गर्भवती महिलांचे पावले सरकारी दवाखान्याकडे

270

🔸वर्षभरात ३१ हजार प्रसूती; एकट्या सिव्हिलमध्ये ९२७६ प्रसूती

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.3जानेवारी):-खासगी दवाखान्यांत प्रसूती झाली तर दवाखाना व औषधींचा खर्च ३० हजार आणि सिझेरिअन झाले तर ४० हजारांच्या पुढे, त्यात बाळाचे वजन कमी असेल तर त्याला वॉर्मरमध्ये (अतिदक्षता विभाग) ठेवण्याचे २०- ३० हजार अधिकचे. त्यामुळे प्रसुतीसाठी गर्भवतींची पाऊले सरकारी दवाखान्यांकडेच वळत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे गर्भवतींना प्रसुतीसाठी रुग्णालयात आणणे आणि त्यांना त्यांच्या घरी नेऊ सोडण्यासाठी शासकीय वाहनाची देखील सोय करण्यात येते.

मागच्या वर्षात जिल्ह्यात ४५ हजार प्रसूतींची नोंद आहे. यात खासगी दवाखान्यांत १४ हजार ८०४ तर सरकारी दवाखान्यांत हा प्रसुतींचा आकडा तब्बल ३० हजार ६९३ येवढा आहे. एकट्या जिल्हा रुग्णालयात वर्षभरात ९२७६ येवढ्या महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्री रोग विभागातही तब्बल १३ हजार ४१४ प्रसूतींची नोंद आहे.जिल्ह्यात उत्पन्नाचे मोठे स्त्रोत नाहीत, शेतीही मध्यम असल्याने जिल्ह्याची आर्थिक घडी मध्यमच आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांत प्रसूती व सिझेरिअनचा खर्च करण्यापेक्षा सरकारी रुग्णालयांत मोफत प्रसुतींकडे कल असल्याचे आकड्यांवरुन दिसते.

जिल्हा रुग्णालय, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांसह लोखंडी व नेकनूरला स्वतंत्र स्त्री रुग्णालये आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांतही प्रसूतींची सोय असून, सरत्या वर्षात आरोग्य केंद्रांमध्येही ८६६ प्रसूतींची नोंद आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड, अंबाजोगाईसह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी खासगी स्त्री रुग्णालयांची मोठी संख्या आहे. शासकीय आरोग्य संस्थांच्या तुलनेत खासगी स्त्री रुग्णालयांची संख्या तिप्पट असताना प्रसुतींचे प्रमाण सरकारीचे दुपटीहून अधिक आहे. एकूणच सामन्य व मध्यमवर्गीय कुटुंबांना शासकीय दवाखाने अधिक सोयीचे वाटत असल्याचे समाधानकारक चित्र जिल्ह्यात आहेत.

शासकीय दवाखान्यांतील प्रसूती व सिझेरिअनची संख्या दरवर्षी वाढत आहे. गर्भवतींवर सर्व उपचार चांगले होतात. तसेच, सर्वात मोठे एसएनसीयू असल्याने नवजात बालकांवरही उत्तम उपचार होतात. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय व सरकारी दवाखान्यांवर विश्वास आहे.

– डॉ. अशोक बडे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

जिल्ह्यातील विविध भागांसह परभणी, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील देखील महिला प्रसूती व सिझेरिअनसाठी येथे येतात. अनेक गुंतागुंतीच्या प्रसूती यशस्वी करण्यात यश आले आहे. प्रसुतींच्या संख्येत स्वाराती राज्यातील प्रमुख संस्थांच्या तुलनेत अव्वल आहे.

– डॉ. गणेश तोंडगे, स्त्री रोग विभाग प्रमुख, स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई