कामगारांच्या मुलांनी इंग्रजीतूनच शिक्षण घ्यावे- प्रा.कांचा इलैय्या

85

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.19फेब्रुवारी):-सामान्य लोकांना मराठी किंवा इतर मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे आवाहन केले जाते. त्याच वेळी उच्च जातीयांची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन युरोप, अमेरिकेत स्थानांतरीत झाली आहेत. मात्र मातृभाषेतून शिक्षण घेतलेली सामान्य मुले मागे राहिली. मातृभाषा हिच त्यांचे साठी शत्रूभाषा बनली आहे. काही संस्था तर आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून नव्हे तर केवळ संस्कृत शिकण्यास सांगावे असे सांगत आहेत. ज्यांना त्यांची भाषा संस्कृत आहे असे वाटते त्यांनी खुशाल त्या भाषेत शिकावे.परंतु कामगारांच्या मुलांनी इंग्रजीतूनच शिकावे आणि कामगार संघटनांनी त्यासाठी पाठपुरावा करावा असे प्रतिपादन हैदराबाद येथील प्रसिद्ध सामाजिक विचारवंत प्रा. कांचा इलैय्या यांनी आज नागपुरात केले.

  स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन १७ व १८ फेब्रुवारी रोजी रेशिमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात रमेश रंगारी विचार मंचावर आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन प्रा.कांचा इलय्या यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस.पाटील होते. यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले की, देशात अनेक संघटना स्वत:चे वेगळे आदर्श बागळून कार्यरत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, केवळ संघटन बनवून चालणार नाही तर संघटनेला समोर घेऊन जावे लागणार आहे. आपल्याला त्याग करून व समर्पित होऊन आंबेडकरवादी कामगार चळवळ पुढे घेऊन जावे लागणार आहे.

 यावेळी प्रमुख अतिथी बी. पी. मंडल यांचे नातू व दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर सूरज मंडल, युनियनचे राष्ट्रीय महासचिव ए.व्ही.किरण,असंघटित कामगार नेते डी.सी.कपील,नवी दिल्ली,राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र जारोंडे,महेश चंद्रा, मुकेश जाटव, एस. के. सचदेव, डॉ. दिनेश निंबरिया, डॉ.संजय घोडके, विकास गौर, रमेश मेडी,सागर तायडे आदी उपस्थित होते.

प्रा.इलैय्या पुढे म्हणाले की,सर्व कम्युनिस्ट पक्षांचे नेते उच्चजातीय आहेत. कारण सर्वांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले आहे. कम्युनिस्ट पक्ष आणि युनियनचे पुढारी इंग्रजी शिकतात आणि त्यांच्या युनियनचे सदस्य असलेले कामगार मातृभाषेतून शिक्षण घेत असतात. त्यामुळे ते कम्युनिस्ट युनियनमध्ये नेते बनू शकत नाहीत, असे स्पष्ट करीत सर्व सरकारी शाळा इंग्रजी माध्यमांच्या बनविण्याचे आवाहन केले. केजी ते बारावीपर्यंत शिक्षण सरकारी शाळांमध्ये इंग्रजीतून देण्यात यावे, अशी मागणी प्रा. इलय्या यांनी केली.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र जारोंडे यांनी तर सूत्रसंचालन अशोक जांभूळकर यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश ऊके यांनी मानले.या अधिवेशनास मध्यप्रदेश,तेलंगणा, आंध्र प्रदेश, पंजाब,हरियाणा,नवी दिल्ली,तामिळनाडू,गुजरात,उत्तर प्रेदश ,छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी, अधिकारी व महिला उपस्थित होते.