भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका

105

▪️सत्यशोधिका फातिमाबी शेख जयंती विशेष !▪️

भारतातील थोर समाजसेविका ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासोबत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या सहकारी शिक्षिका, भारतातील थोर समाजसेविका व पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख होत्या.

फातिमाबी शेख यांचा जन्म ९ जानेवारी १८३१ रोजी पुणे येथे झाला. फातिमाबी आपला भाऊ उस्मान शेख यांच्या समवेत पुणे येथे गोविंदराव फुले यांच्या घराच्या शेजारी राहत होत्या. फातिमाबी लहानपणापासूनच अतिशय जिज्ञासू, धाडसी होत्या. पुण्यामध्ये शैक्षणिक क्रांती करणाऱ्या व भिडेच्या वाड्यात आशिया खंडातील प्रथम शाळा सुरू करणारे भारतातील थोर समाज सुधारक – विचारवंत – स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता – सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांची शैक्षणिक चळवळ ते जवळून पाहत होत्या. याचा फातिमाबी यांच्यावर खूप प्रभाव पडला.

एकदा जोतीराव फुले व सावित्रीमाई फुले यांनी शिक्षणाचा वसा हाती घेतल्यामुळे व आपल्यामुळे आपल्या माता-पित्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी जोतीरावांनी आपले घर सोडले. तेव्हा मुस्लिम समाजाचे उस्मान शेख व फातिमाबी यांनी या फुले दाम्पंत्याला आपल्या घरी आश्रय दिला. फातिमाबी सावित्रीमाईंना शिक्षणाचे कार्य करीत असताना पाहू लागल्या. त्यांना देखील शिक्षणाची गोडी लागली. सावित्रीमाईंनी फातिमाबीला शिकवले व आपल्या सोबत शैक्षणिक कार्यात मुलींना शिकविण्यासाठी फातिमा ला प्रोत्साहन दिले.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व फातिमाबी शेख या दोघेही ज्ञानदानाचे कार्य करू लागल्या. एवढेच नव्हे या दोघं महामातांनी पुण्यामध्ये घरोघरी जाऊन मुलां-मुलींना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला, विनावेतन मुला-मुलींना शिक्षण दिले. सावित्रीमाई व फातिमाबी हे मुलींसाठी आपल्या हाताने पहिले स्वयंपाक करत व मुलींचे जेवण सुद्धा शाळेत घेऊन जात. दिवसभर ज्ञानदानाचे कार्य करत असताना दुपारच्या मधल्या सुट्टीत स्वतः शाळेत आलेल्या मुलींना आपल्यासोबत त्यांना जीव घालत. आज भारतभर मध्यान्न भोजनाची योजना आपल्याला दिसते पण सन अठराशेच्या काळात या महामातांनी आपल्या घरातुन मुलींना भोजन बनवुन दिले हे आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. शाळेतील सर्व मुला-मुलींना ते आपल्या मुलांप्रमाणे वागवत.

फातिमाबी सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना आपले आदर्श मानत होते. फुले दांपत्याने सर्व धर्मीयांसाठी शाळा उघडून मोठी क्रांती केली होती आणि यामध्ये फातिमाबी शेख यांनी अनमोल सहकार्य केले व ही शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली. मुलींना शिक्षण देत असतांना सावित्रीमाई व फातिमाबी यांना त्या काळातील काही सनातन्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मुली शिकल्या तर धर्मा बुडेल पण या दोघेही महामाता डगमगल्या नाहीत खंबीरपणे यांनी शिक्षणाचे व्रत सुरू ठेवले.

सावित्रीमाई फुले व फातिमाबी यांनी दिलेल्या शिक्षणामुळेच महिला सक्षम झाल्या. आज गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला सन्मानाने जगत आहे याचे श्रेय फुले दांम्पत्याला जाते. या दोघही महामातांनी कधीही जातीय भेद केला नाही सर्व मुला-मुलींना समान शिक्षण दिले. उस्मान शेख यांना खूप अभिमान वाटे की माझी भगिनी तात्यासाहेब व माईंसोबत शिक्षणाचे पवित्र कार्य करीत आहे.

फातिमाबी शेख ह्या सत्यशोधिका होत्या. तात्यासाहेब व माईंना आदर्श मानून त्यांनी सत्यशोधक समाज संघाकडून प्रेरणा घेऊन सत्यशोधक समाज संघाचे कार्य अविरतपणे पुढे सुरू ठेवले. ” सर्व साक्षी जगत्पती – त्याला नकोच मध्यस्थी ” हे सत्यशोधक समाज संघाचे ब्रीदवाक्य होते. सर्वांना शिक्षण देणे, मुला-मुलींमध्ये भेद न करणे, अंध – पांगळ्यांना मदत करणे, चांगले संस्कार देणे, आई-वडिलांचा व वडीलधाऱ्या माणसांचा सन्मान करणे हे सत्यशोधक समाज संघाचे अनमोल विचार फातिमाबी शेख यांनी अंगीकारले.

मला या ठिकाणी एक ऐतिहासिक प्रसंग नमूद करावासा वाटतो तो असा कि, खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात ९ जानेवारी फातिमाबी शेख यांची जयंती निमित्त हजारोंच्या संख्येत ऐतिहासिक रॅली काढण्यात आली कदाचित ही भारतातील पहिली रॅली असावी. रॅलीमध्ये महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी महामातांची वेशभूषा साकारली होती यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरांगना झलकारी देवी यांचा समावेश होता. रॅलीची सुरुवात सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले स्मारकाला अभिवादन करून पुढे कोट बाजार – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक – छत्रपती शिवराय स्मारक यानंतर पी.आर.हायस्कूल शाळेत समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये तालुक्यातील महात्मा फुले हायस्कूल, इंदिरा कन्या विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल, पी.आर.हायस्कूल, गुड शेफर्ड अकॅडमी अशा विविध शाळेच्या मुलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये सर्वच महामातांचा जयघोष करण्यात आला.

समारंभाप्रसंगी तालुक्यातील पाच महिला शिक्षकांचा सत्यशोधक विचार मंच च्या वतीने साडी,अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ही ऐतिहासिक रॅली यशस्वीतेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, लक्ष्मणराव पाटील, एच डी माळी, गोरख देशमुख, पी डी पाटील व सत्यशोधक विचार मंच च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
समस्त भारतीयांसाठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या, थोर समाजसेविका, भारतातील प्रथम मुस्लिम शिक्षिका, सत्यशोधिका फातिमाबी शेख यांच्या कार्याला त्रिवार वंदन व कोटी – कोटी नमन !..

✒️मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव)