी व शिल्लक संपत्तीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी करावा आजही अनेक देवस्थानचे उत्पन्न लाखो- करोडो रुपये आहे. समाजाचा हा पैसा समाजाच्या कामात येत नाही. आजही देवस्थानबीलाची आवश्यकता आहे. मंदिरेही समाजोन्नतीची व सांस्कृतिक केन्द्रे व्हावीत अशी त्यांची अपेक्षा होती. बहुजनांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील असले तरी त्यांच्या ठिकाणी ब्राह्मण द्वेष नव्हता. ब्राह्मणेत्तर पक्षात ते सहभागी झाले नाहीत.ते अनाथांचे नाथ होते. त्यांनी विवेकानंद, राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे धर्मचिकित्सा केली. कर्मकांडीधर्मला विरोध नोंदवला. ते ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा त्रीवेणी संगम असलेले ज्ञानयोगी आणि कर्मयोगी होते. जननायक होते. युगनायक होते. भारतभूषण, भारतरत्न होते.

आज मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात व देशात गाजतो आहे. इतर मागासवर्गीय व मराठ्यांमध्ये भांडण लावल्या जात आहे. द्रष्ट्या पंजाबरावांना मराठ्यांच्या आरक्षणाची आवश्यकता त्याचवेळी लक्षात आली होती व त्यांनी मराठ्यांना आपली जात कुणबी नोंदवण्याचा सल्ला दिला होता. बहुसंख्य वैदर्भीय जनतेने तो मान्य केला. ज्यांनी तो आचरणात आणला नाही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. विदर्भाबाहेरील मराठ्यांनीही आपली जात कुणबी नोंदवली असती तर आज मराठा आरक्षणाचा संघर्ष करावा लागता नसता.मराठ्यांना इतर मागास प्रवर्गातुन आरक्षण मिळाले असते. भाऊसाहेबांनी लिहिलेला प्रबंध, त्यांची भाषणे, त्यांनी चालवलेली वृतपत्रे, त्यांनी संत तुकारामावर लिहिलेले अभंग याचा विचार केला तर ते उत्तम लेखक होते. त्यांना लिहायला सवड मिळाली नाही. केवळ त्यांनी लेखन केले असते तर ते मोठे साहित्यिक झाले असते.

डॉ. पंजाबराव, लोकसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी समकालीन होते. त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांचे कार्य एकमेकांना पुरक होते. त्यांच्या विचारातही खूप साम्य होते. तिघेही प्रबोधन, परिवर्तनाचे कार्य करीत होते. तिघेही पुरोगामी, विवेकवादी होते. तिघांवरही गांधीवादाचा, फुले-आंबेडकरवादाचा प्रभाव होता. गाडगेबाबा व राष्ट्रसंत यांच्या प्रमाणेच समन्वय महर्षी संत गुलाबराव महाराज यांचे वाङ्मयीन कार्य महत्वाचे आहे. चौतीस वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी १३१ ग्रंथांची निर्मिती केली. त्यापैकी ३१ ग्रंथ संस्कृत आहेत. धर्म, अध्यात्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, आयुर्वेद, साहित्यशास्त्र, लिपी विज्ञान, संगीतशास्त्र, योगशास्त्र इत्यादी शास्त्रांमध्ये ते पारंगत होते. पाश्चिमात्य व पौरात्य तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी केला होता. त्यांची ग्रंथरचना विपूल व पांडित्यपूर्ण आहे. प्रतिभा, प्रज्ञा, पांडित्य परिष्करणाची ते सजीव मूर्ती होते. ते प्रकांड पंडित होते. विविध शास्त्रांचे ज्ञानशाखांचे आश्चर्यकारक ज्ञान त्यांना होते. दृष्टिहीनतेवर मात करून ग्रामीणभागात वास्तव्य करून त्यांनी विपूल अमूल्य ग्रंथनिर्मिती केली. ते स्वतःचा उल्लेख ‘ज्ञानेश्वर कन्या’ असा करत. त्यांच्या महान कार्याची समाजाने अजूनही पाहिजे त्या प्रमाणात नोंद घेतली नाही. गाडगेबाबा व राष्ट्रसंतांचे मोठेपण जेवढे अधोरेखित झाले तेवढे गुलाबरावांचे झाले नाही.

अंधत्वामुळे व अल्पआयुष्यामुळे ते गाडगेबाबा, राष्ट्रसंत यांच्याप्रमाणे समाजात मिसळू शकले नाही. गाडगेबाबा, राष्ट्रसंत, कर्मयोगी होते तर गुलाबराव महाराज ज्ञानयोगी होते.गुलाबराव महाराज प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते, अंधश्रद्धा विरोधी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी होते. मराठी, हिन्दी, ब्रज, संस्कृत वन्हाडी या भाषांमधून त्यांनी लेखन केले. त्यांची संस्कृत गद्य-पद्य रचना संस्कृत पंडित कवींच्या बरोबरीची मानली जाते. ते पंडित होते तसेच शिघ्रकवी होते. त्यांनी विपूल काव्यरचनाही केली आहे. ते संगीताचे उत्तम जाणकार होते. त्यांच्या सर्व काव्याला त्यांनीच चाली दिल्या. ते उत्तम गात असत. ते शास्त्रीय संगीताचे जाणकार होते. ‘गानसोपान’ नावाचा संगीतावरील महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. भारतीय संगीतातील गार्गी व देशी प्रकारांचा समन्वय साधून एकत्रिकरणाचा प्रयत्न त्यांनी केला. नादोपासना पद्धतीने ईश्वरप्राप्तीचा मार्ग त्यांनी दाखविला. त्यांनी योगात नवीन योगिक क्रियांची भर घातली. योगरहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. शंकराचार्यांचा अद्वैतवाद व नारदाची भक्तीसूत्रे यांचा अनोखा समन्वय त्यांनी साधला हे त्यांचे कार्य तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील महत्त्वाचे कार्य आहे. पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्याच्या मर्यादा स्पष्ट केल्या. जगदीशचंद्र बसू यांची वनस्पतीशास्त्र विषयक पुस्तके त्यांनी अभ्यासली होती. विज्ञान, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी मौलिक कामगिरी केली.

धर्मपंथांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करून त्यांनी त्यांचा समन्वय केला. यामुळे विश्वातील सर्वधर्म पंथभेद मिटू शकतात. आंतरराष्ट्रीय मानवधर्माचा हा जाहिरनामा आहे. संत गुलाबराव महाराज यांनी साहित्यशास्त्राची मांडणी केली, ती महत्वाची आहे.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी विपुल वाङ्मय निर्मिती केली आहे. जवळपास पाउणशे गद्य ग्रंथ, साडेतीनहजार भजने आणि ग्रामगीता असे त्यांचे वाङ्मय संखेच्या दृष्टीनेही विपूल आहे. परिवर्तनाचे महानमूल्य या साहित्याला प्राप्त झाले आहे. त्याचे सारेच साहित्य प्रबोधनवादी परिवर्तनवादी आहे. तुकडोजी प्रज्ञावंत शिघ्रकवी होते. त्याची ग्रामगीता हा तर आधुनिक मराठी साहित्यातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे. तुकडोजी संत म्हणून जसे श्रेष्ठ आहेत तसेच ते संतकवी साहित्यनिमति म्हणून श्रेष्ठ आहेत.ग्रामजीवन, ग्रामजीवनाच्या समस्या, ग्रामाच्या रितीभाती, ग्रामीणांच्या जीवननिष्ठा, त्यांच्या श्रद्धा, भावना, व्यथावेदना, त्यांची शेतीभाती त्यातून निर्माण झालेल्या समस्या, त्यांची व्यसने, त्यांचा पराक्रम या सगळ्यांशी संबंधित ग्रामीण जाणीवेतून निर्माण होणारे साहित्य ग्रामीण साहित्य. कृषिकेन्द्रीतता, ग्रामीणपरिसर, गावगाडा ग्रामीण रितीभाती ग्रामीणबोली, ग्रामीण माणसाची मनोवृती मानसिकता त्याचा भावभावना, व्यथावेदना, रंजनशृंगारादी बाबी लक्षात घेऊन सहृदयतेने त्यांच्या जीवनाचे चित्र ज्या साहित्यात रेखाटले जाते त्याला ग्रामीण साहित्य संबोधतात. आधुनिक ग्रामीण साहित्यात विद्रोह आहे. मराठी ग्रामीण साहित्य समृध्द आहे.

तुकडोजींची भाषणे, प्रवचणे, भजणे व त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ या त्यांच्या सर्व साहित्याचा अर्तभाव ग्रामीणसाहित्यात करणे जास्त इष्ट आहे. ग्रामीण माणसाच्या सर्वांगिण उध्दारासाठीच त्यांनी हे सर्व वाङ्मय निर्माण केले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व ग्रामीण जीणीवांनी ओतप्रोत आहे. ग्रामजीवन व ग्रामव्यवहार याची त्यांना उत्तम जाण आहे. गाव सुखी संपन्न करण्याची त्यांची धडपड, तळमळ आहे. तुकडोजींचे प्रबोधनवादी साहित्य ग्रामजाणीवेच्या अंगाने प्रसवते आणि म्हणून ते ग्रामीणसाहित्याला अधिक जवळचे ठरते. ग्रामगीतेसारख्या ग्रंथाचा अर्तंभाव ग्रामीण साहित्यात झाल्याने ग्रामीण साहित्याचे दालन दैदिप्यमान होईल. तुकडोजीच्या भजनांमुळे ग्रामीण कवितेत एक नवे दालन निर्माण होईल. तुकडोजींचा पिंडच ग्रामीण आहे. तुकडोजी ग्रामीण व्यक्तिमत्वाचे आदर्श उदाहरण आहेत. तुकडोजींच्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वातून स्फुरलेले ग्रामीण साहित्य ग्रामीण साहित्यालाही एक वेगळा वैभवशाली दर्जा मिळवून देणारे आहे. तुकडोजीच्या साहित्याने वैदर्भिय ग्रामीण साहित्याला अत्यंत मानाचे स्थान प्राप्त होईल.

मराठी संत परंपरा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात व विश्वातही महत्त्वाची आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम दोघेही महान कवी. संस्कृतात बंदिस्त गीताज्ञान जनसामान्यांसाठी यादवकालीन मराठी लोकभाषेत आणणारे ज्ञानेश्वर बंडखोरच! कवी बी म्हणतात, ‘या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. ‘बोली अरुपाचे रूप दावील’ ही ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञा त्यांनी खरी केली. ‘ज्ञानेश्वरी विविध रसभावांनी फुललेला, सोनियाचा सुगंध लाभलेला काव्याचा अनमोल ठेवा आहे.’ ते तत्त्वज्ञ कवी होते.मराठी काव्यप्रांतात तुकारामांचे अभंग अत्यंत महत्त्वाचे, अभूतपूर्व अनन्यसारधारण आहेत. ‘तुकारामांचे अभंग म्हणजे त्यांच्या थोर अंत:करणातील खोल खळबळीचा गोड आविष्कार’ असे म्हटले गेले ते योग्य आहे. त्यांच्या काव्याला आत्मानुभुतीचे अधिष्ठान आहे. अभंगरचनेला त्यांनी उतुंगता प्राप्त करून दिली. सरलता, सुलभता, अनअलंकृतता, सौंदर्य ही त्यांच्या अभंगरचनेची
वैशिष्ट्ये आहेत. समाजोद्वाराची तळमळ, कमालीची संवेदनशीलता, पाखंडखंडन, ध्येयवादीवृत्ती, जहालपणा, प्रक्षोभ यांनी त्यांचे अभंग ओतप्रोत आहेत. केवळ बेचाळीस वर्षांचे (१६०८ ते १६५०) आयुष्य तुकारमाांना लाभू दिले. भोंदूगिरी, ढोंगीपणा, पाखंडीवृत्ती, कर्मठ धार्मिकता, अमानुष सामाजिकता इत्यादी अनिष्ट बाबींविरोधात त्यांनी यशस्वी लढा उभारला. धार्मिक, सामाजिक प्रबोधानकार्यात त्यांना प्रचंड यश प्राप्त झाले. ईश्वरभक्तीप्रमाणेच समाजोद्वारावर त्यांचा भर होता, चातुर्वर्णावर प्रखर हल्ला चढवत भेदाभेद नाकारून त्यांनी समतेचा संदेश दिला. तुकाराम विद्रोही, पुरोगामी व समाताधिष्ठित विचारसरणीचे होते. भक्ती हाच त्यांच्या काव्याचा मुख्य रस आहे. त्यांनी सुलभ आणि सहजशक्य अशा नामभक्तीचा प्रभावी पुरस्कार केला. त्यांचे अभंग म्हणजे उत्कट भावाविष्कार आहे. भक्तीचा महिमा त्यांनी वर्णीला आहे. भक्तीच्या शक्नीने परेश्वर प्राप्ती हेच त्यांचे ध्येय आहे.

भालचंद्र नेमाडे म्हणतात, ‘तुकारामाने धर्माकडे केवळ आपल्या स्वतःच्या मुक्तीचे साधन म्हणून नव्हे तर अखिल मानवजातीच्या मुक्तीचे साधन म्हणून पाहिले.’ त्यांना मानवमुक्तीची तळमळ होती. त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्या काव्यात आविष्कृत झाले आहे. ते संत आणि सुधारक आहेत. ‘त्यांची भूमिका कर्त्यासुधारकाची आणि जातीवंत साहित्यिकाची आहे.’ समाजोद्वार हेच त्यांचे ध्येय आहे. जीवनानुभवातून आणि आत्मचिंतनातून गवसलेली तत्त्वे ते अभंगातून आविष्कृत करतात. आपला अनुभव ते प्रखरपणे, तीव्रपणे, स्पष्टपणे, आवेगाने मांडतात. निःष्काम कर्मयोगाचा प्रभावी पुरस्कार त्यांनी केला आहे. तुकारामाचा अभ्यास कवींना प्रेरक ठरणारा आहे.
पुण्यश्लोक परमवीर छत्रपती संभाजी राजे भारताच्या इतिहासातील एक अलौकिक व्यक्तिमत्व होते. त्यांना केवळ बत्तीसवर्षाचे आयुष्य लाभले. प्रक्षा, प्रतिभा पांडित्य व पराक्रमाचा अद्‌भूत मेळ त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. संभाजीराजे भाषा प्रभू होते. त्यांना सर्व भारतीय भाषांचे ज्ञान होते. त्यांना इंग्रजी, फ्रेंच, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज, उर्दू, हिड्नु, फारशी भाषा येत होत्या. ते संस्कृतचे पंडित होते. ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ त्यांनी लिहिला. हा ग्रंथ वाचला की त्यांनी सर्व क्षेत्राचा व शास्राचा सखोल अभ्यास केला होतो याची जाणीव होते. त्यांनी तत्कालीन सर्व धार्मिक, राजकीय, तत्वज्ञानविषयक ग्रंथाचे अध्ययन केले असल्याचे ‘बुधभूषण’ वरून जाणवते. संभाजी महाराजांनी भोजपूरी हिंदी भाषेतही ग्रंथ निर्मिती केली. ‘सातसतक’, ‘नखशिखा’, ‘नायिकाभेद’ हे भोजपूरीतील त्यांचे ग्रंच आहेत. ते बहुभाषिक, भाषाप्रभू आणि प्रज्ञावंत साहित्यिक होते. या त्यांच्या महान वैशिष्ट्याकडे व क्षमतेकडे दुर्लक्ष्य झाले आहे. त्यांचे जीवन आणि लेखन प्रेरणादायी आहे.

सावित्रीबाई प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. काव्यफुले (१८५४) व बावनकशी सुबोध रत्नाकर (१८९२) हे दोन कविता संग्रह व काही स्फुट रचना असे त्यांचे काव्य आज उपलब्ध आहे. त्यांच्या काव्याला ऐतिहासिक दृष्टीने फार महत्त्व आहे. ज्यांना आधुनिक काव्याचे जनक संबोधले जाते त्या केशवसुतांच्या तीस वर्षेआधी त्यांनी काव्य रचना केली, त्यांच्या काव्यात आशय वैविध्य आहे.सरलता, सुबोधता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ये आहेत. दुर्बोधता, क्लिष्टता याचा स्पर्शही त्यांच्या काव्याला झालेला नाही. उपमा, उत्प्रेक्षा यांचा क्वचितच त्यांनी वापर केला. अन् अलंकृतता हे त्याचे वैशिष्टय आहे. त्याच्या ओवी व अभंग रचनेत
सावित्रीबाईंनी मुक्तछंद सादृष्यरचना केली. मुक्तछदाचा त्यानी कलेला वापर काळा कविता विषय अर्पूव, कवितांचे मथळे लालित्यपूर्ण आहेत. निसर्ग व सामाजिक व्यथावेदनांना त्यांनी काव्य विषय बनविले. सामाजिक कवितेच्या त्या जनक आहेत. सहजता, स्वाभाविकता, चिंतनगर्भता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सावित्रीबाईच्या काव्याचा काळ (१८५०- १८९२) व त्यांच्या काव्याचा आशय लक्षात घेतला तर सावित्रीबाई आधुनिक मराठी काव्याच्या आद्य जननी उरतात.दिव्य प्रतिभा लाभलेले, बालकवी, बहिणाबाईचा वारसा पुढे नेणारे महान कवी पद्मश्री ना. धो. महानोर यांचे ३ ऑगस्ट २०२३ रोजी झालेले निधन ही मराठी काव्याप्रांतातील अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या काव्याला मातीचा गंध होता. सहज सुंदर आणि अतिशय तरल अशी त्यांची कविता मनाला भूरळ पाडणारी आहे. ‘रानकवी’, ‘निसर्ग कवी’, ‘शेतीमातीचा कवी’ म्हणून त्यांची ख्याती होती. शेतकऱ्यांच्या व्यथा बेदनांना त्यांनी काव्यरूप दिले. लोकवाङ्मयातील लोकगीतांचा वसा, वारसा त्यांनी समृध्द केला. लोकलळ्यातून, लोकलयीत आविष्कृत होणारी त्यांची कविता लोकमानस भारावून टाकणारी आहे. ग्रामसंस्कृती व लोकसंस्कृतीचा निर्झर त्यांच्या काव्यातून झुळझुळत तिला वेगळेपण प्राप्त करून देतो. सहजता, सुंदरता, विलोभनीयता ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत.

ना. धो. महानोर हे मराठीतील महत्वाचे कवी आहेत. निसर्गकवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. बालकवी, बा. भ. बोरकर,ना. घ. देशपांडे इत्यादी कविंच्या कवितेत निसर्ग चित्रण प्रभावीपणे येते. पण ना. धो. महानोर यांच्या कवितेत निसर्ग त्यांच्या कवितेचा आत्मा आहे. ती निसर्ग वर्णन करणारी कविता नसून निसर्गाची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्गाचे अस्तित्व नाही; निसर्ग एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे. ही कविता निसर्ग भान जपणारी कविता नाही; निसर्ग जिचा स्थायी भाव आहे अशी कविता आहे. त्यांची कविता निसर्गाची स्पंदने आहेत. निसर्गाचे स्वकथन आहे. निसर्गाचे संगीत, निसर्गाचे गीत आहे. सुंदर आणि अर्थपूर्ण निसर्ग प्रतिमांच्या विपूलतेने त्यांची कविता समृध्द झाली आहे. त्यांना हिरव्या बोलीचा कवी संबोधले जाते. ते निसर्गावर प्रेम करणारे कवी नव्हते तर निसर्गासह जगणारे कवी होते. काळ्यामातीत राहाणारे, राबणारे कवी होते. त्यांचे काव्य त्यांच्या अस्सल जीवनानुभवातून फुलले.
फुलात न्हाळी पहाट ओली क्षितिजावरती चंद्रझुले
नभात भिजल्या केशरियाचे रंग फुलावर ओघळले
त्यांचे शब्द साधे पण मनाला वेड लावणारे असतात. त्यांच्या कवितेची लय मनमोहून टाकणारी असते. लोकवाङ्मय, लोकगीत, जुने निसर्ग कवी या परंपरेतून सत्व स्वीकारत ते नवतेलाही कवेत घेतात. परंपरा आणि नवतेचा योग्य मेळ घालत नवी कविता देतात. त्यांची कविता दीर्घायुषीच नव्हे तर चिरंजीव कविता आहे. बोलीतील शब्दांचा प्रयोग हे त्यांच्या कवितेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संगीतातील पराण्यांसारख त्यांनी कवितेच स्वतःच स्वतंत्र घराण, संप्रदाय निर्माण केला.
साहित्यशास्त्राला अनेकदा काव्यशास्र संबोधले जाते एवढा काव्य हा प्रकार वाङ्मयात महत्त्वाचा आहे. कविता म्हणजे काय ? हा एक जटील प्रश्न आहे. गद्य आणि पद्य यांच्या सीमारेषा कशा ठरवाक्याच्या? ती एक कठीण बाब आहे. गद्य आणि काव्याच्या बाबतीत व्यवच्छेदक लक्षण कोणते? कवितेचे स्वरुप नेमके कसे असते? काव्य हा मूलभूत भाषा व्यवहार आहे हे सर्वमान्य आहे. पण तेवढेच पुरेसे आहे का ? भाषेशी संबंधित अर्थाची रचना म्हणजे काव्य, अशी ही काव्याची व्याख्या केली जाते. बा. सी. मर्ढेकर भावनानिष्ठ समतानता निर्माण करणे कवी प्रतिभेचे महत्त्वाचे कार्य मानतात म्हणून नवीन भावनानिष्ठ समानतांची निर्मिती म्हणजे कविता असा अर्थ घेता येतो. ढोबळ मानाने कवीचा अनुभव म्हणजे कविता असे मानले जाते.

कविता हे कवीचे सुजन असते. त्यात कवीच्या भावना, कल्पना, संवेदना, विचार, जाणीवा, अनुभव व्यक्त होतात. कविता शब्दाद्वारे विशिष्ट अर्थातून व्यक्त होत असते. रिचर्डसच्या मते “प्रमाणित अनुभवापासून व एकमेकापासून एका मयदिबाहेर फारशा भिन्न नसलेल्या अनुभवाचा गट म्हणजे कविता.” मर्ढेकरांच्या मते अनुभवांची किंवा भावनिक अर्थाची लयपूर्ण संघटना म्हणजे कविता. सुधीर रसाळ म्हणतात, कवितेला स्वतःचे, वाचकांच्या आकलनावर अवलंबून नसणारे, असे एक रूप असते; ते अशा प्रकारचे असते की ते वाचकांच्या आकलन कक्षेत गेल्यावर त्या रुपाचा भिन्न भिन्न अन्वयार्थ लावला जावू शकतो…’ कवितेच्या अनेक विद्वानांनी अनेक व्याख्या केल्या असल्या व लक्षणे सांगितली असली तरी तिची पूर्णपणे अचूक व्याख्या करता येणे कठीण आहे. कवितेला एक स्वतंत्र सत्तास्थान प्राप्त झालेले असते हे मात्र सर्वमान्य सत्य आहे. अनेकांच्या मतांचा चिकित्सक विचार करुन सुधीर रसाळ म्हणतात, “विविध पातळ्यांवरील असंगत किंवा विसंगत अनुभव घटक शब्दरुपात संश्लेषित होऊन कविता पडत असते; ती स्वप्नासारखी अतार्किक, अनेकार्थी असते; ती प्रतिमांची, प्रतिकांची रचना असते;” तिचा संक्षेप विस्तार करता येत नाही. तिच्यात आशयाभिव्यक्तीचे अद्वैत असते. कविता सेंदिय प्रतिमांनी घडली गेलेली ही एक अशी सेंद्रिय रचना आहे की जी तिचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या अनुभवांना, भाववृत्तींना, स्मृतींना सेंद्रिय संघटनेत रुपांतरीत करते.” कवितेला एक रूप, एक घाट, एक आकृतीबंध असतो.

भाषा हे मानवीसंस्कृतीचे महत्वाचे संचीत आहे. जगात ६९१२ भाषा बोलल्या जातात. भारत बहुभाषिक, बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे. भारतात गणेशदेवी यांच्या मते १७९ भाषा व ५४४ बोली बोलल्या जातात. मराठी ही भारतातीलच नव्हे तर जगातील महत्वाची भाषा आहे. मराठी माणसे भारतभरच नव्हे तर विश्वभर पसरलेली आहेत. सुमारे १३ कोटी लोक मराठीभाषा बोलतात. मराठीच्य अभिजात दर्जासाठी जी रंगनाथ पठारे समिती महाराष्ट्र शासनाने नेमली होती. त्या समितीने मराठीला ५२ बोली असल्याचे म्हटले आहे. काही अभ्यासक मराठीला १५० बोली आहेत असे मानतात. मराठीला अडीच हजार वर्षाची परंपरा, इतिहास असल्याचे रंगनाच पठारे समितीने सिध्द केले आहे. महारडी- मरहड्डी- महाराष्ट्री प्राकृत-अपभ्रंष-मराठी अशी मराठीची उत्त्पती आहे. मराठी संस्कृतपासून जन्मलेली भाषा नाही. मराठी ही जनकजननी न्यायाने तयार झालेली भाषा नाही म्हणून तिचा जन्मकाळ निश्चितपणे सांगता येत नाही. सातवाहान कालीन महाराष्ट्रीचे यादव कालीन मराठीत रुपांतर झाले असे वसंत आबाजी डहाके म्हणतात. मराठी आर्य कुळातील भाषा आहे. आज ज्याला आपण मराठी प्रमाण भाषा संबोधतो ती १८४७ साली मेजर कॅन्डी याने संपूर्ण मराठी प्रदेशातील प्रतिनिधीची समिती न नेमता केवळ पुण्यातील प्रतिनिधींची समिती नेमून भाषाविज्ञानाचे नियम डावलून अवेज्ञानिक पध्दतीने तयार केली. प्रसिध्द भाषावैज्ञानिक ना. गो. कालेलकर म्हणतात (भाषा आणि संस्कृती) ‘विद्यमान मराठी प्रमाणभाषा म्हणजे मराठी भाषा नव्हे. मराठीच्या विविध बोलींमधून मराठीचे जे काल्पनिक रूप सिध्द होते. ती खरी मराठी भाषा होय. मराठीच्या बोलींमधून जी सर्वसमावेशक मराठी तयार होईल ती खरी मराठी. अशी मराठी जनभाषा तयार करणे मराठी पुढील पहिले महत्वाचे आवाहन आहे. मराठी विज्ञान- तंत्रज्ञानाची, कायदा, वैद्यकीय शिक्षणाची ज्ञानभाषाही अद्याप झालेली नाही. भाषाही मौलिक संपत्ती आणि संस्कृती असते.

भाषेच्या संदर्भात बोलीला अत्यंत महत्वाचे स्थान असते. बोली म्हणजे अशुध्द हा समज चुकीचा आहे. भाषा विज्ञानाने वैश्विक पातळीवर बोलीचे महत्व, वारंवार विशद केले आहे. मराठी प्रदेशात भाषा ही जनसामान्यांच्या शोषणाच हत्यार म्हणून वापरली गेली.वर्धेच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या. चपळगावकर दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात ‘मराठीही अनेक बोलीभाषांनी समृध्द बनलेली भाषा आहे. तिचे सौंदर्य आणि सामर्थ्य या बोलींमध्ये दडले आहे. त्यामुळे मराठीच्या जनत आणि संवर्धनासाठी प्राधान्याने या बोलीभाषांवर लक्ष केंद्रित करायला हवे. सर्व बोलीभाषा अधिक चांगल्या पध्दतीने विकसित होण्यात त्यांचा वापर होत राहण्यात मराठीच्या विकासाचे मर्म सामावले आहे.’भाषेची समृध्दी, श्रीमंती बोलीवर अवलंबून असते. एखाद्या भाषेला जेवढ्या जास्त बोली असतील तेवढी ती भाषा समृध्द असते.

