श्रीकांत देशमुख यांचे चार्वाक वनात शिवचरित्रावर व्याख्यान !

60

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855

पुसद: प्रशासनात अनेक अधिकारी येतात आणि जातात,परंतु प्रशासनात काम करीत असतांना साहित्यिक म्हणून वावरणारे बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी मिळतील.श्रीकांत देशमुख त्यापैकी एक होत.श्रीकांत देशमुख यांनी प्रशासनात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून जनतेची चोख सेवा तर केलीच, शिवाय त्यांनी साहित्यलेखनही भरपूर केले आहे. कविता ,कांदाबरी,वैचारिक लेखन,समिक्षा अशा अनेक प्रकारातून त्यांनी साहित्य सेवा केली आहे.’ पिढीजात ‘ ही त्यांची, प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेवरील गाजलेली कादंबरी! ‘बोलावे आम्ही’ या कविता संग्रहासाठी भारत सरकारच्या साहित्य अकादमी पुरस्काराने श्रीकांत देशमुख यांना सन्मानित करण्यात आले आहे.
‘ कुळवाडीभूषण शिवराय ‘ या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध अंगी कार्याचा आढावा घेत असतांनाच, शिवाजी महाराज कसे शूद्रातिशूद्र रयतेचे राजे होते, हे श्रीकांत देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.तुकोबांना शेतकऱ्यांचा संत आणि शिवबांना शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळख देणारे जोतीराव फुले हे पहिले इतिहासकार होत, हे श्रीकांत देशमुख यांनी उजागर केले आहे.
संत तुकोबा ,राजा शिवबा आणि म.जोतीबा यांचा अनुबंध, प्रत्यक्ष श्रीकांत देशमुख यांचेकडूनच ऐकण्यासाठी म.फुले समता विचार मंच,बहु.उद्देशीय शैक्षणिक संस्थेतर्फे शिवजयंती पर्वावर म्हणजेच दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १०-३० वाजता चार्वाकवन येथे व्याख्यानाचे आयोजन केले आहे.तरी शिवप्रेमींनी उपस्थित राहावे अशी विनंती चार्वाकवनाचे संस्थापक अॕड.अप्पाराव मैंद यांनी केली आहे.