नव्या पिढीसाठी सत्यशोधक आनंद स्वामींचे कार्य प्रेरणादायी : आमदार संग्रामभैय्या जगताप

34

✒️अहमदनगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अहमदनगर(दि.19फेब्रुवारी):- सत्यशोधक आनंद स्वामी यांच्या बद्दल संजय खरात व ज्ञानदेव पांडुळे यांनी पुस्तक रूपाने मराठीतील मूलभूत सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या दुर्मिळ ग्रंथांची निर्मिती केली असून एका क्रांतिकारक शेतकरी चळवळीच्या विशेष सत्यशोधकाचे ऐतिहासिक कार्य प्रकाशात आणले आहे,असे मत अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप यांनी व्यक्त केले.

स्माईलींग अस्मिता शेतकरी, विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन जागृतीपर व्याख्यानमाले प्रसंगी ज्ञानदेव पांडूळे व संजय खरात लिखित ‘शेतकऱ्यांचे क्रांतिकारी सत्यशोधक आनंदस्वामी’ या शब्दगंध प्रकाशन च्या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक मध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, बाळासाहेब पवार,अजिंक्य बोरकर, अमोल गाढे,प्रकाश भागानगरे, महिला बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे पाटील, स्माईलींग अस्मिता चे अध्यक्ष यशवंत तोडमल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. संग्रामभैया जगताप म्हणाले की, ‘क्रांतिकारक चळवळीला यशापर्यंत नेणाऱ्या आनंदस्वामी यांच्या बाबतीत विविध अंगांनी विचार करून आनंदस्वामी यांचे संघटन, तळागाळातल्या जनतेसाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते म्हणून आणि आश्रमाच्या माध्यमातून रचनात्मक कार्य करणारे व्यक्तिमत्व उभे केले आहे, याचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेतला पाहिजे.’

यावेळी बोलताना ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, सत्यशोधक आनंदस्वामी हे पुस्तक तयार करण्यासाठी अनेकांचा हातभार लागला असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल सर्वप्रथम पुस्तक लिहिणारे आनंदस्वामी हे महान क्रांतिकारक होते. त्यांचा इतिहास नव्यापिढीला मार्गदर्शक व्हावा, यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तोडमल यांनी चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात चालू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देऊन आवश्यक तो निधी मिळवून देण्याचे आवाहन केले.
राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या संचालिका नंदा पांडूळे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव करण्यात आला. शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, शुभम पांडुळे, विनीत गाडे यांचा सत्कार करण्यात आला.

चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात चालू असलेल्या कामाबद्दल सर्व मान्यवरांनी समाधान व्यक्त करून निधन उपलब्ध करून देण्याच्या आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार, कवी सूर्यकांत वारकड यांनी केले तर शेवटी माजी नगरसेवक बाळासाहेब पवार यांनी आभार मानले.यावेळी माजी महापौर गणेश भोसले, स्नेहा कोकणे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते.