सत्यशोधिका

110

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जन्मोत्सव विशेष

जन्म : ३ जानेवारी १८३१

मृत्यू : १० मार्च १८९७

आजची महिला गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली. आज महिला सन्मानाने जगत आहेत ते केवळ सावित्रीमाई फुले यांच्यामुळेच. ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीमाई फुले यांचा जन्म नायगाव, ता. खंडाळा जि. सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे पाटील. खंडोजी व लक्ष्मीबाई यांना चार अपत्य होती. सर्वांत थोरल्या सावित्री तर त्यांच्या पाठीवर सिदुजी, सखाराम आणि श्रीपती ही तीन मुलं. शिवशाहीपासून नेवसे घराणे हे मानमरातब असलेले घराणे. शौर्याच्या इतिहासामुळे घराण्यात पाटीलकी आलेली होती. नायगाव परिसरात वाद, तंटे सोडविण्याचे काम खंडोजी करत असत.

सावित्रीचा जन्म झाल्यानंतर गावभर साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. सावित्री आईप्रमाणे गोरीपान व सुंदर तर वडिलांप्रमाणे धडधाकट मजबूत शरिरयष्टी लाभलेली. पाणीदार डोळे, सरळ नाक अशी ती रूपवान पोर. खेळ असो वा कुठलेही अवघड काम प्रत्येक कामात बालपणी सावित्री सर्वात पुढे असे. कुठलेही काम व्यवस्थित व चोख पार पाडणे. हे सावित्रीला नेहमची आवडत असे. खोटं बोलणे कधीच आवडत नसे.इ.स. १८४० मध्ये सावित्रीमाईंचा विवाह जोतीबांशी झाला. विवाहाच्या वेळी जोतीरावाचे वय होते १३ वर्षे तर सावित्रीमाईंचे ९ वर्षे. लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीमाईला शिक्षण दिले. सावित्रीमाईंनी स्वतः शिक्षण घेतलं आणि पुढे स्त्रिया आणि शूद्रातीशूद्रांना शिक्षण देण्याचं काम केलं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थात सावित्रीमाई याच विद्येची स्फुर्तीनायिका, विद्येची देवता ठरतात.

जोतीरावाप्रमाणे सावित्रीमाईंनाही शिक्षणाचे महत्व पटलेलं होतं. म्हणून या कामात जोतीरावांच्या बरोबरीने सावित्रीमाई मुलींना शिकवायचं काम करत होत्या. १ जानेवारी १८४८ आशिया खंडातील पहिली शाळा पुणे येथील बीडच्या वाड्यात सुरू करण्यात आली. मुलींच्या पहिल्या शाळेत १) अन्नपूर्णा जोशी २) सुमती मोकाशी ३) दुर्गा देशमुख ४) माधवी भत्ते ५) सोनू पवार ६) जनी करडीले या सहा मुली होत्या. सहा पैकी चार ब्राह्मण एक मराठा आणि एक धनगर होत्या. पुण्यात मुलींना शिक्षण देण्याचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा कलयुग आलं, धर्म बुडाला, कली मातला अशी कोल्हेकुई सनातनी ब्राह्मणांनी सुरू केली. परंतु त्यांना हे शैक्षणिक कार्य बंद करता आले नाही. सावित्रीमाईंसोबत मुस्लीम समाजातील फातिमा शेख या देखील शिक्षिका म्हणून काम करत होत्या. १५ मे १८४८ ला पुण्यात महारवाड्यात एक शाळा सुरू झाली. जिथं सगुणाबाई या शिक्षिका होत्या. इ. स. १८४८ ते १८५२ दरम्यान पुण्यामध्ये एकूण २० शाळा सुरू झाल्या होत्या.

