वसंतनगर तांडा येथील ऊसतोड कामगाराची तीनही मुले शासकीय नोकरीत

442

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2जानेवारी):-तालुक्यातील ग्रामीण भागातील तांडा वस्तीवरील एकाच कुटुंबातील ऊसतोड कामगाराची तीन मुले शासकीय नोकरी करीत आहेत. कुटुंबाची बिकट परिस्थिती असतानाही स्वतःच्या जिद्द व मेहनतीने देशसेवा करण्याचा आदर्श त्यांनी समाजासमोर व तरुणांसमोर ठेवला आहे. तालुक्यातील रानमळा येथील वसंतनगर तांड्यावर चव्हाण कुटुंब वास्तव्यास आहे. पूर्वी श्रीराम वसाराम चव्हाण यांना पाच भाऊ व एक बहीण असं कुटुंब होत. जमीन जुमला नसल्यामुळे रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू होता. पुढे सर्वांचे लग्न झाल्यानंतर कुटुंब वाढत गेलं.

श्रीराम चव्हाण यांना तीन मुलं व एक मुलगी झाली. कुटुंब रोजंदारीवर चालवणे कठीण झाल्यानंतर ते ऊस तोडणीसाठी जाऊ लागले. उसतोडणीपासून येणाऱ्या पैशांवर मुलांच शिक्षण होऊ लागलं. पण, त्यांना चांगल्या शाळेत टाकणे, खासगी शिकवणी लावणे ऊसतोडणीच्या पैशातून शक्य होत नव्हते. यामुळे तिन्ही मुलांचं शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळेत झाले.

तिन्ही मुलांनी मनलावून अभ्यास केला व पुढे मोठा मुलगा काकासाहेब चव्हाण हा २०१० मध्ये सैन्यदलात दाखल झाला. मोठ्या भावाचा आदर्श घेऊन भाऊसाहेब चव्हाण हा २०१४ मध्ये आर्थिक गुन्हे शाखा (बीड) व विठ्ठल श्रीराम चव्हाण २०१६ मध्ये पोलिस प्रशासनात दाखल झाला. सद्या विठ्ठल चव्हाण तालुक्यातील तलवाडा ठाणे येथे कार्यरत आहे.श्रीराम चव्हाण यांचे मध्यंतरी निधन झाले आहे. आता चांगले दिवस आले. पण, वडील नसल्याचे दुःख चव्हाण भावंडांनी व्यक्त केले.