अमिताभ बच्चन यांची हस्ते सिंबायोसिस चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

32

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.31जानेवारी):-तंत्रज्ञानात दर तीन महिन्यांनी नव्याने भर पडत आहे. त्यामुळे तुम्ही कितीही अपडेट राहण्याचा प्रयत्न केला तरी, तुम्हाला दरवेळी नव्या तंत्रज्ञानाशी सामाना करावा लागेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये फेस मॅपिंग हा नवा प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारांबाबत हॉलिवूडमधील कलाकार मंडळींनी विरोधाची भूमिका जाहीर केली असून, त्याबाबत मलाही चिंता वाटते, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी शनिवारी व्यक्त केले.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनच्या प्रसंगी बच्चन बोलत होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, अधिष्ठाता डॉ. रूची खेर जग्गी आदी उपस्थित होते.

बच्चन म्हणाले की, मुंबईतील एका प्रसिद्ध स्टुडिओने फेस मॅपिंगबाबत प्रात्यक्षिक मला नुकतेच दाखविले. त्यामध्ये टॉम हँक यांचे फेस मॅपिंग करून, ते एका २० वर्षीय मुलाप्रमाणे वावरत असल्याची फिल्म दाखविण्यात आली. त्यामुळे आगामी काही दिवसांत अशी परिस्थिती येईल की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील फेस मॅपिंगने तयार झालेल्या अमिताभ बच्चनलाच सिम्बायोसिसमध्ये व्य़ाख्यान देण्यासाठी बोलवतील, अशीही चिंता बच्चन यांनी व्यक्त केली. चित्रपट हे व्यक्त होण्याचे उत्तम माध्यम आहे.

आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना, निरीक्षणे, गोष्टी आदी चित्रपटाच्या माध्यमातून उत्तम मांडता येतात. लोकांना जागरूक करण्याचे उत्तम माध्यम असून, त्याचा चित्रपट निर्मिती प्रक्रियेत येणाऱ्यांनी प्रभावी वापर करण्याचे आवाहन बच्चन यांनी केले. डॉ. येरवडेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. जग्गी यांनी आभार मानले.

पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुसरण अजिबात करू नका. आपल्या संस्कृती आणि परंपरेशी एकनिष्ठ राहा, असा सल्ला जया बच्चन यांनी विद्यार्थी दिला. आम्हाला चित्रपट पाहायला आवडतात. त्यामुळे त्यामध्ये विनाकारण लाऊड म्युझिकचा वापर करू नका आणि चित्रटपटांचा आस्वाद घेऊ द्या, असे आवाहन जया बच्चन यांनी विद्यार्थ्यांनी केले.