आनंद शिक्षण, प्रौढ शिक्षण, रात्रीची शाळा अशा विविध प्रयोग चालवत असताना सावित्रीमाईंना शेण, चिखल, घाण इत्यादी अंगावर घ्यावं लागलं. प्रसंगी गुंडाशीही सामना करावा लागला. परंतु हाती घेतलेलं काम सावित्रीमाईंनी सोडलं नाही. ज्या ब्राह्मण वर्गाकडून सावित्रीमाईंना छळण्यात आलं त्याच ब्राह्मण वर्गातील मुलींची संख्या ही जोतीराव – सावित्रीमाईंच्या शाळेत सर्वाधिक होती. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी जोतीराव- सावित्रीमाईंच्या या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने जोतीराव -सावित्रीचा भव्य समारंभ घेऊन गौरव केला.

केवळ शाळा काढून जोतीराव – सावित्रीमाई थांबले नाहीत तर त्यांनी शाळेसाठी अभ्यासक्रमही तयार केला. जोतीरावांनी सुरू केलेल्या सर्व शाळांच्या प्रमुख या सावित्रीबाई होत्या. विद्यार्थ्यांना बसण्यास चांगली जागा, शालेय शिस्त इत्यादी बाबी सावित्रीबाईंनी कटाक्षाने पाळल्या बुद्धिमत्ता, नितीमत्ता आणि विद्वता या बाबतीत अग्रेसर असलेल्या सावित्रीमाईंचे वाचन, मनन आणि चिंतन हे सखोल होते. आपल्या कामाबद्दल त्यांना आवड होती. तेवढाच आत्मविश्वासही होता. सावित्रीमाईंची अभिरूची आणि निर्णयशक्ती उच्च दर्जाची होती. पालकांच्या ‘भेटी घेणे, हुशार विद्यार्थ्यांना पारितोषिक देणे इत्यादी उपक्रम सावित्रीमाई सातत्याने राबवायच्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याबद्दल सावित्रीमाईंना खूप आकर्षण होते. महाराणी ताराराणी यांच्याबद्दलही त्यांना तेवढाच आदर होता.

सावित्रीमाईंच्या प्रत्येक शाळेत शिवजयंतीचा कार्यक्रम होत असे. सावित्रीमाई शाळेत गैरप्रकार झालेला अजिबात खपवून घेत नसत. वेळप्रसंगी त्या तेवढ्याच आक्रमक होत असत. नायगावसारख्या छोट्याशा खेड्यात जन्मलेली शेतकऱ्याची मुलगी लग्नानंतर शिक्षण घेते, भारतातील पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान मिळवते हे ऐतिहासिक सत्य अजुनही काही महाभागांना मान्य नाही. सर्वच स्त्रियांना नाकारण्यात आलेला शिक्षणाचा अधिकार सावित्रीमाईंनी मुली, महिलांना मिळवून दिला. निर्मिकाचेच हे काम आहे, असं समजून त्या शिक्षण देण्याचा काम करत होत्या. स्त्रियांचे दुःख पाहून त्या रडत बसल्या नाहीत तर त्यासाठी जो अपेक्षित संग्राम आहे तो त्यांनी उभा केला. बालविवाह, केशवपन, भ्रुणहत्या, सतीची चाल या सर्वच वाईट प्रथा सावित्रीमाईंनी व जोतीरावांनी बंद केल्या.

आजच्या वडाला फेऱ्या मारणाऱ्या महिला, सत्यवानाच्या सावित्री पेक्षा ज्ञानदान देणाऱ्या स्फूर्तीनायिका, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी चूल आणि मूल ही संकल्पना मोडीत काढून शिक्षणाची कवाडे उघडली. आजची महिला सावित्रीमाईंच्या शिक्षणामुळेच गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत विराजमान झालेली आपल्याला दिसते.
फुले दाम्पत्याचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज होते. छत्रपती शिवरायांचा लढा हा शोषण करणाऱ्यांच्या विरोधात होता. जोतीराव – सावित्रीमाईने आयुष्यभर संघर्ष केला. अज्ञानी आई-बापाचे मूल आपल्या पदरात घेऊन त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे लहानाचा मोठा करणारी उदार हृदयी स्त्री पहावयास मिळते, पण एखाद्या विधवेला अनैतिक संबंधातून झालेले मूल आपलेच समजून त्याचे संगोपन करणारी माता दुर्मिळच !..

सावित्रीमाईच्या बालगृहात बाळंतपणास आलेल्या काशीबाई नावाच्या ब्राह्मण तरूण विधवेला झालेलं मूल सावित्रीमाईंनी दत्तक घेतलं. त्याचं नाव यशवंत ठेवलं. पुढे त्यास डॉक्टर बनवलं आणि याच यशवंतचा विवाह ४ फेब्रुवारी १८८९ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी हडपसर येथील ग्यानबा कृष्णराव ससाणे यांची मुलगी राधाबाईंशी सत्यशोधक पद्धतीने लावला.

इ.स. १८७६-७७ ला दुष्काळ पडला होता. जोतीरावांनी लोकांना दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचं आवाहन केलं. मिळेल तेथून अन्न गोळा केले. सावित्रीमाईने दोन हजार अन्नछत्रे सुरू केली. अन्नछत्राच्या ठिकाणी जाऊन सावित्रीमाई स्वतः स्वयंपाक करत असत.क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी साहित्यक्षेत्रातही भरीव कामगिरी केली. सावित्रीबाई उत्तम लेखक, विचारवंत, आद्य कवयित्री होत्या. १८५४ ला काव्यफुले आणि १८९१ मध्ये ‘बावन्नकशी’, ‘सुबोध रत्नाकर’ हे दोन काव्यसंग्रह लिहिले. भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका व शिक्षिका म्हणून सावित्रीमाई फुले यांना पाहिले जाते.

सावित्रीमाई फुले यांनी सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खांद्याला खांदा लावून शैक्षणिक व सामाजिक कार्य निरंतर केले. २८ नोव्हेंबर, १८९० ला जोतीरावांचे निधन झाले. तेव्हा सावित्रीमाईंचं वय ६३ वर्षे होतं. जोतीरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीमाईवर येऊन पडली होती. माईने सत्यशोधक चळवळीचे काम मोठ्या धैर्याने आणि तेवढ्याच शांतपणे त्यांनी पुढे नेले. या क्रांतीकार्यात कुठेही पोकळी निर्माण होऊ दिली नाही. क्रांतीकार्याची ज्योती अखंड तेवत ठेवली.

इ.स.१८९६ च्या दुष्काळातून लोक मुक्त होतात ना होतात तोच इ.स. १८९७ ला पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. प्लेगने हाहा:कार माजवला. लोक मृत्यूमुखी पडत होते. कित्येकांचे कुटुंब नामशेष होत होते. सावित्रीमाई हे सर्व दुःखी मनाने व डबडबल्या डोळ्यांनी पाहत होत्या. इंग्रज आधिकारी आणि कमिशनर रँड प्लेगच्या नावाखाली घराघरात घुसून धुडगूस घालत होते. लुटमार करत होते. लोकांना रोगापेक्षा या टोळ्यांचीच जास्त भिती वाटायला लागली होती. सावित्रीमाईंच काम मात्र विधायक होतं. त्या सरकार दरबारी लोकांच्या तक्रारी पोहचवीत होत्या. प्लेग हा संसर्गजन्य आहे हे माहिती असूनही रोग्यांची सेवा, शुश्रूषा करीत होत्या. यातच मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेग झाल्याचे कळताच सावित्रीमाई तेथे पोहचल्या. त्यास पाठीवर घेऊन दवाखान्याकडे जात होत्या. दुर्दैवाने सावित्रीमाईंनाही प्लेगची लागण झाली आणि यातच १० मार्च १८९७ रोजी रात्री ९ वाजता क्रांतिज्योती सावित्रीमाईंचं निधन झालं. स्त्री, शूद्रातिशूद्र, बहुजन समाजाला प्रकाश देत आयुष्यभर तेवत असलेली जोतीरावांची ज्योत कायमची मालवली.

आज अखंड भारतातल्या महिलांसाठी प्रेरणास्थान म्हणून सावित्रीमाई फुलेच आहेत. म्हणूनच आज सावित्रीमाईंचा जन्मदिवस हा बालिका दिन, महिला मुक्ती दिन, तसेच महिला शिक्षण दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा होतो. माईंच्या कार्याला त्रिवार कोटी – कोटी वंदन !…..

✒️मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव)