मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

122

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.20जानेवारी):-योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव व्हावा म्हणून एन एस एस हा उपक्रम चालवला जातो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये श्रम करण्याचे संस्कार होत असतात. त्यांना स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय लागते. या शिबिराच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचे काम स्वयंसेवकांच्या मार्फत होत असते. समाजसेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होते. या शिबिरातून समाजाच्या उन्नतीसाठी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.” असे प्रतिपादन मा. श्री. तानाजीराव साळुंखे (माजी उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क, मुंबई) यांनी केले. ते मौजे किवळ येथे आयोजित केलेल्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या सिनिअर विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

     या शिबिराचे उदघाटन श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ कराडचे विश्वस्त व सदस्य मा. श्री. अरुण पाटील (काका) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रदीप काशीद (सरपंच, ग्रामपंचायत किवळ) म्हणाले की, “राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे उद्याचे आदर्श नागरिक घडविण्याचे केंद्र आहे. या शिबिरामधून प्रेरणा व बळ घेऊन समाजकार्य करणारे कार्यकर्ते घडतात. तरुणांना समाजकार्याची नवी दिशा मिळते.”
 

         या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून मा. श्रीमती संगिता साळुंखे (माई) (सदस्य, केंद्रीय दिशा समिती), मा. डॉ. विजय मारुती साळुंखे (माजी पंचायत सदस्य कराड), मा. श्री रामचंद्र साळुंखे (माजी सरपंच, किवळ), मा. श्री. उत्तमराव साळुंखे (माजी पोलीस उपअधिक्षक), मा. श्री. भानुदास साळुंखे (अध्यक्ष संत नावजीनाथ देवस्थान समिती, किवळ) तसेच मा. डॉ. एस .बी. केंगार (प्राचार्य यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

       मा. डॉ. विजय साळुंखे आपल्या मनोगतात म्हणाले की, “एनएसएस स्वयंसेवक पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि स्वच्छता, प्रौढ शिक्षण आणि ग्रामीण विकास यासारख्या समुदाय सेवा उपक्रमांमध्ये सक्रियपणे व्यस्त असतात. या उपक्रमांमुळे समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते. तसेच त्यांनी किवळ गावचे ऐतिहासिक महत्व विषद करून स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.”
   

   कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व एन .एस. एस गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व  प्रास्ताविक वेणूताई चव्हाण कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. शिबिराचा उद्देश एन.एस.एस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी सांगितला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. श्रीमती डॉ.एस. आर. सरोदे यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.श्रीमती. एस. पी. पाटील व प्रा. श्रीमती एम. एम. चव्हाण यांनी केले. या शिबिराच्या उदघाटन समारंभास वेणूताई चव्हाण कॉलेजच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,स्वयंसेवक तसेच मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.