भाषा विज्ञानात बोलीचे महत्व जास्त आहे. फ. मु. शिंदे म्हणतात ‘बोली हा भाषेचा जयाशय आणि बलाशय असतो.’ कोणत्याही भाषेचे अस्सल रूप तिच्या बोलीतच असते. बोली भाषेला उर्जा, तेज, शक्ती प्रदान करते. बोली भाषेला नवसंजीवन देते. बोली भाषेला समृध्द, संपन्न करते. गणेश देवी म्हणतात “बोली देशाचे भांडवल झाल्या पाहिजेत” बोलीमध्ये ज्ञान, परंपरा, इतिहास, सांस्कृतिक मूल्ये सामावलेली असतात. बोली भाषा विज्ञानाप्रमाणेच, समाजशास्त्रे, इतिहास आदि दृष्टीने महत्वाच्या असतात. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लेखक, वक्ते स्व. यशवंतराव चव्हाण म्हणाले होते “बोली ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बोली हेच शिक्षणाच्या स्पष्टीकरणाचे निवेदनाचे माध्यम मानले आहे. मराठी भाषेला समृध्द करण्यासाठी तिच्या बोली जगळ्या पाहिजेत, त्यांचे संरक्षण, संवर्धन झाले पाहिजे. मराठी समृध्द होण्यासाठी, ज्ञानभाषा होण्यासाठी, सर्वसमावेशक खरी प्रमाणभाषा होण्यासाठी बोलीचे जतन, संवर्धन आवश्यक आहे. एक्सप्रेशन व कम्युनिकेशन आत्मप्रगटीकरण व संवादही भाषेची ध्येय आहेत. ह्या दोन्ही बाबी प्रमाणभाषेपेक्षा बोलीतून अधिक प्रभावीपणे साध्य होतात. सहज आणि आत्मविश्वासाने होतात. मराठीचे संवर्धन म्हणजे तिच्या बोलीचे संवर्धन, विविध बोलींचे प्रवाह मराठीत येवून मिसळणे म्हणे मराठी प्रदुषित होणे नव्हे ती समृध्द, सकस, संपन्न होणे होय. बोली भाषेपेक्षा जास्त जीवंत, रसरशीत, उर्जावान, हेल, लय युक्त असते. ती श्रवणीय असते.डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण समिती २०१०-यांनी ज्या शिफारशी केल्यात त्या मराठी बोली अकादमीची स्थापना करुन बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोषनिर्मिती, साहित्यनिर्मिती, बोलीतुन होणाऱ्या कलांचे सादरीकरणाचे संवर्धन करणे ही महत्वाची बाब सांगितली आहे. आदिवासी कोश निर्माण करण्याची शिफारस केली आहे.

नव्याने होणाऱ्या मराठी विद्यापीठाने ह्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. प्रत्येक बोली बोलणाऱ्याला आपण बोलतो ती बोलभाषा दर्जेदार आहे याची जाणीव असली पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मराठी तिच्या विविध बोलींसह गृहित धरली जाणे अपेक्षित आहे. लोक बोलतात ती भाषा प्रमाण मानली पाहिजे. प्रमाण भाषेत बोलीतील शब्दांचा उपयोग करुन प्रमाणभाषा व बोली यातील अंतरकमी करता येईल. कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, ललित सर्व प्रकारच्या लेखनात बोलीतील शब्दांचा वापर झाला पाहिजे. बोलीभाषा अधिक अर्थपूर्ण असतात. लोकजीवन त्यात साठवलेले असते. आविष्कृत होत असते. ती लोकसंस्कृतीची वाहक असते. माणसाचा कल उच्चार सुलभतेकडे असतो. भाषेपेक्षा बोली उच्चार सुलभ असते. लेखन सुलभही असते. कुराण, बायबल जनभाषेत आहे. गीता मात्र संस्कृतात आहे म्हणून ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी निर्माण करावी लागली.
मराठीची आजची व्याकरणीक चौकट संस्कृत धार्जिणी आहे. संस्कृत व्याकरणाच्या चौकटीत मराठीला जबरदस्तीने कोंबण्यात आले आहे. बोलींच्या स्वरुपांच्या अनुरोधाने नव्याने मराठी व्याकरणाची मांडणी झाली पाहिजे. ही मांडणी सुलभ आणि लवचिक असली पाहिजे तरच मराठीचे संवर्धन होऊन ती अधिक समृध्द होईल. पूर्वी मराठी मोडी लिपीत लिहिली जायची ५०० वर्षे मराठी मोडीत लिपीत लिहिली गेली. मराठी साठी देवनागरी निवडणे मोठी चूक आहे. भाषावैज्ञानिक मराठीसाठी इंग्रजी ज्या लिपीत लिहिली जाते त्या रोमन लिपीचा आगह करतात. देवनागरीची स्वरमाला, व्यंजनमाला दीर्घ आहे. रोमनमध्ये पाचस्वर तर देवनागरीत बारा स्वर आहेत. संयुक्त व्यंजने, जोडाक्षरे, उकार, वेलांटी, रफार आहेत. ते रोमनमध्ये नाहीत.

म्हणूनच आज मोबाइलवर केले जाणारे मेसेजेस तरुणच नाही तर मराठीचे प्राध्यापकही मराठीभाषेत पण रोमन लिपीत करतात मराठी लेखनाचे नियम व व्याकरण क्लिष्ट आहे. मराठी लेखन सुलभ केली पाहिजे.आपण ८५ वर्षापासून मराठी विद्यापीठाची मागणी करत होतो. विदर्भात रामटेकला संस्कृत विद्यापीठ, वर्ध्यालाच आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे, पण मराठी विद्यापीठ नव्हते. ते आता मान्य झाले आहे. यातून बोलीच्या अभ्यासाला गती आली पाहिजे.मराठीची दुसरी मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ही आहे. याबाबतीत महाराष्ट्रातील राज्यकर्ते कमी पडले. नरसिंहराव दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा दक्षिणेकडच्या राज्यांनी त्यांना पाठींचा देतांना ज्या अटी टाकल्या त्यात त्यांच्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याची अट होती. म्हणून तामीळ, तेलगू, मल्यालम आदी भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अशी इच्छाशक्ती महाराष्ट्रातील नेत्यांना अजूनही दाखविता आली नाही.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याच्या प्रतिक्षेत आज आपण आहोत. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळण्याच्या योग्यतेची आहे ही बाब रंगनाथ पठारे समितीने सिद्ध केली आहे. एखाक्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी केन्द्र शासनाचे काही निकष आहेत. भाषेची प्राचीनता, मौलिकता, सलगता त्याचप्रमाणे भाषेचे भाषिक आणि वाङ्मयीन स्वयंभूपण, प्राचीन भाषा आणि तिचे आजचे रूप यातील नाते आदि निकष मराठी भाषापूर्ण करते तिचा अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. येथे ‘अभिजात’ हा शब्द जातीवाचक नसून त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’ असा अपेक्षित आहे.कार्यकारणभाव मानणारे, विज्ञाननिष्ठ, परिवर्तनवादी आणि श्रेष्ठ प्रतीचे साहित्य म्हणजे अभिजात साहित्य असा अर्थ अपेक्षित आहे. अशा प्रकारचे श्रेष्ठ साहित्य ज्याभाषेत आहे ती भाषा म्हणजे अभिजात भाषा.

मराठी समृद्ध, सशक्त, अभिजात भाषा आहे व मराठीत श्रेष्ठ दर्जाचे साहित्यही मुबलक आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्की, तुकारामाची गाथा आदी त्याची प्रारंभ काळातील उदा. आहेत. आजही मराठी साहित्याला साहित्य अकादमीसारखे राष्ट्रीय पुरस्कार व इतर अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळत आहेत.
मराठी साहित्यात श्रेष्ठ दर्जाचे लेखन आहे, कादंबरी, कथा, कविता त्याचप्रमाणे श्रेष्ठ दर्जाची समिक्षाही मराठीत आहे. पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आज मराठीत लिहिल्या जाणा-या समीक्षेचा विचार केला तर दर्जेदार, अभ्यासपूर्ण, शास्त्रीय अशी मराठी समीक्षा अल्प प्रमाणात लिहिली जात आहे. समीक्षा लेखकांनी अभ्यास केला पाहिजे. समीक्षाशास्त्र समजून घेतले पाहिजे. कलावाद, जीवनवाद, देशीबाद, गांधीवाद, आंबेडकरवाद आदि विचार प्रवाहसमजून घेतले पाहिजेत. समीक्षेत गुणदोष अपेक्षित असतात. पण अनेकदा फक्त लेखकाचे कौतुकच केले जाते. त्याच्या उणीवा, दोष, कच्चेदुवे सांगितले जात नाहीत.कलावादी समीक्षक,आकृतीबंध याला विशेष महत्व देतात. त्यांच्या दृष्टीने अभिव्यक्ती महत्वाची असते. जीवनवादी समीक्षक आशयाला अधिक महत्व देतात. आशय आणि अभिव्यक्ती दोन्हीचा सुवर्ण मध्य साधता आला पाहिजे. मर्ढेकरांचा भर लेखनपूर्व व लेखनातंगत तादात्म्यावर अधिक आहे. भालचंद्र नेमाडे देशीवादच्या अनुषंगाने समीक्षेचा विचार मांडतात, समीक्षेला अभ्यासाचे असर असले पाहिजे अनेकदा समीक्षा म्हणजे गुणगौरव होतो. लेखक कितीही मोठा असला तरी त्याच्या काही उणीवा, दोष असतातच व ते दाखवले गेले पाहिजेत. पण असे होतांना अनेकदा दिसत नाही. समीक्षा वस्तुनिष्ठ गुणदोष दाखवणारी असली पाहिजे.अभिजात साहित्याचे म्हणजे श्रेष्ठसाहित्याचे जे निकष पठारे समितीने आपल्या चौन्याशी पानी अहवालात सांगितले आहेत.त्यानुरुपही कलाकृतीची समीक्षा व्हायला हवी. त्या कलाकृतीत कार्यकारण भाव आहे का? ती विज्ञाननिष्ठ, परिवर्तनवादी आहे का? या बाबींचा विचार व्हायला हवा. तो होत नाही.

बालसाहित्य हा अत्यंत महत्वाचा साहित्य प्रकार आहे. पण मराठीत बाल साहित्य व बाल साहित्यिक यांची उपेक्षा झाली. समाज, राष्ट्र घडवण्यात बाल साहित्याचे योगदान मोठे असते. बालसाहित्याच्या विविध व्याख्या आहेत पण मुलांचे अनुभव विश्व समृध्द करणारे, त्यांच्यावर संस्कार करणारे, त्यांचे मनोरंजन करतांनाच त्यांच्यात साहस, शौर्य, आत्मविश्वास निर्माण करणारे साहित्य म्हणजे बालसाहित्य. आनंद आणि मनोरंजनही बालसाहित्याची महत्वाची ध्येये आहेत. बालसाहित्यावर मूल्य संस्काराची जबाबदारी असते.बहुसंख्य बालसाहित्य शहरी जीवनावर आधारित आहे. त्यात ग्रामीण, आदिवासी, भटक्या विमुक्तांचे जीवन नाही. सर्व जनजीवनावर बालसाहित्य निर्मिती झाली पाहिजे. बालसाहित्यिकाला अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या मान मिळाला पाहिजे. बालसाहित्याला अद्भूत रसाचे वावडे असता कामा नये. बालसाहित्यात उत्कृष्ट विनोदी साहित्य व विज्ञान साहित्य निर्माण झाले पाहिजे. क्यानुरूप बालसाहित्य निर्मिती झाली पाहिजे. २०१० च्या सांस्कृतिक मसुदा समितीने बालसाहित्याचा विचार केला नाही. बालवाङ्मयासाठी स्वतंत्र मासिके ही आनंददायी बाब आहे. मराठीला सानेगुरुजी सारखा दुसरा लेखक निर्माण करता आला नाही ही खेदाची बाब आहे. प्रतिभावंतांनी बालसाहित्य निर्मिती केली पाहिजे. बालसाहित्यातून मुलांना दृष्टी आणि दृष्टीकोण प्राप्त होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे.जागतिक पातळीवर युध्दे, दहशतवाद, वर्चस्वाची महत्वाकांक्षा इत्यादी बाबींमुळे असंतोष, अस्वस्थता आहे. भारतातही मनीपूर जळते आहे. मानवतेचा भेसूर चेहरा पुन्हा एकदा दिसून आला. नोकऱ्या जवळपास संपल्या आहेत. व्यवसाय मोठ्या कंपन्यांनी
गिळकृत केले. तरुणांचे भवितव्य धोक्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. शिक्षण, वैद्यकीय उपचार अत्यंत महाग झाले आहेत. डॉ. नरेन्द्र दाभोळकर, गौरीलकेश, कुलबर्गा सारख्या विवेकवादींचे खून होत आहेत. कर्मकांडाला उधान आले आहे. सर्वधर्मसमभावा ऐवजी धर्मद्वेष वाढवला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून नव्याने जातीयवाद जातीद्वेष वाढत आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. कोरोना सारखी वैश्विक महामारी येऊन गेली. त्याचे दुष्परिणाम अजूनही कायम आहेत. या बदलत्या समाज जीवनाचे चित्र साहित्यात येत आहे. ते अधिक प्रमाणात, अधिक चांगल्या प्रकारे आले पाहिजे. साहित्य समाज जीवनाचा आरसा असतो. नव्या लेखकांमध्ये चांगल लिहिणारे लेखक आहेत ही समाधानाची बाब आहे.

