विश्वबंधुत्व आणि सद्गुरूबाबा हरदेवसिंहजी महाराज!

71

(संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराज जयंती: निरंकारी गुरुपूजा दिन पर्व विशेष)

युगदृष्टा निरंकारी बाबा प.पू.हरदेवसिंहजी महाराज हे संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक सद्गुरुपदावर विराजमान होते. तेव्हापासूनच निरंकारी जगतात गुरुपूजा दिवस साजरा होत आहे. दरवर्षी आपला जन्मदिवस २३ फेब्रुवारीला नुसता मौजमस्तीत न घालविता तो जगतकल्याणाच्या कामी यावा, जगातील प्रेरणादायी गुरुवर्यांना या दिवशी वंदन करून त्यांचे सदाचार, सद्विचार आपल्या जीवनात उतरवावे. तीच खरी गुरुपूजा ठरेल. असे बाबाजींना वाटले. याविषयी त्रोटक पण रोचक माहिती श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींच्या अचूक शब्दांतून वेचून घावी… 

आजच्या विश्वविख्यात आध्यात्मिक संत निरंकारी मिशनने जगाच्या पाठीवर सकारात्मक छाप उमटवली आहे. खरे तर याचे श्रेय जाते ते तत्कालीन युगदृष्टा सद्गुरु निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना. त्यांनी अखिल मानव जातीत प्रेम भावनेने मानव एकता वाढीस लावली. म्हणून मिशनद्वारे त्यांचा जन्मदिवस गुरुपूजा दिवस निरंकारी जगतात अधिक उत्साहाने विविध लोककल्याणकारी उपक्रमांनी साजरा होऊ लागला. सद्गुरुची महती सांगताना जगदगुरु तुकारामजी महाराजांनी म्हटले-

“सद्गुरु वाचोनि सापडेना सोय।
धरावे ते पाय आधी आधी।”

संतशिरोमणी हरदेवसिंहजी महाराजांचा जन्म दिल्ली येथे दि.२३ फेब्रुवारी १९५४ रोजी झाला. त्यांचे वडील बाबा गुरबचनसिंहजी महाराज हे निरंकारी मिशनचे तत्कालीन सद्गुरु होते. बालपणी छोट्या हरदेवांना सर्व आप्तस्वकीय आणि संतमंडळी भोला नावाने प्रेमाने हाक मारत असत.
विश्वात मानव एकता प्रस्थापनेच्या प्रसार कार्यात तत्कालीन सद्गुरु बाबा गुरबचनसिंहजी महाराज हे व्यस्त असतानाच जगतकल्याणार्थ शहीद झाले. त्यानंतर इ.स.१९८० पासून बाबा हरदेवसिंहजी महाराज हे पोरक्या झालेल्या साधसंगतचे- निरंकारी भक्तमंडळींचे सद्गुरु झाले. मिशनचे प्रसार- प्रचार कार्ये अधिक जोमाने सुरू केले. आपले सर्वस्व पणाला लावून बाबाजींनी जगातील कानाकोपर्‍यात सत्यसंदेश पोहोचवण्यासाठी दिवसरात्र एक करून मिशनचे रथ उत्साहात दामटले. तेव्हापासून मिशनद्वारे २३ फेब्रुवारी हा गुरुपूजा दिवस विविध जनहिताच्या उपक्रम- अभियानांच्या रुपात साजरा करण्यात येऊ लागला. त्यामुळे मिशनच्या कार्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला.

गुरुपूजेच्या परंपरागत पूजाविधीचा सामान गोळा करून गुरूपाद्यपूजा करण्याच्या प्रथेस फाटा देण्यात आला. नवनवीन उपक्रम तथा अभियान हाती घेतले गेले. त्यात प्रामुख्याने रक्तदान, रक्तगट तपासणे, नेत्रदान, अवयवदान, मदत व पुनर्वसन आदी परिस्थितीनुरुप अभियान समाविष्ट केले गेले. यादिवशी शिष्यांनी पूजापाठ मांडून गुरुप्रतिमेसमोर वा गुरुचरणांवर हात जोडून मस्तक टेकवले पाहिजेच असे नाही. तर गुरुदेवाची शिकवण, गुरुवचन आणि मिळालेला गुरुआदेश हे शिरसावंद्य मानून तन, मन, धनाने त्यासाठी स्वतःला झोकून देणे, हीच श्रेष्ठ गुरुपूजा ठरते. आज हेच सत्य समोर आले आहे, कारण तीच काळाची नितांत गरज आहे. बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी सत्यवचन प्रस्तुत केले-

“गुरू वचन का पालन करना ही जीवन श्रृंगार हैं।
सद्गुणों को धारण करना ही जीवन श्रृंगार हैं।
सच से जुड़कर सन्तमति को जो जन भी अपनाता हैं।
कहे ‘हरदेव’ जहाँ भी जाता वह जन शोभा पाता हैं।”
[पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.१८८]

