🔸माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांची टीका

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदनगर(दि.1ऑगस्ट):-‘राज्यातील महाविकास आघाडी सरकार प्रत्यक्षात तिघाडी सरकार आहे. ‘एका नवऱ्याच्या दोन बायका’ अशी या सरकारची अवस्था आहे. याचा खेळ आवरत आलेला असून हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ताही लागणार नाही,’ अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज केली.

दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी भाजपसह मित्र पक्षांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. माहीजळगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकाररूपी दगडाला प्रतिकात्मक दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

‘दुधाचा दर कमी झालेला आहे. दुधाची खरेदी अतिशय कमी दराने होते आहे. विक्री मात्र ५० ते ६० रुपयांनी होते आहे. सरकारनं यात मध्यस्थी करण्याची गरज होती. २१ ऑगस्टला आम्ही या संदर्भात निवेदनही दिलं होतं. मात्र, त्यावर ना कुठली चर्चा झाली ना निर्णय झाला. त्यामुळं आमच्यावर ही आंदोलनाची वेळ आली आहे,’ असं शिंदे म्हणाले.

‘राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. विजेची बिलं अव्वाच्या सव्वा येताहेत. युरिया मिळत नाही. कांद्याचा भाव कमी झालाय. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची मदत करताना सरकार दिसत नाही. त्यांना जनतेचं, शेतकऱ्यांचं काहीही घेणंदेणं नाही. हे सरकार कधी कोसळेल याचा पत्ता लागणार नाही. गेल्या आठ महिन्यात लोकांच्या हिताचा एकही निर्णय सरकारनं घेतलेला नाही, असं सांगत शिंदे यांनी सरकारचा निषेध केला.

अहमदनगर, महाराष्ट्र, मिला जुला , राजकारण, राजनीति, राज्य, विदर्भ, सामाजिक , हटके ख़बरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED