यूपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या सी डी एस परीक्षेत ओमकार जाधवने संपूर्ण देशात पटकाविला ७४वा क्रमांक

57

✒️सातारा-खटाव(नितीन राजे)मो:-9822800812

सातारा(दि.4जानेवारी):-जिल्ह्यातील खटाव तालुका म्हटलं की दुष्काळच असे एक ब्रीद होऊन गेला आहे. अशा या दुष्काळ तालुक्यात बुद्धीचा मात्र सुकाळ असल्याचं वारंवार सिद्ध झाला आहे. येथील युवक मेहनत चित्त चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर नेहमीच यशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत असतो . म्हणतात ना ‘इच्छा तिथे मार्ग ‘अशीच प्रबळ इच्छाशक्ती असणार खटाव येथील शांत, संयमी पण हुशार युवक म्हणजे ओमकार नानासाहेब जाधव या युवकांन आपल्या कष्टाच्या व बुद्धीच्या बळावर आई (रूक्मिणी जाधव)वडील(नानासो जाधव) आजी आणि दिवंगत आजोबा(कै.आबाजी जाधव) यांचे स्वप्न साकार केले लहानपणापासूनच ओमकार खूपच जिद्दी ,मेहनती व कष्टाळू होता बुद्धिमान तर होताच होता त्या बुद्धिमत्तेचा त्याने पुरेपूर वापर केला ओंकार सैन्य दलात यूपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या सी डी एस अर्थात (कम्बाइन डिफेन्स सर्विस )ची परीक्षा अव्वल दर्जात नुसती पास न होता संपूर्ण देशात (एआयआर )74 वा येण्याचा बहुमान पटकावला आणि आपले व आपल्या कुटुंबीयांचे स्वप्न सत्यात उतरविले.

ओमकार चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खटाव ता.खटाव येथे झाले. त्यानंतर काही काळ तो लक्ष्मण इंग्लिश स्कूल खटाव येथे शिक्षण घेतले.त्यानंतर त्याची निवड सैनिक स्कूल सातारा येथे झाली.त्याठिकाणी तो इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्याने तेथेच घेतले.पुढील शिक्षणासाठी पुणे येथील वाडिया महाविद्यालय गेला .तेथूनच तो सैन्य दलातील परीक्षा देत असे अनेक वेळा तो सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या पदापर्यंत पोहोचला देखील होता परंतु अंतिम क्षणी काही तांत्रिक अडचणीमुळे अपात्र होत होता. तरीही त्याने अजिबात हार मानली नाही शेवटी त्याने काही दिवसापूर्वी यूपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या सैन्य दलातील सीडीएस परीक्षेसाठी फॉर्म भरला होता आणि परीक्षा दिली होती अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याने ही गोष्ट कोणालाही सांगितले देखील नव्हती शेवटी हातात निकाल आला आणि त्यानंतर त्यांना ही गोष्ट आपल्या कुटुंबीयांना मोठ्या आनंदाने सांगितली .कुटुंबीयांना ही बातमी ऐकताच आपले आनंदाश्रू अनावर झाले.

कारण बऱ्याच दिवसापासून हे शेतकरी कुटुंब या क्षणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण समीप आला.संपुर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह आजही शेतीवरच आहे.शेतात पिकलेल्या भाजी पाल्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह आजही चालतो.तरीही कुटुंबाकडे दातृत्वशक्ती अफाट आहे.घरी आलेला कोणीही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही.अगदी घरा शेजारी सोमनाथ मंदिर आहे त्याची सेवा सदर कुटुंबाकडेच असते.तसेच टेकडीवरील गणपतीचे देखील ते हे कुटुंबीय निस्सीम भक्त आहेत.

आज ओमकार ने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की प्रयत्न जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर आपण कोणतीही गोष्ट जर ती मनापासून करीत असो तर ती साकार होतेच.ओमकारच्या यशा बद्दल त्याचे आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी सर्व स्तरातून कौतुक होत आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

—-
माझ्या यशामध्ये माझा एकट्याचा वाटा नसून त्या पाठीमागे माझ्या कुटुंबीयांसोबत माझ्या गुरुजनांचा, आप्तेष्टांचा व हितचिंतकांचा फार मोठा वाटा आहे.मी तरूणांना एवढेच सांगेन जिद्द ,चिकाटी ,प्रयत्न न सोडता व कोणत्याही परिस्थितीत न डगमगण्याचे ठरवले तर यश नक्कीच आपलेच आहे.
कु.ओमकार नानासो जाधव

—-
ओमकार लहान वयापासूनच अत्यंत हुशार तर आहेच त्याचबरोबर शांत, संयमी व मनमिळाऊ देखील.त्याने कधी ही कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही.त्याला आपल्या परिस्थितीची जाणीव होती.घरी सुट्टीला आला तरी शेतात काम करीत असे प्रसंगी बाजारात भाजी देखील विकत असे.एखादी गोष्ट करायची ठरवली तर तो जिद्दीने करून दाखवतो.त्याने आमच्या कष्टाचं चीज केलं व आमचं देखील पोराला ‘साहेब’ करायचं स्वप्न साकार झाले खरंच आम्ही आज धन्य झालो.