श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा,अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न

333

🔸दोन दिवशीय विविध कार्यक्रम ; मान्यवरांचा सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.29जानेवारी):-ब्रम्हपुरी येथील नाभिक युवा बहुउद्देशीय संस्थेद्वारा आयोजित श्री.संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा,अनावरण व लोकार्पण सोहळा दि.26 व 27 जानेवारी रोजी अतिशय उत्साहात पार पडला.यावेळी विविध कार्यक्रम व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

सर्वप्रथम संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्राण प्रतिष्ठा असंख्य नाभिक बांधवांच्या उपस्थित सुनील मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अनावरण व उदघाट्न ब्रम्हपुरी विधासभेचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,हसन अली गिलानी, चंद्रपूर नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र येसेकर,ऍड. हेमंत उरकुडे,ऍड. किशोर चोपकार,शरद उरकुडे,अमित कन्नाके,प्रभाकर सेलोकर ईश्वर मेंढुळकर,कल्पना सूर्यवंशी,श्रद्धा सुर्यवंशी,भास्कर लांजेवार अरविंद फुलभोगे हे उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध लेखक हरिश ससनकर,महाराष्ट्र शासन ‘बालकवी’पुरस्कृत कवी राजेश बारसागडे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.संदीप लांजेवार होते.कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी विविध कार्यक्रम पार पडले.

शनिवारी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगणारा नाभिक समाज इतरांना सौंदर्य प्रदान करणारा समाज आहे. शिव कालीन मावळे जीवा महालांचे उदाहरण देऊन शिवाजी महाराजांचा जीव वाचणारा समाज म्हणून नाभिक समाजाचा गौरव त्यांनी केला.पुढे भाषणात बोलताना ते म्हणाले की,नाभिक समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून शिक्षण घ्यावे. अंध:श्रद्धावर विश्वास ठेवू नये असे मार्गदर्शन करून ब्रह्मपुरी येथील नाभिक युवा आघाडी ही संघटना इतर समाजाला दिशा देणारी संघटना आहे.असे कौतुक त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हरीश ससनकर यांनी जीवा महालांचा इतिहास समाजासाठी कसा प्रेरणादायी आहे हे पटवून दिले.

तसेच आजच्या इंटरनेटच्या जगात महिलांनी संस्कारक्षम पिढीसाठी बाल मानसशास्त्राचा कसा उपयोग करावा याचे सुद्धा उत्तम मार्गदर्शन केले.तसेच आपल्या समाजावर होणारे अन्याय त्यावर उपाय कसे करावे याबद्दल सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले. दुसरे मार्गदर्शक राजेश बारसागडे यांनी सुद्धा समाजाने संघटित होऊन प्रगती करावी.वाईट प्रवृत्तीचा त्याग करावा.असे मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.संदीप लांजेवार यांनी इतिहासाच्या नोंदी माणसाला घडवित असतात आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करून तेथील चुका काढून आपण आपली प्रगती साधावी असे मार्गदर्शन केले.

तसेच श्री संत नगाजी महाराज यांचा थोडक्यात परिचय सांगून नाभिक समाज संस्कारक्षम नेतृत्व करणारा व्हावा.अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाभिक युवा आघाडीचे अध्यक्ष गोलू फुलबांधे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणय देवगडे यांनी केले.तर पाहुण्यांचे आभार नाभिक युवा आघाडीचे सचिव सुनील मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.