वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे तिफणच्या यशवंतराव चव्हाण विशेषांकाचे प्रकाशन

100

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.26फेब्रुवारी):-साहित्य कला, आणि लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिक तिफण हे गेली पंधरा वर्ष सातत्याने प्रकाशित होत असून या त्रैमासिकाच्या वतीने विविध विषयांवर विशेषांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण यांचे जीवन, कार्य आणि साहित्य यावर प्रकाश टाकणारा महत्वाचा संदर्भ मूल्य लाभलेला विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या विशेषांकाचे चार भाग असून महाराष्ट्रातील विविध भागातील नामवंत अभ्यासकांचे या विशेषांकात संशोधनपर लेख आहेत. या विशेषांकाचे प्रकाशन येथील वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे मराठी विभागातर्फे नुकतेच करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड जि. संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व तिफण त्रैमासिकाचे मुख्य संपादक प्रा. डॉ. शिवाजी हुसे हे होते.यावेळी तिफणचे संपादक डॉ. शिवाजी हुसे यांनी तिफणच्या वाटचालीचे व वाङ्‌मयीन क्षेत्रातील योगदानाची माहिती देवून विशेषांकाचे स्वरूप विशद केले. ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असून त्यांनी राजकीय क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

यशवंतराव चव्हाण यांचे कृष्णाकाठ वाचून मी प्रभावित झालो. त्यानंतर त्यांचे अन्य लेखन वाचले. हा ठेवा नव्या पिढी पर्यंत जावा या भूमिकेतून या विशेषांकाचे प्रकाशन केले आहे. कराडच्या पावन भूमित या अंकाचे प्रकाशन व्हावे ही माझी ईच्छा होती. वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमध्ये हे प्रकाशन होत आहे याचा मला विशेष आनंद आहे.”

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. सरोदे मॅडम अध्यक्षीय समारोप करतांना म्हणाल्या की, “तिफण हे दखलपात्र त्रैमासिक असून तिफणने अनेक महत्वाचे विशेषांक प्रसिद्ध करून ऐतिहासिक कार्य केले आहे. या अंकाचे प्रकाशन आमच्या महाविद्यालयात होणे ही आनंदाची बाब आहे.” असे मत व्यक्त केले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख प्रा. संतोष बोंगाळे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. व्ही. आय. आंबेकरी यांनी करून दिला. आभार प्रा. पी. एस. कराडे यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. पी. एस. चोपडे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.