शांतीपूर्ण सह-अस्तित्वाची भावना जागृत करून जगामध्ये विश्वमानव-एकता, विश्वबंधुत्व आणि विश्वशांती अशा एकत्वाने युक्त वातावरण निर्माण करण्यात आपले संपूर्ण जीवन निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी समर्पित केले. दरवर्षी त्यांच्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे विश्वभरातील मिशनच्या लाखो शाखांमध्ये लाखो वृक्ष लावून त्यांचे कमीत कमी तीन वर्षांपर्यंत संरक्षण- संवर्धन करण्याचा प्रण करण्यात येत असतो. भवननिर्माण कार्यात सेवा केली जाते. सेवादार बंधुभगिनी आपत्कालात मदतकार्यात स्वतःला झोकून देतात. हीच निरंकारी संतमंडळींची गुरुपूजा होय. यातून सांप्रत सद्गुरु माऊलीच्या शिकवणीचे तंतोतंत पालन होते. त्यामुळे सद्गुरु माऊली प्रसन्न होते, असा त्यांचा दृढविश्वास आहे. दरवर्षी बाबाजींच्या जयंतीनिमित्त जगभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण, वृक्षसंरक्षण व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान प्रत्येक निरंकारी परिवारातील सदस्याने कमीत कमी एक रोप लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे. यंदाही अशी प्रेरणा वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांनी दिली आहे.

इ.स.२००३पासून याच गुरुपूजा दिवसाच्या पावन पर्वावर स्वच्छता अभियानाचीही मोठ्या उत्साहाने सुरुवात झालेली आहे. हे देशव्यापी अभियान तेव्हापासून निरंतर आयोजित करण्यात येत आहेत. कारण हाच मानवाचा धर्म आहे. संत एच.एस.निर्माणजी आंग्लभाषेत म्हणातात-

“लव्ह इज दि रिलिजन; हॅट्रेड प्रोफेनिटी.
लव्ह इज नॉर्मेलिटी; हॅट्रेड एन्सेनिटी.
लव्ह इज इस्लेम अँड लव्ह इज ख्रिश्चेनिटी.
गॉड इज दि लव्ह लिव्ह्ज इन हुमेनिटी.
थिंक इट ओव्हर….”

वर्तमान निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आज बाबाजींचे तेच दिव्य संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत. त्यात हीच प्रेरणा देत आहेत, की आपला जीवन तेव्हाच सार्थक होईल; जेव्हा आपण दुसऱ्यांच्या कामी येऊ. संत निरंकारी मिशन अनेक वर्षांपासून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून समाज कल्याणाच्या कार्यामध्ये कार्यरत आहे. मिशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अभियान यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. मागील सन २०२१ व यंदाचे हे वृक्षारोपण अभियान राबवित असताना कोरोनाविषयीचे शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन अवश्यच करण्यात आले आहे. ग्रंथकार अवतारसिंहजी महाराज मानवाला एकत्र येण्यास बजावतात-

“मेरे सजनों रल मिल आओ रब दी महिमा गा लईए|
सत्गुर तों रब कर के चेते इस ते ध्यान जमा लईए|
अवतार गुरु दी चरनीं ढह के अठसठ तीरथ नहा लईए|
जिस लई मिलया एह तन चोला ओहो कम्म मुका लईए|
(पवित्र सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र.७५)

संत निरंकारी मिशनचे आजवरचे आधारवड, दीपस्तंभ तथा बुलंद मजबुती प्रदान करत आलेले सद्गुरु- बाबा बुटासिंहजी महाराज, शहंशाह बाबा अवतारसिंहजी महाराज, युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी महाराज, युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज, माता सविंदरजी महाराज आणि वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज हे आहेत. गुरुपूजा दिवसाच्या पावन पर्वावर त्यांच्या चरणारविंदावर दासाचे कोटी कोटी प्रणाम! अखिल विश्वाच्या कल्याणाची तळमळ उराशी बाळगून निरंकारी बाबा संतश्रेष्ठ हरदेवसिंहजी महाराज वर्षभर देश-विदेशांची दिव्ययात्रा करीत होते. आज प्रादेशिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागमातूनही असे अभियान चालविले जाऊ लागले. ही माझ्या निरंकारी बाबाजींची पुण्याई होय. अशाच विदेशी मानवकल्याण यात्रेदरम्यान कॅनडा येथे रस्ता अपघाताचे निमित्त घडून बाबाजींनी नश्वर देहाचा त्याग केला. निरंकारी बाबा युगदृष्टा सद्गुरु हरदेवसिंहजी महाराज दि.१३ मे २०१६ रोजी ब्रह्मलीन झाले. ही बातमी ऐकून संपूर्ण विश्वावर शोककळा पसरली होती, हे येथे उल्लेखनीय!

!! साधसंगतजी, चरणस्पर्श धन निरंकारजीं! निरंकारी गुरुपूजा दिवसाच्या सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

✒️चरणधूळ:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(मराठी साहित्यिक, नागपूर विदर्भ प्रदेश)द्वारा- प.पू. गुरुदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर, गडचिरोली.जि. गडचिरोली, मधुभाष- ७७७५०४१०८६
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com