मराठी साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कारासारखे महत्वाचे पुरस्कार मिळत आहेत. मराठी साहित्य समृद्ध आहे ते अधिक समृध्द होत जावे !महात्मा गांधी आणि मराठी साहित्य हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. महात्मा गांधी विश्वातील सर्वात मोठे व्यक्तिमत्व मानले गेले आहे. विश्वात एखादा महापुरुष झाला तर त्याला दद्यायला गांधीशिवाय दुसरी उपमा नाही. नेल्सन मंडेला आफ्रिकन गांधी, मार्टिन लुथर किंग अमेरिकन गांधी. संपूर्ण जगावरच गांधीविचाराचा प्रभाव आहे. पोलंड स्वातंत्र झाला तो गांधी विचाराने. पोलंडचे नोबल पारितोषिक विजेते नेते लेक बॉलेसा म्हणतात ‘शस्त्राने कम्युनिझमशी लढत होतो तेव्हा आम्हाला अपयश येत होते परंतु जेव्हा आम्ही गांधीजीच्या (अहिंसेच्या) मागनि गेलो तेव्हा विजयश्रीने आमच्या गळ्यात माळ घातली. खरच सर्व विश्व गांधीचे शिष्य झाले पाहिजे.” भारतरत्न, युगनायक, शांतीदुत नेल्सन मंडेला यांचा उल्लेख गांधीवादाच्या प्रभावातून घडलेले जागतिक पातळीवरील नेतृत्व असाच केला जातो. गांधी व गांधीवादाचे महत्व त्यांनी वेळोवेळी नमूद केले आहे. वयाच्या शहात्तराव्या वर्षी ते द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्गीय राष्ट्राध्यक्ष झाले व मानवमुक्तीचा लढा त्यांनी यशस्वी केला.
अमेरिकेवर गांधीवादाचा प्रचंड प्रभाव आहे. अमेरिकेतील वंशवादाविरुध्दचे संपूर्ण आंदोलन गांधीविचाराने आणि गांधीजींच्या प्रेरणेतूनच लबले गेले, गांधीची दांडी यात्रा, चलेजाव चळवळ बाडून अमेरिकन क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. अमेरिकेतील काँग्रेस ऑफ रेशियल इक्विटिचे नेत बायार्ड रस्टीन स्वतःला फिरते गांधी समजत असत. फिलिप डॉल्फ यांनी अमेरिकेत ‘मार्च ऑन बॉशिंगटन मुव्हमेंट’ सुरु केली ती सुध्दा गांधी विचारातून १९५६ साली ज्या बस बहिष्कार आंदोलनाने मार्टिन लुथर किय वांना राष्ट्रीय मान्यता मिळवून दिली हे आंदोलन सुध्दा गांधी विचाराने आणि गाधीच्या अनुकरणानेच करण्यात आले होते. गांधीच आपली शेणा असल्याचा स्पष्ट उल्लेख त्यांनी अनेकदा केला आहे. ते म्हणतात ‘गांधीजीमुळे भारतात येणे मला तीर्थ यात्रा वाटते. सांतपणे विरोध करण्याची जाणीव मला बायबल आणि यशूचिस्तामुळे झाली पण प्रत्यक्ष कृतीचे तंत्र मला गांधीमुळे समजले. मला खिश्चन धर्माची जाणीव गांधीजींमुळे झाली. महात्मा गांधीना टाळून मानवतेची प्रगती होणार नाही. त्यांनी जगाला शांतता परस्पर सामन्यस्य मिळवून दिले, त्यांना विसरणे जागतिक संकट ठरू शकते. व्हाइट हाऊसमध्ये गांधीजीचा फोटो आहे. टेनिसी येथे गांधीसंग्रहालय तर वॉशिंगटनला गांधी मेमोरियल सेंटर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष एक ओबामा आपल्या पाकिटात गांधीजींचा
ठेवत असत व राष्ट्राध्यक्षांची शपथ घेताना त्यांनी गांधीजींचे स्मरण केले होते. हिटलरचे अन्याय सहन करत इस्त्राइल राष्ट्र उभे करणारा ज्यूचा नेता जार्ज ऑवेल याने गांधीपासूनच प्रेरणा घेऊन अहिंसेने प्रतिकार करण्याचा संदेश दिला व ज्यू लोक इस्राइल निर्माण करण्यात यशस्वी झाले. जगप्रसिध्द शास्त्रज्ञ ऑवंट ऑइन्साइन यांने शेवटी फक्त गांधीचाच फोटो आपल्या घरी लावला होता.
विश्वाचे राजकारण, अर्थकारण, धर्मकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग साहित्य, एवढेच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रावर गांधीविचाराचा प्रभाव आहे. भांडवलशाहीचा अतिरेक, जगात सुरू असलेली युध्दे, दहशतवाद, पर्यावरणाचा ऱ्हास, तापमानवाढ, धर्मांधता, उर्जेची समस्या इत्यादी वैश्विक समस्या यावर गांधीवाद हाच तोडगा असल्याचे मानले जाते. विश्वात विविध विद्यापीठात गांधीवादाचा अभ्यास विविध ज्ञानशाखात केला जातो. जगप्रसिध्द भारतीय शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी गांधीवादी अभियांत्रिकीची संकल्पना मांडली आहे. चीनची प्रचंड प्रगती या संकल्पनेवर आधारित आहे.
गांधीजींनी आध्यात्मिकतेची, आत्मज्ञानाची, सत्याचरणाची, अहिंसक आचरणाची फार वरची स्थिती प्राप्त केली होती. गांधीवाद भगवत गीता व आधुनिक विचारावर आधारलेला अध्यात्मनिष्ठ मानवतावाद आहे. त्याला काळाची मर्यादा नाही तो सर्वकालीक व वैश्विक आहे. त्यांच्या असहकार, अहिंसक प्रतिकार, सत्याग्रह, सर्वोदय या सारख्या संकल्पना अत्यंत महत्वाच्या असून विविध देशांनी स्वीकारल्या आहेत. गांधीजयंती आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून पाळली जाते. विश्वात गांधी हे खिस्त, बुध्द यांच्या सारखे व्यक्तिमत्व मानले जाते. सत्य, अहिंसा, आस्तेय, अपरिग्रह, बह्मचर्य, अभय, अरुची, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निवारण हे त्यांचे एकादशव्रत असून यावर गांधीवाद आधारलेला आहे. विश्वाला भेडसावणाऱ्या समस्याचे उत्तर गांधीवादात आहे.
गांधीजी ललित लेखक नसले तरी विश्वातील एक मोठे लेखक होते. त्यांनी विपूल लेखन केल. त्यांच्या समग्र लेखनाचे नव्वद खंड प्रकाशित झाले आहेत. जगातल्या ब्यांशी भाषांमधून त्यांच्यावर एकलाख दहा हजार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. इतर एक लाख पुस्तकांमध्ये त्यांच्या विचारांचा, कार्याचा उल्लेख आहे. त्यांना विश्वातील लेखकांचे लेखक संबोधले जाते. रोमा रोला सारख्या नोबल पारितोषिक विजेत्या फ्रेंच लेखकानेही त्यांचे चरित्र लिहिले आहे. ऑइन्स्टाइन, थोरो सारख्यावर गांधीविचारांचा प्रभाव होता.कोणतेही शासन असले तरी भारतीय चलनावर गांधींचाच फोटो असतो.
जागतिक साहित्यवर व भारतातील विविध भाषी साहित्यावर गांधीविचाराचा प्रभाव आहे. गुजराती साहित्यावर
गांधीविचाराचा प्रचंड प्रभाव आहे. हिंदी साहित्यावरही गांधीविचाराचा प्रभाव आहे. मुन्शी प्रेमचंद सारखे श्रेष्ठ हिंदी साहित्यिक गांधीविचाराने प्रभावित आहेत. मराठी साहित्याचा विचार केल्यास मात्र निराशा जाणवते. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी महात्माजी विदर्भात आले सहा वर्षे ते सेवाग्राम आश्रमात व तीन वर्षे पुण्याला कारावासात होते. कस्तुर्वांचा अंत पुण्याला महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्राने गांधींना विनोबा, दादा, धर्माधिकारी, आचार्य कालेलकर, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, शंकरराव देव सारखे कार्यकर्ते दिले. महाराष्ट्रीय माणसानेच गांधीचा निर्गुण खून केला. महाराष्ट्राला आजही गांधी विचारापेक्षा गांधीविरोधाची तहान आहे. महात्मा गांधी, त्यांची दांडी यात्रा, महाकाव्याचा विषय आहे असे वि. स. खांडेकर म्हणायचे परंतु गांधीवर मराठीत महाकाव्य लिहिले गेले नाही. मी नाथूराम गोडसे बोलतो, गांधी विरुध्द गांधी असे गांधी विरोधी त्यांची बदनामी करणारे विषय हाताळण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ‘माझ्या पश्चात हा माणुस (महात्मा गांधी) या देशाच नेतृत्व करेल’ असे लोकमान्य टिळकांनी अवंतिकाबाई गोखले यांच्या गांधी चरित्राच्या प्रस्तावनेत लिहिल आहे. परंतु बहुसंख्य टिळक अनुयायांनी व अभिजनवादी लेखकांनी गांधी आणि गांधींच्या बहुजनवादी नेतृत्वाला विरोध केला. लो. टिळकांकडे असलेले राष्ट्रीय नेतृत्व १९२० नंतर गांधीकडे गेले ही बाब अनेकांना रुचली नाही. टिळकानंतर राष्ट्रीय नेतृत्व बॅौर, सावकरांकडे जावे अशी अनेकांची इच्छा होती. टिळकांच्या शवाला खांदा देण्यासही महात्मा गांधींना परंपरावाद्यांनी विरोध केला होता.
कार्लमार्क्सच्या विचारातून मराठीत विपूल प्रमाणात दर्जेदार मार्क्सवादी साहित्य निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून विपूल प्रमाणात महत्वाच्या अशा क्रांतीकारी आंबेडकरी साहित्याची निर्मिती झाली तशी विपूल प्रमाणात साहित्य निर्मिती गांधी विचारातून झाली नाही. विनोबा आणि सानेगुरुजींचा अपवाद सोडल्यास गांधीवादी मोठे लेखक झाले नाहीत. वैचारिक निबंधावर गांधीविचाराचा प्रभाव आहे परंतु ललित साहित्याचा विचार केल्यास तुरळक अपवाद वगळता मराठी ललित साहित्यावर गांधीवादाचा प्रभाव नाही ही खेदाची बाब आहे. अभिजनांकडून होणारी गांधीजींची उपेक्षा आपण समजू शकतो परंतु बहुजनांच्या हाती लेखनी आल्यानंतरही त्यात फरक पडला नाही. गांधीवादाचा प्रचार करणे ही बाब सहज शक्य आहे पण गांधीवाद स्वीकारुन तो पचवून लेखन करणे सानेगुरुजी सारख्या एखाक्याच ललित लेखकाला शक्य झाले आहे. गांधीबाद पचवून लेखन करणारे लेखक मराठी साहित्यात निर्माण झाले तर मराठी वाङ्मयाची श्रेष्ठता वाढेल, मराठीत अक्षरवाङ्मयाची निर्मिती होईल विश्वातील व भारतातील विविधभाषी साहित्यावर गांधीवादाचा प्रभाव आहे परंतु मराठी साहित्यावर नाही.
आज सानेगुरुजी यांची जयंती आहे! त्यांच्या जन्माला १२४ वर्षे पूर्ण होऊन त्यांचे १२५ वे जयंती वर्ष आज प्रारंभ होत आहे. गुरुजी महान मातृमूर्ती होते. ‘मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी’ असा सानेगुरुजींचा गौरव आचार्य अत्रे यांनी केला आहे. तर पु.ल. देशपांडे त्यांना ‘मातृधर्मी’ म्हणतात. विद्यार्थीनिष्ठ उत्कृष्ट शिक्षक, आदर्श लोकशिक्षक, प्रखर राष्ट्रनिष्ठा असणारे स्वातंत्र्यसेनानी, आधुनिक संत, गांधीजी आणि गांधीजीच्या कॉंग्रेसवर निःसीम श्रध्दा असणारे अत्यंत लोकप्रिय नेते. हजारो युक्कांचे स्फुर्तीस्थान, भारतीय बालसाहीत्यातील दीपस्तंभ, ‘श्यामची आई’ सारखी अजरामर कलाकृती निर्माण करणारे लोकप्रिय ललीत लेखक अशा विविध अंगाने आपण सानेगुरुजींना ओळखतो. गुरुजी जीवनयोगी होते. राष्ट्रीय एकात्मतेचा मानदंड होते. विनोबा त्यांना ‘अमृतपुत्र’ संबोधत. माधुर्य आणि अमरत्व देण्याची क्षमता हा अमृताचा गुणधर्म ! गुरुजी माधुर्याचे महामेरु होते. त्यांचे जीवन आणि वाङ्मय आज अमरत्व पावलेआहे. वाङ्मय लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा अविष्कार असतो. गुरुजीचे व्यक्तीमत्व अत्यंत संपन्न होते. पारदर्शी होते. लेखकाचे व्यक्तीमत्व जेवढे संपन्न तेवढी संपन्नता त्यांच्या वाङ्मयात येवू शकते. गुरुर्वीचे व्यक्तीमत्व व वाङ्मय एकरुप झाले होते. वाल्ट व्हिक्टम म्हणाला होता. ‘हूं टच धिस बूक, टच द मॅन’ असेच त्यांचे होते. ते म्हणत माझ्या वाङ्मयाला हात लावाल तर माझ्या हृदयाला हात लावात. अक्षरा-अक्षरात, ओळी-ओळीत त्यांचे हृदय प्रगट झाले आहे. विनोबा त्यांना तुकारामाच्या जातकुळीचा आधुनिक संतही संबोधत. गरीब आणि श्रमजीवी जनतेची सर्व दुःखे संपावी ही त्याची तळमळ होती. समाजातील उच्चनिचता, भेदाभेद नष्ट व्हावा. द्वेष भावनेचे रुपांतर स्नेह भावनेत व्हावे. सर्वत्र निर्भयता, स्वाभिमान, स्वावलंबन निर्माण व्हावे. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यांनी आपली लेखणी आणि वाणी वापरली. महात्माजी, रवींद्रनाथ, विनोबाजी ही त्यांची दैवते होती. महात्मार्जीची सत्यनिष्ठा, रवींद्रनाथांची सौंदर्यनिष्ठा आणि विनोबांची संस्कृतिनिष्ठा यांनी त्याचे व्यक्तीमत्व तेजोमय झाले होते. विनोबांनी त्यांच्यासाठी वापरलेले आधुनिक हे विशेषण मार्मिक आहे. जुन्या संताप्रमाणे ते केवळ ‘देवप्रेमी’ नव्हते त्याचे देवप्रेम देशप्रेमात परिवर्तीत झाले होते. आणि खेडयापाड्यातील गोरगरीब बहुजन समाज बाल गोपाल यांची सेवा हीच त्यांची देवपूजा होती. संताप्रमाणे शुचिता, सेवापरायणता, त्याग, देवनिष्ठा, प्रेमभाव, तळमळ, कळकळ, समाजोद्धाराची अधिरता त्यांच्या ठिकाणी होती. तुकारामाप्रमाणेच काही बाबतीत त्यांचे साम्य ज्ञानेश्वरांशीही आहे. मातृत्वाची वृत्ती व मृत्यूची ओढ या बाबतीत ते ज्ञानेश्वरांचे समानधर्मी आहेत.
ज्ञानेश्वर माऊली प्रमाणे गुरुजी माऊली होते. त्यांचे मातृत्व सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या जातीचे लोकमातृत्व होते. मातृत्वांच्या वृत्तीचा आणि शक्तीचा व्यापक आविष्कार त्यांच्यात होता. भारत मातेलाच त्यांनी आपला संसार मानले. समाजोध्दार व देशोध्दाराच्या प्रचंड प्रेरणेने कारंजे त्यांच्या हृदयात उचंबळून येत असे आणि या वात्सल्याच्या धारामध्ये सारा समाज न्हावून निघत असे. त्यांचे जीवन एक अनमोल सांस्कृतिक मेवा आहे. दारिद्रयाच्या चिखलात उमललेले मांगल्याचे पावित्र्याचे व परिवर्तनाचे कमलपुष्प म्हणजे गुरुजी !

अध्यक्ष
तिसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन , अमरावती .

✒️डॉ. सतीश नारायणराव तराळ,अभियंता कॉलनी, विद्युतनगर, वि.म.वि. परिसर,अमरावती .मो.नं. ९८२२५७९५७५