कंत्राटी कामगारांना नियमित रोजगाराच्या मागणीसह स्वतंत्र मजदूर युनियनच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता

115

✒️नागपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.19फेब्रुवारी):-देशातील कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ करण्यासह त्यांना नियमित रोजगार मिळण्याच्या ठरावासह आज स्वतंत्र मजदूर युनियनच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे कविवर्य सुरेश भट सभागृहात रमेश रंगारी विचार मंचावरुण समापन झाले.

राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. के. पी. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रतिनिधी सत्रात संलग्न संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी विचारांची कामगार संघटना देशात मजबूत करण्याचा संकल्प केल्यानंतर विविध ठराव मंजूर करण्यात आले.

केंद्र सरकारच्या नौकरी मधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,इतर मागासवर्गीयांची रिक्त पदे तात्काळ भरणे, देशातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना कामगाराचा दर्जा देऊन किमान वेतन लागू करणे, नवीन पेन्शन योजना ही प्रतिष्ठेसह जीवन जगण्याच्या संविधानीक हक्काच्या विरोधात असल्याने जूनी पेन्शन योजना पुर्वीप्रमाणे लागू करणे,ईपीएफ – ९५ पेन्शन मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाढ करणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या असंविधानीक क्रिमी लेअर ला मान्यता न देणे, स्वतंत्र मजदूर युनियनला राष्ट्रीय कामगार संघटना म्हणून मान्यता देणे, चौदा वर्षेपर्यंत समान, सक्तीचे व मोफत शिक्षण देणे इत्यादी ठराव पारित करण्यात आले.

प्रतिनिधी सत्रात स्वतंत्र मजदूर युनियनचे महासचिव ए. व्हि. किरण (विजयवाडा), डाॅ.दिनेश निंबरिया (रोहतक),रमेश मेडी (तेलंगणा), महेश चंद्रा (झांसी), सुभाशिनी ( बंगलोर), प्रफुल्लता लोणारे (नागपूर),सागर तायडे (मुंबई), डाॅ.लेनिना (नांदेड),सूंदर सुगत (उराई), विनायक जाधव (मुंबई),मुकेश जाटव (दिल्ली) इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. या सत्राचे प्रास्ताविक नरेंद्र जारोंडे यांनी,संचालन विकास गौर तर आभारप्रदर्शन गणेश ऊके यांनी केले.