पत्रकारांच्या हितासाठी झटणारी जगातील सर्वोत्तम संघटना व्हॉईस ऑफ मीडिया : मंत्री मंगल प्रभात लोढा

122

🔸पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड, महाराष्ट्र भूषणचे थाटात वितरण

🔸मुंबईमध्ये गुंजला व्हॉईस ऑफ मीडियाचा आवाज

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.27फेब्रुवारी):-अत्यंत सुनियोजित पद्धतीने देशातील, जगातील पत्रकारांच्या समस्या शोधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी झटणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही जगातील एकमेव सर्वात मोठी पत्रकारांची संघटना असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले.

राज्यभरातील हजारावर पत्रकारांच्या उपस्थितीने खच्चून भरलेल्या मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड २०२३, महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३, राज्य उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार वितरण समारंभामध्ये मंत्री श्री. लोढा बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाला युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, कर्जतचे आमदार रोहितदादा पवार, माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर, परभणीचे आ. राहुल पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड, संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, आरोग्यदूत ओमप्रकाश शेटे, संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, मंत्रालयातील सचिव डॉ. नामदेव भोसले, संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले,शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशीष लढ्ढा, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते.

व्हॉईस ऑफ मीडियाचे पत्रकार आणि पत्रकारितेसाठी सुरू असलेले काम आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्याचे खूप समाधान आहे, असे उद्गार लोढा यांनी यावेळी काढले.
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी समाजाला लोकशाहीच्या माध्यमातून सुखरूप ठेवण्याची भूमिका पत्रकारांनी सातत्याने घेतली पाहिजे, असे आवाहन करून संघटना करीत असलेल्या पत्रकारिता क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले.

आपल्यालाही आजोबांकडून पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. आपली नोंद चांगल्या कामासाठी व्हायला पाहिजे व समाजाचा अंतर्मनाचा आवाज मीडियाच्या माध्यमातून पोहोचला पाहिजे. आज 24 तास रिपोर्टिंगचा जमाना आहे‌. सत्य लोकांपासून लपून राहू शकत नाही. मात्र दोन्ही बाजूने विचार करून जे योग्य वाटेल तेच पत्रकारांनी लिहिले पाहिजे. राज्यकर्त्यांवरही त्यांचा अंकुश असला पाहिजे. पत्रकारांनी त्यांना सातत्याने निवडणुकीत दिलेल्या वचनाम्याची आठवण दिली पाहिजे, असे आवाहन केले.

आमदार रोहित पवार यांनी यावेळी विद्यमान परिस्थितीत माध्यमांची होणारी मुस्कटदाबी थांबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्यालाही अनेक जण थांबवण्याचा प्रयत्न करतात,परंतु आपण जनतेसाठी काम करीत असल्याने थांबणार नाही. ज्या ज्या वेळी पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, त्या त्या वेळी तो उलथवून टाकण्याचे काम त्या त्या काळातील मीडियाने केलेले आहे. याच कामाची आज आवश्यकता आहे. एकच गोष्ट अनेक वेळा दाखवून समाजमनावर बिंबवून असत्याला सत्य ठरविण्याचे प्रयत्न मीडिया हाऊस ताब्यात घेऊन आज सुरू झाले आहे. सरकार विरोधात बोलले तर मुस्कटदाबी केली जाते. ही भारतातील पत्रकारांसाठी धोकादायक व गंभीर बाब आहे. देशातील अनेक पत्रकारांची उदाहरणे देऊन त्यांनी प्रेस फ्रीडमच्या बाबतीत आपल्या देशाचा पाकिस्तानपेक्षाही खालचा क्रमांक लागतो, असे सांगितले.

माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर यांनी आजची परिस्थिती रशिया आणि चीनच्या मार्गावर आपण चाललो आहोत की काय? अशी आहे. या परिस्थितीतून मीडियाला बाहेर काढण्याची जबाबदारी पेलण्याचे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाला केले.

आ. राहुल पाटील यांनी देखील यावेळी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून समूहामध्ये मोठी ताकद असल्याचे सांगितले. आयुष्मान भारतचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी पत्रकारांच्या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आपण 24 तास उपलब्ध असल्याचे सांगून देशातील पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम व्हॉईस ऑफ मीडियाने आयुष्मान भारतचे सहा हजार चारशे पत्रकारांना लाभ मिळवून दिले असल्याचे सांगितले. नांदेडसाठी एक रुग्णवाहिका देण्याचे शेटे यांनी घोषित केले.

प्रवीण दादा गायकवाड यांनी संघटन ही काळाची गरज आहे, पत्रकारांना वैयक्तिक जीवनात अनेक संकटे येतात. त्यासाठी ही संघटना काम करीत आहे. जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मात्र मिळत नाही. त्यासाठी ही संघटना करीत असलेल्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले. प्रास्ताविक आशीष लढ्ढा यांनी केले.

महाराष्ट्र भूषणचे मानकरी
समाजातील विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवून कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देणारी व्हॉईस ऑफ मीडिया ही एकमेव संघटना आहे.
आरोग्य सेवेसाठी झटणारे डॉ. प्रदीप महाजन, पन्नास हजारांहून अधिक लोकांना दारूच्या नशेपासून मुक्ती मिळवून देणारे विजयकुमार यादव, अन्नदानाचा यज्ञ चालवणारे राणा सूर्यवंशी, लाडाची कुल्फीच्या माध्यमातून अनेकांना व पत्रकारांनाही रोजगार उपलब्ध करून देणारे राहुल पापळ, गोसावी समाजातील सहा हजार मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी झटणारे डॉ. धर्मवीर भारती यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्य उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, नंदुरबार

राज्य उत्कृष्ट पदाधिकारी पुरस्कार

राज्य उत्कृष्ट विभागीय अध्यक्ष मुंबई-कोकण अध्यक्ष- अरुण ठोंबरे राज्य उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष- किशोर कारंजेकर, वर्धा
राज्य उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष- रमाकांत पाटील, नंदुरबार
राज्य उत्कृष्ट महानगरध्यक्ष- डॉ. गणेश जोशी, नांदेड
व्हॉईस ऑफ मीडिया अवॉर्ड २०२३ राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष- राजेश जागरे, शहापूर तालुका, अशोक पाटोळे-भिवंडी तालुका
दिलीप घोरमारे- सावनेर तालुका, समाधान केवटे –पुसद तालुका
अजय भामरे- अमळनेर तालुका, राजेश माळी-तळोदा तालुका
मच्छिंद्र बाबर- जत तालुका,संदीप मठपती- बार्शी तालुका
रणजीत गवळी- कळंब तालुका, अॅड.विनोद नीला- चाकूर तालुका

पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड
‘मुंबई चौफेर’चे संपादक प्रफुल्ल रघुवीर फडके यांना प्रथम क्रमांकाचा, साप्ताहिक सुस्वराज्य प्रभात सोलापूरचे संपादक महेश पाटील यांना द्वितीय क्रमांकाचा, तर अकोला येथील स्तंभलेखक व मुक्त पत्रकार डॉ. मोहन विष्णू खडसे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय प्रोत्साहनपर पुरस्कारांमध्ये सोनपेठ दर्शन परभणीचे संपादक स्वामी किरण रमेश व साप्ताहिक शिवनीती वाशिमच्या जिल्हा प्रतिनिधी वैशाली चवरे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले.