साहित्यिकांनो, अंमळनेरात तुमच्या भ्याडपणाची उदघोषणा करा !

303

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

अंमळनेरला ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरू होत आहे. दरवर्षी मराठी साहित्य संमेलन वादाचा विषय होत असतं. वादग्रस्त होतील असे अनेक मुद्दे पुढे येत असतात, त्या निमित्ताने वाद झडत असतात. पण आम्हाला संमेलनाच्या कुठल्या वादावर नाही बोलायचं. वाद होतील किंवा नाही हा विषय वेगळा. भरल्या पोटी करपट ढेकरा देणारे कुठला वाद घालतात ? का घालतात ? हे फारसं महत्वाच वाटत नाही. तसे तर गेल्या काही वर्षात साहित्याचा आणि लोकांच्या जगण्या-मरण्याचा काही संबंधही राहिला नाही. साहित्य हे लोकांच्या जीवनाला स्पर्श करत असतं. लोकांचे जीवन त्यात प्रतीबिबींत होत असतं. अनेकदा साहित्यातून समाजाचे वास्तव चित्रण मांडले जाते.

समाजातल्या अनेक व्यक्तीरेखा, प्रवृत्ती साहित्याच्या माध्यमातून मांडल्या जातात. साहित्यिक आपल्या साहित्यातून नेमकेपणाने सामाजिक स्थितीवर बोट ठेवत असतात. माणसाच्या जडणघडणीवर साहित्य प्रभाव टाकत असते. ही परंपरा संत साहित्यापासूनची आहे. संत मुक्ताई, संत जनाई, ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत चोखामेळा यांची पत्नी संत सोयराबाई अशा अनेक संतांनी आपल्या साहित्यातून तत्कालीन समाजाची स्थिती मांडली. संत तुकाराम यांचे बंड तर सर्वांना परिचीत आहे पण चोखामेळा यांची पत्नी सोयराबाई यांचे बंडही थक्क करणारे आहे. त्यांनी तत्कालीन समाजाला विचारलेले प्रश्न त्या समाजाच्या गचांडीला धरणारे होते. साहित्य आणि साहित्यिकांची ही परंपंरा जुणी आहे.

साहित्यिकांना समाजातला संवेदनशिल आणि विचारवंत घटक म्हणून ओळखले जाते. पण गेल्या काही वर्षात समाजातला हा संवेदनशील असणारा घटक चिडीचुप आहे. तो आता सामाजिक स्थितीवर व्यक्त होत नाही. समाजातील वैगुण्यावर, विकृतीवर बोट ठेवत नाही. कल्पनेच्या रॉकेट भरा-या मारत काही पुस्तकं बाळंत केली जातात. ती खपवली जातात. मिळवलेले पाच-पंचवीस पुरस्कार घराच्या दर्शनी भागात लावले जातात. ठरवून एकमेकांची लाल केली जाते. म्हणजे जळगावच्या संमेलनात सांगलीच्या कुणाची तर लाल करायची.

सांगलीच्या संमेलनात जळगावच्या कुणाची तर लाल करायची. “तु मला गोड म्हण मी तुला गोड म्हणतो !” असा साटलोटं जपणारा व्यवहार केला जातो. समाजातून संमेलनाच्या नावाने निधी गोळा करायचा, त्यातले काही पैसे खर्च करायचे, काही ढापायचे आणि संमेलन पार पाडायचे असा पायंडा पडला आहे. संमेलनाला पैसे देणारा उद्योजक किंवा नेता भ्रष्ट आहे का ? त्याची लायकी काय आहे ? तो संमेलनाच्या स्टेजवर बसण्यास लायक आहे का ? हे तपासलं जात नाही. त्याच्या व्यवहाराला, चारित्र्याला महत्व दिले जात नाही. तो देणगी देतोय ते महत्वाचे. असा आपमतलबी विचार केला जातो. पैशासाठी लाचार होत राजकारण्यांची, उद्योजकांची चापुलसी व लाचारी केली जाते. देणगीसाठी धन-दांडग्याचे अवयव कुरवाळले जातात.

पैसा दिला की कुणालाही स्वागताध्यक्ष केले जाते, कुणालाही स्टेजवर बसवले जाते. त्याचे पोवाडे गायले जातात. साहित्य संमेलनं म्हणजे काही ठरविक व संघटीत असलेल्या विशिष्ठ प्रसिध्दीलोलूप लोकांचा कंड जिरवण्याचे सोहळे झाले आहेत. समाज जीवनाचा आणि साहित्याचा फारसा संबंध उरलेला नाही. कल्पनेच्या दोरउड्या मारून काही मंडळी ते मांडायचा प्रयत्न करत असतात पण त्यात जीवंतपणा नसतो. साहित्यिकांचा बाणेदारपणा, इमान, सच्चाई त्यात दिसून येत नाही. म्हणूनच ही स्थिती गंभीर व चिंताजनक वाटते आहे.

गेल्या काही वर्षात देशाची अवस्था काळजी वाटण्यासारखी आहे. लोकशाहीचे अस्तित्व राहते की नाही ? अशी शंका यावी इतपत परस्थिती बिकट आहे. समाज म्हणून आम्ही रोगट आणि विकृत होत चाललो आहोत. धर्मांधता, जातीयवाद शिगेला पोहोचण्याच्या तयारीत आहे. सामान्य लोकांचे जीवनमान अधिक जटील होताना दिसत आहे. त्याच्या भाकरीचा प्रश्न अधिकच अक्राळविक्राळ होत चालला आहे. लबाडीने आणि बदमाशीने प्रतिष्ठेचा उच्चांक गाठला आहे. राज्यकर्ते अधिकाधीक मुजोर व मस्तवाल होताना दिसत आहेत. सर्व सरकारी संस्था सत्तेच्या पायाखाली दाबल्या जात आहेत. गुंड प्रवृत्ती माजल्या आहेत. विवेकाचा आवाज बंद केला जातो आहे. न्याय, निती फाट्यावर मारली जात आहे. सत्तेच्या धाक-दपटशाहीने विरोधातले आवाज बंद केले जात आहेत. अशावेळी साहित्यिक म्हणून संवेदनशिल असणारी मंडळी चिडीचुप आहेत. ती या स्थितीवर अजिबात व्यक्त व्हायला तयार नाहीत. या स्थितीचा निषेध करायला पुढे येत आहेत ना त्यावर भाष्य करायला. सगळे कसे आपल्या सुरक्षित बिळात मश्गुल आहेत. आम्ही त्या गावचे नाहीच अशा स्थितित ही मंडळी वावरत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संमेलनं घेवून स्वत:चेच कौतुकसोहळे न चुकता भरवतात. स्वत:च्याच पाठीवर कौतुकाची थाप मारून घेतात. गोलगोल आणि गोडगोड भाषण ठोकून देतात. एवढ्यावरच त्यांची इतीकर्तव्यता संपते.

वास्तवावर बोट ठेवण्याची किंवा भरकटलेल्या लोक प्रतिनीधींना, सरकारला जाब विचारण्याची, साहित्यात त्यावर भाष्य करण्याची हिंमत या लोकांच्यात आता उरली नाही. म्हणूनच साहित्यिकांनी अंमळनेर येथे होणा-या साहित्य संमेलनात आपल्या भ्याडपणाची उदघोषणा करून टाकावी. आम्ही सगळे भ्याड आहोत, भरकटलेल्या, बिघडलेल्या सामाजिक व राजकीय स्थितीवर आम्ही बोलू शकत नाही, लिहू शकत नाही. तेवढे धैर्य आमच्यात उरले नाही. राजसत्तेच्या गचांडीला धरण्याची ताकद आता आमच्यात उरली नाही. याची कबूली द्यावी. साहित्य संमेलनं म्हणजे केवळ ठराविक मंडळींच्या कौतुकाची बाळंतपण झाली आहेत. ठराविक कंपूने एकत्र येत ती दरवर्षी केली जातात. विभागवार या बाळंतपणाचे बाजले मांडले जाते. ते मांडले जावे यासाठी कुणाच्याही बाजल्यावर जायला साहित्यिकांना काही वाटत नाही. बाकी सत्याचा आणि या संमेलनांचा काही संबंध राहिला नाही. मस्तवाल धर्मसत्तेच्या अधीन असलेल्या समाजाला जाब विचारणारी संत सोयराबाई जेवढी हिंमत दाखवते तेवढीही हिंमत या बावळ्यांच्यात नसावी ? याचे आश्चर्य वाटते.

“देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध । देहीचा विटाळ देहीच जन्मला। सोवळा तो झाला कवण धर्म ।।” अशा पध्दतीने संत सोयराबाई जेव्हा आपल्या अंभगातून तत्कालीन समाजाला रोकडा सवाल करत होत्या, समाजाचे वाभाडे काढत होत्या, संत तुकाराम जेव्हा बंड करून उठत होते तेव्हा त्यांना लोकशाहीचे सुरक्षा कवच नव्हते. तेव्हा मनूस्मृतीवर आधारलेली समाजव्यवस्था अस्तित्वात होती. अशा काळात ही माणसं जीवाची पर्वा न करता भिडली. मग संत साहित्यापासूनची परंपरा सांगणारे साहित्यिक का थंड झाले ? मानसिकदृष्ट्या का षंढ झाले ? याचा विचार त्यांनीच करावा. शक्य असेल तर अंमळनेरच्या संमेलनात मनात साचलेला भ्याडपणाचा, षंढपणाचा मळ काढावा. कारण अंमळनेर म्हणजे घाण नसलेले, मळ नसलेले गाव असा त्याचा अर्थ होतो. याच ठिकाणी संमेलन होत आहे. या निमित्ताने मराठी सारस्वतांनी आपल्या मनातला भ्याडपणाचा व षंढपणाचा मळ काढावा नसेल तर स्वत:च्या भ्याडपणाची उदघोषणा तरी करावी.